हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे.
हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात.
कच्ची तोंडली हि हिरवी असतात तर पिकलेले तोंडली हि आतून लाल असते.जसे ह्याचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो तसाच ह्याचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
पिकलेले तोंडले हे चवीला आंबट व उष्ण असते व ते वात व कफ कमी करते व पित्त वाढविते.तर कच्चे तोंडले हे चवीला गोड तुरट असते व ते थंड असून शरीरातील कफ व पित्त कमी करते व वात दोष वाढविते.
आता ह्याचे घरगुती औषधी उपयोग पाहूयात:
१)तोंड आले असता कच्चे तोंडले चावून खावे.
२)बाळंतिणीचे दूध वाढायला तिला तोंडली उकडून गरम मसाला न वापरतां भाजी करून द्यावी.
३)अम्लपित्तामध्ये तोंडलीची कोवळी भाजी उकडून धणे,बडीशेप व सुंठ घालून खावी.
४)खोकला येत असल्यास ४ तोंडली ४ कप पाण्यात उकळावी व ते पाणी १ कप करावे व त्यात १/२ चमचा भाजलेला ओवा,१/२ चमचा हळद व १/४ चमचा काळी मिरी पूड घालून ते पाणी प्यावे.
५)तोंडाला चव नसेल व जीभेवर देखील मळ साचला असेल तेव्हा कच्ची तोंडली व मीठ हे मिश्रण चावून रस व चोथा थुंकावा.
६)मधुमेह असणा-या व्यक्तिंनी तोंडलीची भाजी हळदींची फोडणी देऊन खावी.
तोंडली खाण्याचा अतिरेक केल्यास पोटात वात धरतो व संडासला खडे होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply