अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं.
एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या दिवसापासूनच खात्री वाटू लागली ! दुकान तयार होऊन बरेच दिवस झाले तरी त्याचा शुभारंभ का होत नाही याबद्दल उत्सुकतेपोटी चौकशी केली तेव्हा कळलं की ‘गुरुमहाराज’ जे अक्षर ठरवतील त्या अक्षरापासूनच दुकानाचं नाव निश्चित होईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी काढलेल्या कर्जावरील महागड्या व्याजाचं मीटर फिरू लागलं आणि तब्बल एक महिन्यानंतर दुकानावर पाटी झळकली. पण तरीही दुकान सुरू होण्याचं काहीही चिन्ह दिसेना. तोटा झाला तरी चालेल, पण गुरुमहाराजांनी मुहूर्त ठरवल्याशिवाय दुकान सुरू करायचं नाही असा निर्णय घेण्यात आल्याचं कळलं.
अखेर महाराजांनी मुहूर्त पक्का केला आणि तब्बल तीन महिन्यांनंतर दुकानाचा शुभारंभ झाला. ग्राहकांच्या गरजांपेक्षा गुरूंच्या सल्ल्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाराजांच्या मठाकडे दुकानमालकाच्या चकरा वाढल्या व त्याचे दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अनेक ‘हितचिंतकांच्या’ अपेक्षेनुसार हळूहळू आचके देत दुकानाने एक दिवस शेवटचा श्वास घेतला व त्याचे शटर खाली ओढण्यात आले.
असे आम्ही कसे? वैचारिक स्पष्टतेला महत्त्व देण्याऐवजी भावना, प्रेम, विश्वास, श्रद्धा, व्यवहार या गोष्टींची सरमिसळ करत व वैचारिक गोंधळात गटांगळ्या खात आम्ही जाणूनबुजून आमच्या आयुष्याचं दिवाळं का काढतो? आयुष्यात प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असणे आवश्यक आहे याबाबतीत दुमत असू शकत नाही. पण म्हणून आपल्या सगळ्यांसारख्या हाडामांसाच्या एखाद्या सामान्य माणसाला ‘महाराज’ ही उपाधी चिकटवून त्याच्या किती आहारी जायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? ‘महाराजांच्या सल्ल्याशिवाय आमच्या घरातलं पानही हलत नाही,’ असे कौतुकाने ओथंबलेले शब्द अनेक घरांमधून जेव्हा ऐकू येतात तेव्हा मती गुंग होऊन जाते.अशा घरांमधील कर्त्या माणसांनी स्वत:च्या डोक्याचा, विचारशक्तीचा व निर्णयशक्तीचा वापर करणे कायमचे थांबवून टाकले असेल का? एखाद्याला देव्हाऱ्यात बसवून त्याच्याकडे आपली अक्कल आणि अख्खं आयुष्य गहाण टाकण्याइतकं कोणाचं आयुष्य स्वस्त असतं का? इतर कुणाहीपेक्षा आत्मपरीक्षणाला आपला खरा गुरू मानून व आत्मविश्वासात अफाट वाढ करून जर प्रगतिपथावर दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली तर घरोघरी विवेकानंद निर्माण होण्यास किती वेळ लागणार आहे?
— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply