डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.
४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.
५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply