मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो.
आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो, आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.
चला तर मग ही लसूण आपले बारीक सारीक आजार बरे करून आपल्याली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.
१)नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!
२)ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो साधा सोपा उपाय लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.
३)लसुण ही डोळयांचे आरोग्य देखील उत्तम राखते बरे का. त्या करीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.
४)सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या बघा गॅस कुठल्या कुठे पळुन जाईल.
५)सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणा-या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा ह्या उपायाने निश्चित फायदा होईल.
६)ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.
तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply