नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसर्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणार्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की “दृष्य ” सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की “आनंद ” हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणार्या, मन उल्हासीत करणार्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण “आनंद ” याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणार्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply