कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.
खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!
खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.
२)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.
३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.
४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.
५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.
खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply