‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मराठी मध्ये रूढ आहे.म्हणूनच तर भारतीय संस्क्रूती मध्ये हळदीला एक वेगळे स्थान आहे.अगदी आपल्या हिंदू धर्मात देवकार्या पासून ते लग्ना पर्यंत हिचा वापर होतो.बहुधा हिच्या मधल्या रक्षोघ्न ह्या गुणांमुळे अर्थात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी हिचा वापर भोजना व्यतिरिक्त ब-याच अन्य कार्यात देखील केला जात असावा.
देवपूजेत देवाला हळद कुंकू वहातात,नव्या नवरा नवरीला हळदीच्या दिवशी हळद लावतात,तसेच लग्नामध्ये नवरा नवरीच्या हातालाहळदीचे गाठवळ बांधतात कारण त्यांना कोणतीही दुष्ट शक्तीच्या बाधा होऊ नयेत म्हणून.तसेच सुवासीनीची ओटी भरताना अथवा मानपान करताना तिच्या कपाळाला हळद कुंकू लावले जाते.
हे झाले हळदीचे बाह्य उपयोग पण हिच हळद जेवणात वापरली असता जेवण दिसायला सुंदर,रूचीकर,सुपाच् बनविते.उसळ,वरण,भाजी,आमटी,फोडणीचा भात,मासे,चिकन,मटण असे नानाविध पदार्थ बनवताना हळद हि लागतेच.थोडक्यात काय तर ह्या हळदी शिवाय आपल्या स्वयंपाक घराला देखील पूर्णत्व येणार नाही.
अशी हि बहूगुणी,बहूउपयोगी हळद.अहो प्रत्यक्ष महादेवाला देखील प्रिय असणारी अर्थात जेजूरीच्या खंडेरायांच्या भालमस्तकी भंडारा म्हणून मिरवणारी ही हळद,बरेच जण घरगुती औषधांमध्ये हिचा वापर करत असतातच.अहो घरच्या ग्रूहलक्ष्मीचे बोट स्वयंपाक करताना कापले तर ती प्रथम कापलेल्या बोटावर हळद दाबून धरते.
चला तर हिची थोडक्यात माहिती आणी घरगुती औषधांमध्ये वापर ह्या बद्दल जाणून घ्यायचे ना?
हळदीचे बहुवर्षायू क्षुप असते.आणी आपण वापरत असलेली हळद हा त्याचा कंद होय.हि चवीला कडू,गोड असते,आणि उष्ण असते.हि शरीरातील वात आणि पित्तदोष कमी करते.
उपयोग:
१)खरूज आली असता हळद+ आवळकाठी+ कडूनिंबाचा काढा घ्यावा.
२)हळद लोण्यात खलून त्वचेला लेप केल्यास त्वचा मऊ मुलायम होते.
३)ब-याच बायकांना अंगावर पांढरे जाण्याची सवय असते त्यांनी हळदीचा काढा मधासोबत घ्यावा.
४)मुळव्याधी मध्ये हळदकुंड भाजूनतिची पूड करावी आणी हि पूड १/२ चमचा + कोरफडीचा गर १/२ चमचा असे मिश्रण दिवसातून दोन वेळेस असे सलग सात दिवस घ्यावे.
५)आंघोळ करताना साबणा एवजी हळद+ बेसन+ कापूर हे मिश्रण वापरल्यास त्वचा नितळ व सतेज होते.
६)पायाला भेगा पडण्याची सवय असणा-यांनी हळद एरंड तेलात कालवून भेगांवर लावावी.
७)डोक्यात ज्यांना वारंवार कोंडा होतो त्यांनी हळद+रिठे +शिकेकाई घालून काढा बनवावा व ह्या काढ्याने केस धुवावेत.
८)मधुमेहामुळे जर फार लघ्वी होत असेल तर हळद १ चमचा+ काळेतीळ २ चमचे /हळद १चमचा+बेल पानांचा रस ४ चमचे घ्यावा.
हळदीच्या अतिसेवनाने संडासला पातळ होणे,तसेच स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply