![p-31194](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2016/12/p-31194.jpg)
अखेर आज मी कोसळलो. खरं तर जगाचा निरोप घेण्याचं माझं वय नक्कीच नाही. माझ्या आसपास असलेले माझे सोबती अनेक वर्षांपासून ताठ मानेने उभे आहेत. मला मात्र अकाली मृत्यू आला यात शंकाच नाही. या न्यायालयाच्या आवारात गेल्या वीस वर्षांत घडलेल्या असंख्य घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. मला ऐकू येतं, मी बघू शकतो, पण निसर्गाने बोलण्याची देणगी मात्र मला दिली नाही. एका मोठ्या वादळात जेव्हा प्रचंड वेगाने वारे वाहू लागले तेव्हा माझा मृत्यू समीप आल्याचं मला जाणवलं आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून वेगाने सरकू लागला.
एक दिवस समोरच्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली एक तरुण स्त्री भर दुपारी ओक्साबोक्शी रडत बसली होती. मी मुका असल्यामुळे तिच्या रडण्याच्या कारणाची चौकशी करू शकत नव्हतो. पण बोलता येणारे दोन तरुण तिला बघून थबकले आणि त्यांनी तिच्या रडण्याचे कारण विचारले. काही महिन्यांचं कोवळं मूल कडेवर घेऊन घरी जात असताना दोन नरपशूंनी ते मूल हिसकावून व त्याला रस्त्याच्या कडेला भिरकावून तिच्यावर बलात्कार केला होता. न्यायालयाने त्या नराधमांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. तिची हृदयद्रावक कहाणी ऐकून ते कॉलेजवीर फिदीफिदी हसू लागले व तिला म्हणाले, ‘अगं वेडे, बलात्कारी माणसं काय समोर पुरावा उभा करून बलात्कार करत असतात की काय? ते निर्दोष सुटणारच!’ मला संतापाने भोवळ आली आणि त्याच क्षणी माझ्या फांद्या आणि पानांसकट त्या दोघांवर कोसळून त्यांचा चेंदामेंदा केला असता तर आयुष्य नक्कीच सार्थकी लागलं असतं असं मला वाटून गेलं, पण संतापाने धुमसण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही.
*****
गेल्या पंधरा वर्षांपासून जवळपास रोज त्याला मी इथे बघतो आहे. सुरुवातीचे काही दिवस मी त्याला न्यायालयाचा कर्मचारी समजत होतो, पण काही लोकांच्या बोलण्यावरून मला कळलं की, त्याने त्याच्या सख्ख्या भावावर इस्टेटीशी संबंधित केस टाकली आहे. त्याने या कोर्टात चकरा टाकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचं डोकं काळ्या कुळकुळीत कुरळ्या केसांनी सजलं होतं, पण आता त्याला चांगलं गरगरीत टक्कल पडलं आहे. खरं तर त्याचं वय खूप जास्त नाही, पण कोर्ट केसच्या काळजीने त्याला अकाली म्हातारं करून टाकलं आहे. घरी अनेक पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असूनही जमिनीचा एक लहानसा तुकडा भावाला मिळू नये म्हणून हा पठ्ठा पंधरा वर्षांपासून कोर्टात झगडतो आहे. साडेचारशे कोटी वर्षे वय असलेल्या या पृथ्वीवर अवघ्या साठ ते पासष्ट वर्षांचा एक छोटासा प्रवास करायला आलेली माणसं आयुष्य सत्कारणी लावण्याऐवजी पराकोटीच्या स्वार्थापोटी काय काय उद्योग करतात नाही?
*****
एका खुन्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने काढलेली सरकारी वकीलाची जंगी मिरवणूक बघून मी माझ्या आनंदाश्रूंना आवर घालू शकलो नव्हतो. जनसामान्य कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करत असतात. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी ती अगदीच आंधळी नाही हे बघून आपल्या न्यायपालिकेबद्दल अभिमानाने माझा ऊर भरून आला.
*****
एक दिवस एका व्हॅनमधून वरकरणी सुशिक्षित वाटणारे काही स्त्री-पुरुष हसत खिदळत उतरले. एखाद्या हिल स्टेशनवर मौजमस्ती करायला आल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. न्यायालयाच्या आवारात सुहास्य वदनाने फिरणाऱ्या माणसांचं दर्शन क्वचितच होत असल्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि माझी उत्सुकता ताणली गेली. त्यांच्या येण्याचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी मी कान टवकारले. स्वत:च्या वैवाहिक जीवनात पूर्णत: अयशस्वी ठरलेल्या त्या जोडप्यांनी एका सुखी, समाधानी आणि प्रगतिपथावर असलेल्या कुटुंबाला असूयेपोटी इमारतीतून हुसकावून लावण्यासाठी खोटी केस केली होती व त्या केसचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल याबद्दल सर्वांना पूर्ण खात्री होती; पण तसे न घडल्यामुळे आता त्या सुखी कुटुंबावर आणखी कोणत्या प्रकारे सूड उगवता येईल याची रसभरीत चर्चा कोर्टाच्या आवारातच सुरू झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फांद्या पसरवून मनुष्यस्वभावाच्या अगणित नमुन्यांचं दर्शन घेताना अनेकदा मोठ्याने ओरडून सर्वांना विचारण्याची इच्छा झाली – ‘का वागता तुम्ही असे?’
— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply