कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते.
ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का.
सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी हा भात श्रेष्ठ असून त्यात देखील काळा व पांढरा असे दोन प्रकार असतात त्यात पांढरा उत्तम मानला जातो.
सुरे तांदुळ पचायला जड असतात तर उकडे तांदुळ पचायला हल्के असतात.सर्वच तांदुळ चवीला गोड असतात पण साठे साळी मात्र मागुन थोड्या तुरट चवीचे लागतात.तांदुळ पचायला हल्के,स्निग्ध,थंड,पित्तघ्न,अल्प कफवातकर,शरीर पुष्ट करणारे,वृष्य,अल्प मल उत्पन्न करणारे आहेत.
आता तांदुळा पासुन बनविलेल्या विविध व्यंजनांचे गुण पाहुया:
१)यवागु(कण्हेरी):
१ भाग तांदुळ व ६ भाग पाणी घालून केली जाते ती दाट कण्हेरी.हि पचायला हल्की,मल बांधुन ठेवणारी,तहान कमी करणारी,जुलाब,ताप ह्यात उपकारक,मुत्रल आहे.
२)अटवल(विलेपी):
१ भाग तांदुळ व ४ भाग पाणी घालून कण्हेरी पेक्षा दाट केली जाते तिला अटवल म्हणतात.हि भुक वाढविणारी,हृद्य,बल्य,पचायला हल्की,जखम,ताप,डोळ्याचे रोग ह्यात पथ्यकर,गोड,रुचिकर,पौष्टीक,तहान कमी करणारी व मल बांधुन ठेवणारी असते.
३)पेज(पेया):
१ भाग भातामध्ये १४ भाग पाणी घालून केली जाते ती पेज.हि थकवा,ताप,जुलाब ह्यात पथ्यकर आहे,पचायला हल्की,भुक वाढविणारी,रुचिकर,वात व मल ह्यांना पुढे सरकवणारी,घाम उत्पन्न करणारी आहे.
४)मंड:
पेजेतील शितें काढली कि जो द्रव भाग उरतो तों म्हणजे मंड होय.हा पचायला हल्का,थंड,मल बांधुन ठेवणारा,भुक वाढविणारा,ताप,अतिसार ह्यात पथ्यकर,चक्कर येत असल्यास ती कमी करणारा,कफ पित्त नाशक आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply