रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा खूपच रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे माशा बसलेल्या होत्या. मुलाची काहीच हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे बघून मला त्याची सहानुभूती वाटली. मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. ती तशीच पुढे भिक मागत गेली.
गाडी लेट होती. मी वाट बघत इकडून तिकडे फिरत होतो. थोड्या वेळाने माझी नजर एका वडापावच्या दुकानावर गेली. तीच भिकारीन तेथे वडापाव खाताना दिसली. नंतर ती निघून गेली. मी तिच्या हालचालीकडे अभ्यासपूर्वक लक्ष देऊन बघत होतो. गाडी लेट असल्यामुळे मला तेथे स्टेशनवर जवळ जवळ दीड तास थांबावे लागले. त्या लहन मुलाला दुध दिलेले, फळ व बिस्कीट दिलेले दिसून आले नाही. काहीही खाऊ घातल्याचे मला त्या थोड्याश्या वेळेमध्ये दिसले नाही. एक विचित्र चित्रण बघण्यात आले होते. एक लहानगा मुलगा त्या तथा कथित आईला जगण्यामध्ये मदत करीत होता. मुलामुळे आईची कमाई होत होती. आणि आईचे पोषण होत होते. मुलाच्या कुपोषणामुळे एक दयेची लाट सभोवतालच्या जनसमुदायात निर्माण केली जात होती. त्या बाईला आंतरिक सहानुभूती त्याच मुलामुळे लाभलेली जाणवत होती. लोक भूतदयेच्या भावनेतून तिच्या ओंझळीत नाण्याची खैरात करीत होते. हेच उत्पन्न तिला जगवित होते. मुलाला ती भरवित तर असणारच. कारण त्या मुलाने जगावे, ही तिची आंतरिक ईच्छा असेलच. परंतु जगाच्या व्यवहाराचापण तिच्या मनावर परिणाम झालेला जाणवत होता. मुलाचे कुपोषण हे तिच्या पोषणाचे एक साधन असल्याची जाणीव होत होती.
एक दैवी संघर्ष – – निसर्ग तिच्या मात्रत्वाची भावना तेवत ठेऊन, त्या मुलाला जगवण्यास उद्दुक्त करीत होता. — तर जगरहाटी अर्थात व्यवहार त्या मुलाला कुपोषित ठेवण्यातच आपली यशस्वीता मानत होता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply