५ सप्टेंबर १८२६ मध्ये ब्राईटनमधील २४ क्राऊन स्ट्रीट या पत्त्यावर विल्यम विज्डेन यांच्या एका पुत्राचा जन्म झाला. वयाच्या १८ व्या वर्षी त्याची उंची होती फक्त ५ फूट ६ इंच आणि वजन जेमतेम ४५ किलो. अत्यंत शिडशिडीत आणि लक्षवेधक काहीही नसलेल्या जॉनने १८४५ साली ससेक्सकडून प्रथमश्रेणी पदार्पण केले. विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही. हा विक्रम कुणाला मोडायचाच असेल तर त्याला क्रिकेटच्या नियमांमध्येच बदल करावा लागेल !
एकूण १८६ प्रथमश्रेणी सामन्यांमधून एका बळीमागे सरासरी केवळ १०.३२ धावा मोजत त्याने एकूण १,०१९ बळी मिळविले. चौदाहून थोड्या अधिक धावांच्या पारंपरिक सरासरीने त्याने ४,१४० धावाही काढल्या. ही सरासरी त्या काळी उत्कृष्टच होती.
संधिवातामुळे वयाच्या सदतिसाव्या वर्षीच त्याला क्रीडासंन्यास घ्यावा लागला. पुढच्याच वर्षी – १८५४ मध्ये त्याने क्रिकेटपटूंचे पंचांग (क्रिकेटर्स आल्मनॅक) प्रकाशित केले. त्या वर्षापासून विज्डेन क्रिकेट आल्मनॅक आतापर्यंत दरवर्षी प्रकाशित होत आले आहे. क्रिकेटच्या दुनियेतील अधिकृत इतिहास असे आता त्याचे स्वरुप झाले आहे.
महान गॅरी सोबर्सने कसोटी कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांपेक्षा तब्बल ८,०३२ धावा जास्त काढल्या. कसोट्यांमध्ये त्याने काढलेल्या एकूण धावा आहेत आठ हजार आणि बत्तीस ! ५ सप्टेंबर १९७३ या दिवशी गॅरी सोबर्स आपल्या क्रिकेटायुष्यातील एकमेव एदिसा खेळला. सहा चेंडूंचा सामना
त्याने केला पण त्याला धाव काढता आली नाही. तीन धावांची भागीदारी त्याने केली.
क्रिस ओल्डच्या चेंडूवर यष्टीरक्षक बॉब टेलरकरवी तो झेलबाद झाला. क्रिस ओल्डचाच त्रिफळा उडवून गॅरीने गोलंदाजीत मात्र खाते उघडले. वेस्ट इंडीजचा हा पहिलाच एदिसा होता आणि आंतरराष्ट्रीय यादीतील हा आठवा एदिसा होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply