मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील ‘हिंग लावणे’ हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो.
चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव.ह्याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात,त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास हिराहिंग म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो.हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणी उष्ण असतो.त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अतिवापराने पित्त मात्र वाढवू शकतो.हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा.तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१)अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२)भूक लागत नसल्यासवअथवा तोंडास रूची नसल्यास १/४चमचा हिंगपूड +२चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासा सोबत घ्यावे.
३)१/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापुर्वी चावून खावे ह्याने जीभेवर साचलेला मळ आणी तोंडास दुर्गंध येणे ह्या समस्या कमी होतात.
४)जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणी हिंग ह्यांची पेस्ट जखमेवर लावणे.(क्रूपया डायबेटिस मुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५)गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणी सूज कमी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply