हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा पृथ्वी आणि सूर्याचे कडाक्याचे भांडण झाले. सूर्य रागाने लाल झाला. त्याच्या उष्णतेने पृथ्वी तापू लागली. तीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. सूर्याचे प्रखर तेज तीला सहन होईना. पृथ्वीवरचे प्राणी होरपळून गेले. शेती-भाती करपू लागली. पाणी आणि अन्नाचा दुष्काळ पडला. हिरवीगार पृथ्वी करपून काळवंडली. जमिनीला भेगा
पडल्या.
पृथ्वीने सूर्याची मनधरणी केली, क्षमा मागितली. पण व्यर्थ ! सूर्याला पृथ्वीची दया आली नाही. पृथ्वी भितीने थर थर कापू लागली. पृथ्वीची दयनीय अवस्था झाली होती.
आभाळाला पृथ्वीची दया आली. आभाळाने पृथ्वीवर छाया धरली. सूर्याची प्रखर उष्णता कमी झाली. परंतू पाणी आणि अन्नाच्या दुष्काळाने जीवजंतू तडफडत होते. हे बघून आभाळाच्या डोळ्यात पाणी आले. ते पृथ्वीवर पडले. पृथ्वी हिरवीगार झाली. पिके तरारली. प्राण्यांची क्षुधा शांत झाली. पृथ्वी आनंदली. पृथ्वी आभाळाला म्हणाली, “भावासारखा धावून आलास तू. तुझ्यामुळे मला नवचैतन्य मिळाले. धीर मिळाला. तू माझ्यापाशी रहा. पण तुझी आणि माझी भेट कशी होणार”? आभाळ पृथ्वीला म्हणाले, “ताई, मी तुला भेटायला येत आहे. तुला सदैव धीर देण्यास.” असे म्हणत आभाळाने पृथ्वीला मायेने मिठीत घेतले.
त्या दूरच्या डोंगरापलीकडे आणि अथांग सागरापलीकडे दिसते पृथ्वीला भेटणारे आभाळ. अनंत अवकाशाची सीमा ओलांडून पृथ्वीला मायेने भेटणारे आभाळ. त्यालाच म्हणतात “क्षितीज”.
— स्वाती ओलतीकर
Leave a Reply