मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल.
सरकार कोणतीही चांगली योजना आणते, त्यात भ्रष्ट अधिकारीच योजनेचा बट्टयाबोळ वाजवण्यास पुढाकार घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, पण या वेळेस मात्र, घर फिरले कि घराचे वसे हि फिरतात, अशीच काहीशी गत या अधिकाऱ्यांची झाली आहे. चोरांना मदत करताना, आपले उखळ कसे पांढरे करून घेता येईल, हे पाहताना, आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते याचा थोडाही विचार या नतद्रष्ट लोकांच्या मनाला शिवला नाही, आता भोगा कृत्याची फळे.
या आधी सुद्धा, असे बरेच बँक अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंगेत अंघोळ करून बाहेर आले आहेत. NP अर्थात नॉन परफॉर्मिंग संपत्तीला कुवत नसताना भरमसाठ कर्ज देणे, आणि हे सिक युनिट बंद पडते, किव्वा पाडले जाते, नंतर हप्ते थांबतात, आणि दिलेल्या कर्जाची वसुली होणे अशक्य होते, अश्या अनेक घटना गेल्या काही वर्षात उदयास आल्या आहेत. विजय मल्ल्या हा कानफाट्या झाला, परंतू असे अनेक प्रतिमल्ल्या आजही समाजात ताठ मानेने फिरत आहेत, फक्त आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही.
आज अशातल्याच काही महाभागानी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अंगलट आला आहे.
— विजय लिमये
Leave a Reply