दैनिक देशोन्नती मध्ये आयपीएल मॅचेस सुरु असताना प्रकाशित झालेला प्रहार या सदरातील लेख.
मी गेल्या दोन आठवड्यांपासून आयपीएल क्रिकेटचे वस्त्रहरण करून त्यामागचे बटबटीत नग्न सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न आम्ही या सदरातून केला. आमचा हा प्रयत्न किती समर्पक होता याची प्रचिती आता सगळ्यांनाच येत आहे. देशोन्नती व आम्ही वगळता या खेळासंदर्भी रोखठोक भूमिका मांडायलासुद्धा कोणी तयार नाही, हे पाहून तर आम्ही अंतर्मुख होतो. थरूर-मोदी वादाच्या निमित्ताने आता जे काही बाहेर पडत आहे ते या खेळाचा, या खेळाचा खेळ करणार्यांचा पर्दाफाश करणारे ठरत आहे. आयपीएलमधील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीचा मुद्दा समोर येताच आपल्या एका मंत्र्याचा राजकीय बळी घेणार्या काँग्रेसने त्यानंतर हा संपूर्ण कचरा मुळातून उपसून काढण्याचा निर्णय घेतला आणि प्राप्तीकर खाते, अंमलबजावणी संचलनालय वेगाने कामाला लागले. पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री थेट या सगळ्या घडामोडींवर लक्ष आणि नियंत्रण ठेवून असल्याचे स्पष्ट होताच भारतातील क्रिकेटचे कर्तेधर्ते असणार्या शरद पवारांनी त्यांची भेट घेऊन चौकशींचा हा ससेमिरा थांबविण्याची विनंती केली असल्याची बातमी आहे. सरकारी यंत्रणा अशाप्रकारे या लोकांच्या मागे लागल्या तर देशातील क्रिकेटचा सत्यानाश होईल, क्रिकेटला कोणी प्रायोजक मिळणार नाही अशी भीती पवार साहेबांना वाटते. पवार
साहेबांच्या शब्दाला केंद्रात वजन असल्यामुळे कदाचित ललित मोदींना आयपीएलच्या आयुक्त पदावरून घालवून ही सगळी कारवाई थांबेल असे दिसते, परंतु पवार साहेबांनी आपले वजन असे चुकीच्या जागी आणि चुकीच्या कारणासाठी वापरू नये, असे आम्हाला वाटते. क्रिकेटने या देशाचा आधीच सत्यानाश केला आहे. त्यामुळे त्या क्रिकेटचा सत्यानाश होत असेल तर त्याची काळजी करण्याचे कारण नाही. खरेतर पवार साहेबांनी पुढाकार घेऊन हा कर्मदरिद्री खेळच या देशातून हद्दपार करायला हवा. या खेळाने देशाचे
कसे आणि
किती नुकसान केले आहे, हे आधीच्या दोन्ही ‘प्रहार’ मध्ये आम्ही स्पष्ट केलेच आहे. रिकामटेकड्या लोकांचा हा खेळ भिकारचोट देशातच खेळला जातो, असे आमचे स्पष्ट मत आहे आणि हे मत आजचे नाही, दहा वर्षांपूर्वी 4 जानेवारी 2000 रोजी लिहिलेल्या ‘क्रिकेट नव्हे देशद्रोह’ या ‘प्रहार’ मधूनदेखील तीच भूमिका आम्ही मांडली होती आणि त्यानंतर शक्य होईल तेव्हा आम्ही या खेळाला विरोध करीत राहिलो. क्रिकेटवेड्या भारतात आणि त्यातही मराठी लिहित असल्यामुळे, हा, इंग्रजी जर लिहिले असते तर मात्र काही आशा होती, कारण फक्त इंग्रजी समजणारे आणि बोलणारेच विचारवंत असतात असा या देशात समज आहे. त्यामुळे आमच्या विरोधाची दखल घेतली जाणे अपेक्षित नव्हतेच, परंतु आज काळानेच त्याचा सूड उगवला असे म्हणावे लागेल. आज या खेळाच्या नग्नतेची किळस लोकांमध्ये निर्माण झाली आहे. काळ्या पैशावाल्यांचा, कर बुडव्यांचा, देशद्रोह्यांचा खेळ म्हणून आता क्रिकेट आणि आयपीएल ओळखले जाऊ लागले आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही व्यक्त केलेली भीती आज खरी होत आहे. त्यामुळे किमान आता तरी पवार साहेबांनी या खेळाला आलेले बाजारू स्वरूप पाहता या खेळावरील आपले प्रेम बाजूला ठेवून आपल्या प्रभावाचा वापर करीत संधी आहेच तर कायमचे या खेळाला देशातून हद्दपार करायला हवे. शेव ी कोणत्याही खेळाची उपयुक्तता त्या खेळाचा खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक लाभ किती होतो, यावरच अवलंबून असते. या कसोटीवर क्रिकेट हा खेळ कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. खेळणारे 11 खेळाडू वगळता घरी चॅनलवर हा खेळ पाहत आणि रिकाम्या विचारांच्या पिंका टाकणार्या करोडो लोकांना ना कोणता शारीरिक व्यायाम होत नाही. बुद्धिबळासारखा मानसिक, बौद्धिक व्यायाम होतो तो केवळ पैसा आणि वेळेचा अपव्यय. आज जगातल्या कोणत्याही विकसित देशात म्हणजे अमेरिका, चीन, जपान, कोरिया, ब्राझील, चिली, मेक्सिको, मॉरिशस, अर्जेंटिना, जर्मनी, इटली, फ्रांस, रशिया डेन्मार्क, फिनलंड, झेक रिपब्लिक,
पोलंड, हंगेरी, कॅनडा, पेरु, इटली, बेल्जियम, ग्रीनलँड, सिंगापूर, स्वीडन, स्वीत्झर्लंड, लक्झेमबर्ग, तुर्की, क्युबा, स्पेन, पोर्तुगाल, आदी देशांमध्ये क्रिकेट खेळले जात नाही. तर भारत, पाकिस्तान बांगलादेश, झिम्बाब्वे, केनिया, वेस्ट इंडिज अशा मोजक्या अविकसित देशांतच हा दळभ्रद्री खेळ खेळला जातो आणि म्हणूनच बहुधा हे देश अविकसित आहेत. एखाद्या भिकारचोट खेळामागे इतका वेळ, इतकी श्रमशक्ती वाया घालविणे कुणाला परवडणार आहे? आणि कदाचित त्यामुळेच क्रिकेट न खेळणारे देश विकसित होऊ शकले असावेत. या खेळाचा उगम ज्या इंग्लंडमध्ये झाला तिथेही रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळविले जातात. कारण इंग्लंडमध्ये क्रिकेट ना कोणी खेळत ना बघत. तिथे फुटबॉलच्या तुलनेत क्रिकेटची लोकप्रियता कवडीभरदेखील नाही; परंतु भारताला कायम गुलामीच्या मानसिकतेत ठेवण्याचे षडयंत्र रचणार्या या ब्रिटिशांनी भारतात या खेळाची बीजे पेरल्यानंतर इंग्रजाळलेल्या विद्वानाने इंग्रज गेल्यानंतर इतके लोकप्रिय करून ठेवले आहे, की इतर सगळ्याच भारतीय खेळांनी इथे माना टाकल्या आहेत. आणि भारतीयांचे क्रिकेट वेड पाहून इंग्रजांनी तोंडात बोटे घातली आहेत. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे; परंतु कोणत्याही मैदानात जा, हॉकी स्टिक घेऊन कुणी खेळताना दिसणार नाही. उलट खेड्यापाड्यात गेलो तरी जिथे कुठे मोकळी जागा दिसेल तिथे तीन काड्या गाडून फळकूट आणि बॉल घेऊन अर्धवट शिकल्यामुळे शेतीवर जाण्याची लाज वाटणारी, ढुंगणावरची चड्डी वा पँट फाटलेली पोरं क्रिकेट खेळताना दिसतात. हा सत्यानाश आता पुरे झाला. आता क्रिकेट हा खेळ न राहता ते व्यसन झाले आहे आणि व्यसन हे निष्ठुरपणे एका झटक्यात सोडावयाचे असते. त्यामुळे सध्या जी काही घाण, गरळ आयपीएलच्या निमित्ताने बाहेर आलीय ते पाहता, हे ऑपरेशन आता गरजेचे आहे. माननीय पंतप्रधानांनी सुद्ध
ा
या क्रिकेटवर व या क्रिकेटला प्रायोजित करण्यावर बंदी घालावी. पवार साहेब पुढील
वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत. त्यांनी त्याचा नाद सोडावा आणि तो सोडल्याचे कळताच भारतीय खेळांना प्रोत्साहित करणार असे जाहीर केल्याबरोबर इतर अनेक मानाची पदे त्यांना भूषवायला मिळतील. तसेच या देशातील जनसामान्य त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनांचे अध्यक्षपद भूषविण्याची त्यांची क्षमता आणि ताकद आहे. एक आयसीसीचे अध्यक्षपद गेले तर काही बिघडत नाही; परंतु त्यांनी देशाच्या भल्यासाठी या खेळावर एक शेवटचा घाव घालावा आणि देशाच्या प्रगतीचे द्वार खर्या अर्थाने खुले करावे. या आयपीएल क्रिकेटमुळे 28,000 कोटी मनुष्यतास कसे वाया जातात, याचा उहापोह गेल्या लेखात केलाच आहे. शिवाय आता
काळा पैसा सफेद करून घेण्याचा एक उद्योग म्हणून या खेळाने आपले स्थान निर्माण केले आहे. दाऊद इब्राहिमचा पैसादेखील आयपीएलमध्ये लागला असल्याचे बोलले जात आहे. हा खेळच देशद्रोही असल्याने देशद्रोह्यांना त्याचे आकर्षण असणारच. त्यामुळे ही कीड आता नष्ट करणे गरजेचे झाले आहे. क्रिकेटच्या तुलनेत इतर अनेक देशी खेळ कितीतरी श्रेष्ठ आहेत, शिवाय अतिशय कमी खर्चिकही आहेत. कबड्डी, हॉकी, फुटबॉल, मल्लखांब, खोखो सारख्या खेळांतून जो शारीरिक व्यायाम मिळतो, जी मानसिक कणखरता निर्माण होते, त्याची तुलना इतर खेळांना येऊच शकत नाही. या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे करण्यासाठी पवार साहेबांनी प्रयत्न करायला हवे. कबड्डीला अजूनही ऑलिम्पिकमध्ये स्थान नाही, खोखो, मल्लखांब सारख्या खेळांचे तर जवळपास उच्चाटनच झाले आहे. सशक्त युवापिढी घडविणार्या या खेळांना राजाश्रय, रसिकाश्रय आणि क्रिकेटसारखी ग्लॅमर मिळायला हवे. ते होण्यासाठी आधी क्रिकेट या देशातून हद्दपार व्हायला हवे. हे करण्याची ताकद पवार साहेबांमध्ये आहे आणि त्यांनी जर ते केले तर उद्याच्या भारताचा इतिहास लिहिताना भारताला प्रगतिपथावर नेण्याचे काम करणारा एक द्रष्टा नेता म्हणून शरद पवारांचे नाव अग्राक्रमाने लिहिले जाईल. आणि
जनताजनार्दन त्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाला डोक्यावर घेतील आणि पंतप्रधानपदी नेऊन बसवतील. त्यामुळे आमची पवार साहेबांना विनंती आहे, की क्रिकेटची काळजी करण्यापेक्षा या क्रिकेटने देशाची जी वाताहात केली आहे, त्याची जरा काळजी करा. हा खेळ खेळ होता तोपर्यंत ठीक होते, आता तो जुगार्यांचा अड्डा झाला आहे, काळा पैसा पांढरा करण्याचे माध्यम झाला आहे, रंगेल पार्ट्या आणि स्त्री देहाचे सार्वजनिक उत्त्थान प्रदर्शन करण्याचे साधन ठरला आहे. हा खेळ आता खेळ राहिलेला नाही. आपल्या अनेक पिढ्या या खेळाने बरबाद केल्या, आता अधिक बरबादीची वाट पाहण्याची गरज नाही, संधी आहे, घाव घाला आणि सवाशे कोटीच्या भारताचे धन्यवाद पदरात पाडून घ्या! जेथे कोठेही हे सामने खेळले जातात तेथे तेथे सुरक्षिततेच्या नावाखाली स्टेडियमबाहेर आणि आत शेकडो पोलिसांचा ताफा तैनात केला जातो. वाहतूक नियंत्रणासाठी सर्व पोलिसयंत्रणा झटते. तरीही वाहतुकीची तासन्तास कोंडी होते. या बंदोबस्ताकरिता संबंधितांकडून एक पैसाही वसूल केला जात नाही. दुसरीकडे एखाद्या उद्योजकाला किंवा सर्वसामान्याला सुरक्षा हवी असेल, एखाद्या आर्थिक संस्थेला पोलिस संरक्षण हवे असेल तर ते पुरविल्या जात नाही आणि पुरविलेच तर दिवसाला बाराशे ते पंधराशे रुपये प्रतिपोलिस, खाते अग्रीम वसूल करते. त्यामुळे आयपीएलच्या या तमाशाकडे पाहून या देशातील छोटे-छोटे उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक म्हणत असतील की ……
आम्ही गाळावा घाम, भरावा करबदली मिळतो मनस्ताप इनाम! क्रिकेटची मस्ती करती नेता, अफसरगुंड, भ्रष्टाचारी आणि नमकहराम!’ धन्य आहे भारत सरकारकाय अजब आहे तुझे काम!
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.
Leave a Reply