किती मात्रेत जेवाल?
काही जणांचे उत्तर असेल पोट भरेपर्यंत; तर काहीजण म्हणतील मन भरेपर्यंत!! कदाचित काही स्वतंत्र बुद्धिवादींना असंही वाटेल की आता आम्ही किती खायचं हेदेखील आयुर्वेद ठरवणार का?
ज्याला निरोगी राहायचं आहे अशी व्यक्ती मात्र या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करेल.
आयुर्वेदाने जठराचे काल्पनिक भाग करून स्थूल-द्रव आहाराची मात्रा सांगितली आहेच. मात्र असा अंदाज घेणे हे प्रत्येकाला सर्वस्वी शक्य नसल्याने तुलनेत सोपा मार्ग निवडुया. एखादा पदार्थ किती प्रमाणात खाल्ल्यावर आपले पोट भरते याचा प्रत्येकाला निश्चित अंदाज असतो. यालाच ‘तृप्ती’ ही संज्ञा आयुर्वेद वापरतो. आयुर्वेद सांगतो पचायला जड असलेले पदार्थ या तृप्तीच्या निम्म्या मात्रेतच घ्यावेत. उदाहरणार्थ; दोन वाट्या श्रीखंड खाऊन पोट भरत असल्यास एकाच वाटीवर समाधान मानावे. आवडतं म्हणून ओरपत बसलं तर पुढे सुस्ती, अपचन, पोट बिघडणे आणि सर्दीसारख्या तक्रारी सुरु झाल्याच म्हणून समजा. बहुतांशी गोड पदार्थ, मांसाहार, आंबवलेले पदार्थ हे पचायला जड असल्याने त्यांना हा नियम लागू होतो.
पचायला हलके असलेले पदार्थ मात्र पोट भरल्यासारखे वाटेल इतकेच खावेत; त्याहून अधिक मात्रेत खाऊ नयेत. लाह्या, घावने, कढण, पेज यांसारखे पदार्थ पचायला हलके आहेत. या पदार्थांच्या बाबतीत हा नियम लागू होतो. या नियमांनुसार जेवण केल्यास नियमितपणे व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीदेखील अपचन आणि तत्सम समस्यांपासून दूर राहू शकतील असा यामागील विचार आहे. थोडक्यात काय? तर ‘चार घास कमी’ जेवणे हे आरोग्यदायी आहे. या साधा नियम पाळला म्हणजे ‘टमी भी खूष और मम्मी भी खूष’.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply