रमाकांत , सुर्यकांत आणि मी कमलकांत असे आम्ही तिघे बागेतल्या वडाखाली आमचा खजिन्याचा नक्शा .. काढत होतो ….
आता हे कुठे बरे दडवायचे म्हणून जागा शोधत होतो ….. रम्याने घरून शिश्पेन्सील आणली होती … आता तिनेच खोदणे गरजेचे होते ……..
झाले म्हसोबाच्या मंदिरा मागच्या हौदा शेजारी एक जागा हेरून आम्ही तिथे ते पुरून ठेवले ……
रोज आम्ही तिथे जाऊन टेहळणी करत असू कि कुणी खणले तर नाही ना..??
जवळ पास तीन आठवडे झाले अजून कुणीच खणले नाही …..? आम्ही हि हळू हळू आता विसरू लागलो होतो … आणि नव्या खेळाला सुरुवात करत होतो ……
जवळ जवळ १६ वर्षांनी ….
रम्या आता कलेक्टर झाला होता ….. सूर्या सरपंच … आणि मी ….. मी पुण्याला नगर पालिकेत लागलो होतो ……
खूप दिवस झाले … गावाकडे जाने नाही झाले … म्हणून मुला बाळांना घेऊन आम्ही ….गावी जायचे ठरवले …..
ठरल्या दिवशी गावी पोहचलो सुद्धा …
सूर्या घरी बोलवायला आला होता ….
‘काय मग इंजीनर साहेब कवा येतासा घरी ??? ‘
–‘ अरे हे काय आलोच जरा हाथ पाय धुतो अन येतोच कि …’
‘ अहो आता तिथ घर न्हाय बा ….माळाकडं आहे ….. तिकडच या …..’
—‘ बर येतो बुवा …..तू हो पुढ हा आलोच आणि हा रम्या रे ??’
‘ ते बेनं तिथ कवाधरून बसलंय … या कि राव …..काय एवढा लाली पावंडर करतासा ?’
— ‘ बर्र आलो रे .. आता काय तू मला खांद्यावरून घेऊन जाणार आहेस का ??’
‘ तेवढ सोडून बोल यारा .. असं वंगाळ काही बोलू नकोस …. अर्र ३ वर्षा अगुदार आपली किती लोकं गेली माहितेय ?’
— ‘ का रे अशी कशी एकाच वर्षात ??’
‘ ठाव्व नाही गड्या .. पण पार एकमेकांचा खून करून गेलीत ..’
— ‘ हम्म असो आलो कि बोलू … बर्र चल … फारुख गाडी काढ रे …..’
फारुखने गाडी काढली अन आम्ही मळ्याकडे निघालो ….
तिकडे रम्या मस्त पैकी खुर्च्या मांडून बसलाच होता ….
‘ काय मग कमल…? काय भारी बीजी असतो रे ..? गावाकडं येणे नाही आता ?..’
— ‘ का रे अस का ,, येतो कि अस आधी मधी … तू बोल काय म्हणतोस …. कस काय …?’
‘ हम्म आपलं आहे विंचवाच बिर्हाड पाठीवर …जिथ बदली तिथे आम्ही …. तुमच काय ये ..जा… पुण्यातच …. मी आपलं बेळगावी पण जाऊन आलो ….’
— ‘ बरे ते सोड बाकी काय म्हणताय … सगळं व्यवस्थित ना ??…. ‘
‘ हम्म आहे म्हणा .. सार ठीक … अरे पण ह्या सूर्याचा सगळा बंधू परिवार गेला रे तीन वर्षा पूर्वी …..’
—‘ काय म्हणतोस कसा रे ….’
‘ अरे ते काय झाल …. अरे पण तू सूर्यालाच विचार की ..?’
–‘ बर्र अरे सूर्या सांग की मघाशी पण आपण असेच विसरलो की …..आता सांग ….’
‘ अव्व कमलराव ते काय झाल … म्हसोबाच हौद संपला होता ….तो नेहमीच कोरडा पडू लागला .. समदी म्हणू लागली की म्हसोबाला जाम तहान लागली म्हणून ..आता कुणी तरी तिथ मोठा हौद बांधला पाहिजे .. नाहीतर आपल काय खर न्हाय .. गावात दुष्काळ बी पडू लागला होता …..मग सांजच्याला पारावर समदी जमले अन ठराव पास केला की माझ्या बा ने दौलत बांगरने आपल्या जागेत नवा हौद बांधायचा …म्हणून मग काम सुरु झाले … नवा हौद बांधून झाला …..सगळ्यांनी तिथ नवा म्हसोबा बी आणला……अन आमच्या घराला पीडाच लागली …… समद्या अगोदर माझा चुलता पुंडलिक एका एकी गावच्या हिरीत मेलेला दिसला …. चार दिस होत न्हाई तोच त्याचा मोठा लेक बबन्या … मोमिनाच्या वडाकडे मेलेला दिसला…. त्याला झाडावरच्या पोळाने मारलं व्हत … ते काय नाही मी सांगतो काही तरी दुसराच डाव असावा ….हे होतंय नाय होतंय तेच पुढच्या अमावास्येला ….धाकले हऱ्या नाऱ्या दोघं एकमेकांच्या पोटात सुरा खुपसून पडलेली दिसली …….. काय खर नाही राव …. एकाच महिन्यात पार माझा खानदान खपला होता अन त्यातच माझा बा …. या समद्या धक्क्याने गेला ….अन नसत्या रस्ताने हे सरपंच पद माझ्या डोक्यावर आल …… तो म्हसोबा आता मी पार गाडून टाकला …..नकोच म्हणले ते ब्याद आपल्या घराला ……’
— ‘ अरे अरे रे काय म्हणतोस काय ….. पटकी येऊन माणस मरावी तशी खपली रे सारी …..खरच जाम वाईट झालं …. अस नको होतं घडायला ….. बर्र चल झालं गेल आता विसरून जा …. नव्या जोमाने जगायला शिक गड्या आता तूच गावचा सरपंच आहेस हे विसरू नको .. गावचा उद्धार कर … आम्ही आहोतच तुझ्या पाठी …. ‘
‘ व्हय ते तर आहेच .. होईल समदं नीट आपोआप…येळ गेलाकी सार नीट व्हतय बघा …’
मग इकडच्या तिकडच्या बाता मारत आम्ही दुपार जवळ केली …..
दुपारचं जेवण आटोपल्यावर आम्ही तीघ पुन्हा एकदा रपेट मारायला निघालो …..
अगदी त्या वडाखाली आल्यावर आम्ही अगदी थांबलोच…..अन आठवलं की अरे आपण तर इथेच खजिना ठेवला होता….. मग उगाच फारुख ला सांगून आम्ही ती जागा खणून घेतली ….
तिकडे तो हंडा सापडला … अन काय आनंद झाला तिघांना … हंड्यात रम्याची चित्र … सूर्याची बेचकी .. माझी कविता … अन अस बरेच काही तसंच होत …. आमचा खजिना आम्हालाच सापडला होता ….
रम्या तर त्याची चित्र पाहून गहीवर्लाच होता .. सूर्या त्याची बेचकी तपासून बघत होता ….. अन मी माझी ती कविता पुन्हा पुन्हा वाचत बसलो होतो ……
मग आठवले की चला जसा आपलं नक्शा होता तसं हे शोधू …..
आता आम्ही नक्ष्या प्रमाणे चालू लागलो …
आम्ही आमच्या पहिल्या खुणेवर येऊन पोहचलो ….ती म्हणजे आमच्या गावची विहीर…….जाम खोल असते बर्र का भरल्यावर …..पण इथेच सूर्याचा चुलता बुडून मेला होता ….. श्रद्धांजली वाहून आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो …. पुढची खूण होती मोमिनाचा वड … त्याच्या ढोलीत माणूस बसेल इतकी जागा होती ….पण इथेही सूर्याचा चुलत भाऊ बबन्या मेला होता … त्यालाही श्रद्धांजली वाहिली आणि पुढे निघालो ..पुढे ओढा पार केल्यावर सूर्याच घर होत तिथ त्याचे पाठचे अंगण हि एक खूण होती …. अन इथे मळ्यात हा वड शेवटची खूण ……झाले ….. खजिन्याचा शोध लागला …..
अन एका एकी जाणवले की त्या म्हसोबाच्या हौदा शेजारची जागा खणलेली होती …….
:- सुजित ( धवल ध्रुव )
— सुजीत शिंदे
Leave a Reply