नवीन लेखन...

कैलास मानसरोवर यात्रा


देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. अर्थात हा श्रद्धा व भावनेचा भाग आहे. परंतु, एक मात्र सत्य आहे की कैलास दर्शन हा जीवनामधला अत्यंत रोमांचकारी, दुर्मिळ आणि कृतकृत्य वाटणारा अनुभवी प्रसंग आहे. सारे जीवन यथार्थ झाल्याचे मानसिक समाधान मिळते. नास्तिक देखील त्या सत्य शिव आणि सुंदर यांचे प्रतिक दिसणाऱ्या कैलास पर्वताच्या दर्शनाने नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भाविक तर कैलास दर्शन घेताना आनंदाच्या अश्रुंनीच त्या शिव परमात्याला अभिषेक करताना दिसतात. त्यांचे ह्रदय भक्तिभावाने उंचबळून येते. कुलस्वामिनी अथवा कुलदेवता यांची कृपादृष्टी आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद यांच्यामुळे कैलास-मान सरोवर ही यात्रा निर्विघ्न पार पडते. सनातन धर्मी, बौद्ध धर्मी, निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ही यात्रा करताना स्वत:ला धन्य समजतात. जगामधील सर्व तीर्थयात्रांमध्ये सर्वाधिक दुर्गम, अत्यंत कठीण आणि म्हणून साहसी अशी ही यात्रा आहे. परंतु त्याचबरोबर सर्वाधिक पवित्र व मंगलमय आनंदी असल्यामुळे, भाविक सारे कष्ट सहन करुन तो परमानंद मिळवतात.

कोणत्याही तिर्थयात्रेचे स्थान म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते मंदीर आणि त्यामधील निरनिराळ्या देवतांच्या मूर्ती, मंदीराचे उंच कळस, डोंगरावर उभी असलेली भव्य कलाकृती, पूजा अर्चा, पुजाऱ्याची धावपळ, आरत्या, शंख-घंटेचा निनाद, फुले, पूजा साहित्ये यांची दुकाने आणि भाविकांची वर्दळ. कैलास तीर्थ यात्रेचे चित्र एकदम वेगळेच आहे. वरिल कोणत्याच गोष्टी त्या तीर्थ क्षेत्रात दिसून येत नाही. नाही तेथे मूर्ती, ना मंदीर, ना पूजा- अर्चा, ना भाविकांची वर्दळ. एक अतिउंच, गोलाकार बर्फाच्छादित असा पर्वताचा एक भाग आहे. हिमालयाच्या पर्वताचाच एक भाग कैलास पर्वत आहे. दुरवरुन बघताना एक अवाढव्य अशी शिवलिंगाकार आकृती भासते. भस्माचे पट्टे आणि ध्यानमूर्ती शिवप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिवपार्वतीचे असे हे पवित्र निवासस्थान आणि त्या कैलास पर्वातानजिकच पसरलेले एक प्रचंड सरोवर – मान सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार फूट असून, मान सरोवरचा परिघ ९० किलो मीटर इतका लांब आहे. तिबेटच्या हद्दीत असलेल्या त्या कैलास पर्वतावर आजतरी राजकीय हक्क चीन या देशाचा आहे. मान सरोवराच्या उत्तरेस कैलास पर्वत आहे.

२ हा सदैव बर्फाच्छादीत असतो. इतर सर्व परिसरावर लहान मोठे दगड, माती रेती असून तिथे एक देखील मोठे झाड कुठेच दिसून येत नाही. सारे काही बोडखे वाटते. गवत आणि लहान लहान झुडपी मात्र सर्वत्र दिसून येते. अतिशय थंडी, वारा, पाऊस, हिम बर्फाचा वर्षाव, बर्फावरुन परावर्तित झालेली सूर्याची प्रकाश किरणे डोळ्यास झगझगाट निर्माण करतात. सर्व वातावरण सदैव बदलत राहणारे असते. हे सारे असून देखील प्रत्येक रात्री भक्तीभावाने त्या शिव परमात्म्याच्या अत्यंत पवित्र अशा निवासस्थानाचे दर्शन घेण्यास अती उस्तुक असलेला जाणवतो.

जीवनातील सर्वोत्तम पवित्र तीर्थक्षेत्र कैलास-मान सरोवर आपण देखील जावून बघावे, दर्शन घ्यावे, त्याची परिक्रमा करावी आणि मानसिक शांती समाधानाचा परमोच्च अनुभव घ्यावा ही सुइच्छा प्रत्येक भाविक नागरिकाच्या मनामध
ये येणे साहजिकच आहे. त्यादृष्टीने कैलास-मानसरोवरच्या तीर्थयात्रेसंबंधी ज्या सर्वसामान्य शंका असतात, त्या येथे सांगण्याचा प्रयत्न करतो. भाविकास ती यात्रा करुन धन्यता मिळवता येईल. ॐ शिवपार्वतीच्या कृपेने कैलास मानसरोवर यात्रा १९९७ च्या पहिल्याच गटामध्ये आम्हा दोघा पती-पत्नाला प्रवेश मिळून, ती कठीण परंतु अत्यानंद देणारी यात्रा, आम्ही जून १९९७ मध्येच सुखरुपपणे करुन आलो. त्यामुळे स्वानुभवानेच त्या यात्रेची माहिती इतरांसाठीही देत आहोत.

कोणतीही यात्रा म्हटली ते ठिकाण, तिथे जाण्याचे मार्ग, राहण्या-उतरण्याची व्यवस्था, यात्रेसाठी येणारा सर्वसाधारण खर्च, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, वाहनाची सोय आणि त्या विशीष्ट प्रवासात लागणाऱ्या बाकींची पूर्तता या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी यात्री उत्सुक असतो.

कैलास मानसरोवर यात्रेची पूर्वतयारी
१. पहिली गोष्ट म्हणजे त्या कठीण आणि दुर्गम यात्रेस जाण्याच्या विचाराप्रमाणे च पक्का दृढनिश्चय आणि उत्स्फूर्त मानसिक इच्छा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उंच पहाडी भागातील चढण-उतरण सारखी करावी लागते. प्रवास साधारण दहा किलोमीटर दररोज पायीच करावयाचा असतो. त्यामुळे जाण्यापूर्वीच दोन महीनेतरी दररोज दूरवर पायी फिरण्याचा व्यायाम वा सवय निर्माण करावी म्हणजे यात्रा सुकर होण्यास मदत मिळेल.

१९००० फूट उंचीवर (हाय आल्टीट्यूड) हवामान विरळ असून प्राणवायूचे प्रमाण कमी असते. श्वासोच्छवास करताना कठीण जाते व छाती भरुन आल्याप्रमाणे जाणवते. तेव्हा श्वासाचे व्यायाम, दीर्घ श्वास ठेवून सोडणे, प्राणायाम इत्यादीची सवय केल्यास ऑक्सीजन टेन्शनचा परिणाम कमी जाणवतो.शारिरीक प्रकृती नियमित व्यायाम आणि आहार यांच्या साह्यायाने सुदृढ व निरोगी ठेवण्याचा सतत प्रयत्न करावयास हवा.

लागणारी प्रमाणपत
्रे (ही दिल्लीच्या परराष्ट्र व्यवहार खात्यास लागतात.) पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र हे एखाद्या रजिस्टर मेडीकल प्रॅक्टीशनरकडून मिळवणे. सोबत काही वैद्यकीय चाचण्याचे रिपोर्टस हवेत. हिमोग्लोबीन, इएस आर, टि.एल. सी. डि.एल.सी, लघवी, संजास, रक्तामध्ये बल्ड शुगर, युरिया, क्रियेटीनीन, बीलीरुबीन, ब्लड ग्रुप महत्त्वाचे. छातीचा क्ष किरण आणि स्ट्रेस इसीजी (टि.एम.टी) जर तुमच्याकडे कॅमेरा किंवा व्हीडीओ कॅमेरा असेल तर त्याचा मेक, सिरीअल नंबर कागदावर लिहून खाली मालकाचे व, गाव, पत्ता लिहून ठेवावा काळजीसाठी.

प्रवासामध्ये लागणारे कपडे आणि इतर वस्तू सर्व कपडे साधारण वजनाने हलके, गरम, वारा व पाणी ह्यापासून बचाव करणारे असावेत. विन्ड फ्रुप जाकेट, स्वेटर्स, (२ नग लांब बाह्याचे व १ नग हाफ बाह्याचे, माकड टोपी, व वुलनच हात मोजे (२ नग), वुलनचे लाँग पायमोजे (२ नग), कॉटन पायमोजे (४ नग), जीन्स किंवा पँट (३ नग) शॉर्टस (२ नग), शर्टस किंवा टी-शर्ट (४ नग), सन ग्लासेस, हंटर किंवा मार्चिंग किंवा ट्रेकिंग बुट (२ नग), क्रिकेटमध्ये घालतात तशी टोपी वेताची फेल्ट हॅट (सूर्य प्रकाशाच्या बर्फावरुन परावर्तीत झालेल्या कीरणांपासून संरक्षण करता यावे म्हणून) पाण्याची बाटली, विजेरी (दोन जादा सेल्स व एक बल्ब जादा घेणे), रेन कोट (लांब आकाराचा, शक्य असल्यास शर्ट पँट असे वेगळे असल्यास चांगला) बेल्ट पाऊच ज्यात कॅमेरा, पैसे, पासपोर्ट व गरजेची थोडी औषधी घेता येईल, प्लास्टीकचे मोठे शिट सामानावर गुंडाळता येऊन पाण्यापासून रक्षण होऊ शकेल, चालण्याची एक काठी, प्लेट-मग-चमचा-वाटी, टॉयलेट पेपर वा टिश्यू पेपर (२ रोल) सूर्य प्रकाशापासून रक्षण करणारे तोंडास लावणारे लोशन (हाय आल्टीट्यूड अर्थात उंचावर सूर्य प्रकाशामधील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे उघड्या भागातील चमडी काळी पडते, जळून जाते व चेहरा काळा होतो म्हणून) मेणबत्ती, का ्याची पेटी किंवा लायटर, लहान चोकू, रबर स्लिपर, वाजवण्याची शिट्टी, वही, पेन

प्रवासाची व्यवस्था
वर्षभरात फक्त जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्याच्याच कालावधीमध्ये कैलास- मानसरोवर यात्रेचे आजोजन केले जाते. त्याच काळामध्ये चीनचे सरकार यात्रेकरुस त्या भागामध्ये जाण्याची परवानगी देते आणि तेही फक्त पाचशे यात्रेकरुनांच. तेव्हा भारत सरकारतर्फे अंदाजे ३५ यात्रेकरुचा एक गट याप्रमाणे विभआगून १५ गट थोडे दिवसाच्या अंतराने दिल्लीहून पाठविले जातात. उत्तर प्रदेशातील शासनांर्गत कुमाऊ मंडळ विकास निगम संस्था आहे. या संस्थेतर्फेच सर्व यात्रेचे आयोजन केले जाते. ही संस्था भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून चीनच्या हद्दीत जाण्यासाठी लागणारा व्हीसा आणि इतर सोपस्कार पूर्ण करते. यात्रा दिल्लीपासून सुरु होत असल्यामुळे यात्रींची दिल्लीतच राहण्याच्या व्यवस्थेपासून यात्रेमधील पुढील सर्व टप्याटप्याची राहण्याची, जेवणाची आणि प्रवास वाहनांची सोय कुमाऊ मंडळातर्फेच केली जाते.

साधारणपणे मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामधून भारतीय परराष्ट्र खात्याच्या ईस्ट एशीया डिव्हीजनतर्फे कैलास मान सरोवरच्या तीर्थयात्रेस जाण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले जातात. त्याची छाननी होऊन निवडलेल्या व्यक्तींना निरनिराळ्या गटांत विभागले जाते. क्रमाक्रमाने त्या व्यक्तीस त्याच्या निवडीबद्दल अवगत केले जावून पुढील कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले जाते.

प्रवासामध्ये घोडा भाड्याने उपलब्ध असतो. किंवा आपल्या हातातील सामान घेवून जाण्यासाठी त्याचप्रमाणे प्रसंगी अवघड चढणावर आपले धरुन मदतीसाठी मदतनीस अथवा पोर्टर पण मिळतात. त्यांना रोजदारी घ्यावा लागते. घोडा किंवा पोर्टर हे सुरवातीपासून आपल्या सेवेत घ्यावे लागतात. प्रवासाच्या अधेमध्य ते मिळत नाहीत. वयस्कर अथवा अशक्त यात्रेकरुंनी त्यांची सोय निश्चित करणे अत्यंत जरुरीचे असते. अर्थात हा येणारा खर्च प्रत्येकास स्वतंत्रपणे करावा लागतो. सर्व दर जाणून घ्यावे, ते बदलत असतात.

चीनच्या हद्दीमध्येसुद्धा घोडा / पोर्टर / याक प्राणी प्रवासामध्ये मिळतात. त्यांचादेखील खर्च यात्रीस करावा लागतो. कुमाऊ मंडळाचे कर्मचारी यात्रीस याबद्दल मदत करतात.

राहणे व खाणे यांची सोय

कुमाऊ मंडळ या बाबींची सोय करते. ठराविक अंतरावर मुक्कामाची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी मोठे बॅऱ्याक्स बांधलेले असून झोपण्यास अंथरुण, गरम पांघरुण दिले जातात. स्वतंत्र पलंगही काही ठिकाणी उपलब्ध असतात. पाणी, संडास, बाथरुम यांची उत्तम सोय असते. वीज नसल्यामुळे काही ठिकाणी जनरेटरच्या साह्यायाने वीज पुरवठा ५ करुन देण्याची सोय केली जाते. यात्रींसाठी देन वेळा गरम जेवण, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळा चहा, गरम सूप दिले जाते. जेवण हे संपूर्ण शाकाहारी असून भात, भाजी, चपाती, पापड, लोणचे, उसळी, सॅलड आणि एखादा गोड पदार्थ देखील दिला जातो. प्रवासी थकवा आणि हाय आल्टीट्यूडचा परिणाम होऊन सर्वांचीच भूक मात्र बरीच मंदावते असे दिसून येते.

चीनच्या हद्दीमध्ये मात्र खाण्याची बरीच गैरसोय झाल्याचे जाणवते. फक्त सुरवातीच्या मुक्कामात तकलाकोट येथे चीनी पद्धतीचे जेवण मिळते. सर्व उकडलेले नुडल्स, भात, ब्रेड इत्यादी. शाकाहारी असते. नंतरच्या प्रवासात मात्र जेवणाची गैरसोय झाल्याचे जाणवते. आमच्यावेळी आम्ही शिधा बरोबर नेला होता. त्यांनी भांडी व इतर साहित्य दिले. सर्व यात्रींच्या एकोप्याने आम्ही जेवणाची सोय करुन वेळ निभावून नेली. या प्रवासात विशेषकरुन चीनच्या भागात खाण्याचे हाल होऊ नये म्हणजे सर्वांनीच ड्राय फूड्स जेस काजू, बदाम, मनुका, चिकी, बिस्कीटटे, खाऱ्या डाळी, चिवडा, गोळ्या, फरसाण,करे, लाडू, खारीक, पेंडखजूर इत्यादी खाद्य साहित्य घेवून आपली भूक थोडीशी हलकी केली. त्याचप्रमाणे यात्रेकरुने १०-१२ दिवसाच्या काळासाठी पूरेल असा. सुका मेवा बरोबर न्यावा.

चीनच्या संपूर्ण प्रवासात कुठेही चहा किंवा काही खाण्याची हॉटेल्स, धाबे व टपऱ्या दिसून येत नाही. भारतीय हद्दीत काही ठिकाणी चहा, बिस्किटे वा भाजीपूरी देणाऱ्या टपऱ्या दिसल्या.

औषधी
भारतीय हद्दीमध्ये मंडळातर्फे एक वैद्यकीय अधिकारी बोरबर असतो. त्याचप्रमाणे सर्व गटामध्ये यात्रेकरुमची निवड करताना एक दोन तरी वैद्यकीय ज्ञान असलेले यात्रेकरु प्रत्येक गटात सामील केले जातात की ज्याचा इतरांना आपातकाली उपयोग व्हावा. दिल्लीलाच प्रत्येक यात्रेकरुला एक फर्स्ट एड किट दिले जाते. तरी देखील प्रत्येक यात्रेस आपणांस लागणारी नेहमीची औषधी त्यावर ते कशासाठी हे लिहून व्यवस्थीत घ्यावात. त्याचप्रमाणे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली थंडीत अंगास लावण्यासाठी घ्यावी.

सामान
प्रत्येक यात्रेकरुनी कोण-कोणत्या वस्तू न्यावयाच्या ते वरील यादीवरुन लक्षात ओलेच असेल. सर्वसाधारण प्रत्येक कपड्याचे चार चार जोड ठेवावे लागतात. कारण पाऊस पाण्याने खराब झाल्यास सुकवण्यास वेळ नसतो व योग्य जागा मिळत नाही. अंथरुण पांघरुण घेण्याची गरज नसते. ती दिली जातात. सामान अतिशय कलात्मक तऱ्हेने बांधावे लागते.

बॅग, पेटी वा सूटकेस घेण्यास परवानगी नसते. सामान खेचरावर लादावे लागते. कॅनव्हास बॅगच्या थैल्यामध्ये सामान घेवून वर पोत्याने बांधावे लागते. त्यावर प्लास्टीकच्या कव्हराने गुंडाळून, पुन्हा पॉलीथेन बॅगमध्ये बांधून घ्यावे लागते. त्यावर आपले नाव व खूण असावी. खेचरावर लादताना व काढताना सामानाची खूप फेकाफेक होते त्यामुळे ते निसटणार नाही. अशीच पक्की पॅकिंग करावी लागते आणि पावसापासून रक्षण करावे लागते. व्यक्तीस २५ किलो पर्यंतच सामान घेण्याची परवानगी आहे. एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत कुमाऊ मंडळ सामान ताब्यात घेवून त्याची वाहतूक करण्याचे काम करते. प्रवास दिवसभराचा असल्यामुळे अत्यंत गरजेच्या गोष्टीच फक्त स्वत:जवळ बाळगाव्यात बाकी सर्व मुख्य सामान प्रवाहात द्याव्यात.

यात्रेचा प्रवास
दिल्ली पासून कैलास मानसरोवर जवळ जवळ ८६५ किमी दूर अंतरावर आहे. दिल्ली ते धारचुला हे ६४० मैलाचे अंतर रेल्वे आणि बसने पूर्ण करावयाचे असते. नंतर मात्र धारचुला जवळ तवाघाट पासून यात्रा पायी किंवा घोड्यावरुन करावी लागते. ही पायी यात्रा एकूण २२५ किमी इतकी आहे. दिल्लीस दिलेल्या तारखेस उतरताच कुमाऊ मंडळाने देवू केलेल्या सोईस प्रारंभ होतो. प्रथम अशोक यात्री निवास येथे उतरण्याची व्यवस्था केली जाते. दुसऱ्या दिवशी इंडो-तिबेटीयन बॉर्डस पोलिस हॉस्पीटलमध्ये जावून तुमचे सर्व वैद्यकीय प्रमाण पत्रे व प्रयोगशाळा रिपोर्टस तपासून पुन्हा व्यवस्थीत आरोग्य तपासणी होते. आरोग्याच्या दृष्टीने जे यात्री अती उंच व कठीण दुर्गम यात्रा करण्यास जे अपात्र ठरतील त्यांना यात्रेमधून वगळले जाते. अशाच प्रकारे प्रवासामधील भारत चीनच्या हद्दीजवळ गुंजी नावाचे पोलीस मुख्यालय आहे. ते जवळ जवळ समुद्र सपाटीपासून ११८८० फूट उंचावर आहे. तिथे पुन्हा दुसरी वैद्यकीय शारिरीक तपासणी होते. पहिल्या तपासणीत योग्य वाटलेल्या यात्रेकरुपैंकी काही अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यांना तिथून परत पाठविले जाते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना करावीशी वाटते की शारिरीक आरोग्य आणि सुदृढपणा याबद्दल अतिशय काटेकोरपणे बघीतले जाते. त्यामध्ये थोडीदेखील ढिलाई होत नाही.भारतीय हद्दीमधला प्रवास दिल्ली ते लिपूलेखपासपर्यंत असतो. तेथून पुढे चीनची हद्द सुरु होते. हा प्रवास ११ दिवसांचा असतो. अंतर व सोयीनुसार रात्रीचा मुक्काम जेथे होतो ती ठिकाणे म्हणजे दिल्ली नंतर अलमोडा (३७० किमी), धारचुला (२७० किमी), थोड्याच अंतरावर तवाघाट. येथून प्रवास डोंगराळ असून पायी प्रवास सुरु होतो. कोणतेही वाहन पुढे जात नाही. नंतर पांगू (२६ किमी), सिर्खा (१० किमी), गाला (१० किमी),
७ मालपा (११ किमी), बुधी (९ किमी), गुंजी (१५ किमी), काला पाणी (१० किमी), नवी डांग (८ किमी), लिपू लेख पास (७ किमी)
लिपूलेख पास हा भाग समुद्र सपाटीपासून १६७३० फूट उंचावर आहे व येवून तिबेट अर्थात चीनचे राज्य सुरु होते.

“ॐ नम: शिवाय” च्या मधूर आणि भक्तीपूर्ण भावनेने प्रत्येक यात्री नामस्मरण करत चालत राहतो. रस्त्यात जो कुणी वाटसरु भेटेल त्याला पण राम राम म्हणतो, त्याप्रमाणे “ॐ नम: शिवाय” म्हणताना व आपला आदर भाव व्यक्त करताना दिसतो. यात्रा ग्रुप सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास एका मुक्कामाहून कूच करते. सकाळी चहा व फराळ दिले जाते. हलके हलके. यात्री दुसऱ्या स्थानापर्यंत १ ते २ पर्यंत पोहोचतात. या ठिकाणी गरम गरम जेवण तयार ठेवलेले असते व यात्रेकरुंना येताच जेवण मिळते. दुपार व रात्र दुसऱ्या मुक्कामी थांबते व पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरु होते.

लिपूलेखपास नंतर सुरु होणारा प्रवासातील पहीला मुक्काम तकलाकोट येथे असतो. मोठे शहर असून सर्व तिबेटी वस्ती व चीनी भआषा प्रमूख असते. दुभाषीचा उपयोग करुन घ्यावा लागतो. चीनतर्फे दोन मार्गदर्शक दुभाषी मिळतात. सर्व सामानाची त्यांच्या कस्टमतर्फे तपासणी केली जाते. यात्रेबरोबर असलेल्या अधिकारी यात्रींची दोन ग्रुपमध्ये विभागणी करतो. एक ग्रुप (अ) कैलास पर्वताची परिक्रमा करण्यास जातो व दुसरा ग्रुप (ब) मान सरोवराची परिक्रमा करण्यासाठी जातो. प्रत्येक परिक्रमा करण्यासाठी चार-चार दिवस लागतात. कैलास परिक्रमेमध्ये तारचेन, दिरेबू, झॉग झेरबू ह्या ठिकाणी मुक्काम केला जा. मान सरोवर परिक्रमेमध्ये होरे, चिगू, जैदी या ठिकाणी मुक्काम होतो. दोन्ही ग्रुप परिक्रमा करुन एका मुक्कामात एकत्र येवून पुन्हा परत तकलाकोटला परत येतात व परतीचा प्रवास सुरु होतो. कैलास पर्वत परिक्रमा खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण असून पर्वत शिखर चढण्यासाठी ‘याक’ या तिबेटीयन केसाळ प्राण्याचा उपयोग केला जातो. बैलाप्रमाणेच हा प्राणी असतो. परंतु घोडा जेथे चढून जावू शकत नाही तिथे या प्राण्याचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. अत्यंत शक्तीवान परंतु गरीब प्राणी म्हणून हा उपयोगात आणला जातो. रस्त्यात उंचावरचे ‘डोलमा पास’ अर्थात दयेची देवी ही भव्य शिळारुपी असून सर्वजण तिली श्री. पार्वती देवीचे महत्त्व देवून पूजा करतात. तसेच तिथे गौरीकुंड असून ते रस्त्यात लागते. रस्त्यामधील दिरेबू . मुक्कामाहून कैलास पर्वताचे अप्रतिम असे स्वरुप अत्यंत जवळून दिसते. तिथेच सर्व यात्री मिळून शिवपार्वतीला यज्ञ / हवनाद्वारे पूजा आरती करुन समाधान व आनंद मिळवितात.

मानसरोवराची परिक्रमा त्या अथांग जलाशयाच्या काठाकाठाने करीत जैदी मुक्कामी तीर्थस्थान, पूजा पुन्हा हवन इत्यादी स्वइच्छेनुसार केले जातात व मानसिक समाधान मिळवले जाते. तिथूनच कैलास मानसरोवराचे पवित्र जलतीर्थ यात्री आपल्या बरोबर घेवून जातात.

परतीच्या प्रवास तकलाकोट नंतर पुन्हा त्याच मार्गाने धारचुलापर्यंत व तेथून बसने काठगोदामपर्यंत करुन पुढे रेल्वेने दिल्लीला येवून सर्व यात्रेचा समारोप होतो.

आमची बॅच पहीलीच होती त्यामुळे जाताना भारतीय जनता पक्षातर्फे आम्हांस निरोप देवून रवाना केले गेले. आम्ही भाग्यवान समजतो की पूर्व पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या हस्ते आमचे स्वागत होवून प्रवासाचा हिरवा कंदील दाखविला गेला. सर्व प्रवास अत्यंत समाधानाचा व आनंदाचा झाला.

विनंती- वरील प्रवास व तांत १९९७ सालवरील आधारीत आहे. त्यावेळी प्रवास फक्त शासकिय मदतीने होता. आज काल बऱ्याच खाजगी यात्रा कंपनी सहभागी झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास व्हावा.
जय हिंद जय महाराष्ट्र

विवीध-अंगी
१*** Path of Knowledge- ज्ञान मार्ग अर्थात ह्या मिथ्या, सत्य नसलेल्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करणे. त्याच वेळी स्ववर ‘ मी कोण ‘ ह्याचा शोध घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, मनामधले विचार नष्ट करुन निर्माण होणाऱ्या शांततेची जाणीव ठेवणे हे असेल. ह्यालाच Objectless Awareness म्हणता येईल. अर्थात ध्येय रहीत जाणीव

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..