कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते. शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते. याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply