चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता खास उकडे तांदूळ व मेथी घालून खीर बनवितात जिला मेथीची पेज म्हणतात.
अशी हि मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच असते.आपण मसाल्या मध्ये वापरतो त्या मेथीच्या बिया होय.मेथीचे लहान क्षूप असते त्याची पाने भाजी मध्ये वापरतात.
मेथी चवीला कडू असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते पण पित्त वाढवू शकते.
हि मेथी देखील ब-याच घरगुती औषधांमध्ये उपयुक्त आहे.
१)शरीरात वात भरल्याने हाता पायांना कळा येत असल्यास मेथ्या तूपात भाजून पीठ करावे व ह्याचे अगदी लहान लाडू वळावेत आणि रोज एक लाडू खावा साधारण पणे आठ दिवसात फरक पडतो.
२)संडासातून आव पडत असल्यास १/२ चमचा मेथी चुर्ण दह्यात मिसळून खावे.
३)प्रसुतीनंतर अंगातील दुःख कमी होण्यास आणि अंगावरचे दुध वाढण्यासाठी ४ चमचे मेथी रात्री पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी बारीक वाटून त्यात नारळाचा रस व गूळ घालून शिजवावे आणि थोडे तूप घालून बाळंतीण बाईला रोज खायला द्यावे.
४)मधुमेहात रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा मेथी चुर्ण गरम पाण्यासह घ्यावे.
५)६ महिन्यानंतर लहान मुलांना त्यांच्या तीन वेळच्या खाण्यामध्ये रात्री मेथी भिजत घातलेले पाणी एक एक चमचा घालावे ह्या मुळे कडू चव पोटात जाते आणि बाळाला पोटाच्या तक्रारी देखील वारंवार होत नाहीत.
मेथी खाण्याचा अतिरेक केल्यास एॅसीडीटी,संडासला पातळ होणे,अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply