नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे.
गणितात दोन प्रकारच्या परीक्षा असतात. लेखी आणि तोंडी. रैना आणि अर्णव लेखी परीक्षेत हुशार. प्रियाला फक्त तोंडी परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. राधाला मात्र सगळ्याचीच भीती वाटते.
राधाचे बाबा म्हणाले, “अरे मग तुम्ही चौघांनी मिळून अभ्यास करा. मग कुठली भीती? एकमेकांनी एकमेकाला शिकवा. काऽऽय?”
इतक्यात कुठूनतरी आवाज आला, आणि तो फक्त बाबांनाच ऐकू आला,“बाबा, मी कुणाला शिकवू?”
बाबांना कळलं नाही. ते म्हणाले,“अरे सगळ्यांनी सगळ्यांना शिकवा,.. म्हंटलं नाही का मी?ठ त्यावर पुन्हा आवाज आला,“हंऽऽ हूऽऽ”
बाबा कुणाशी बोलताहेत हे पाहण्यासाठी रैना व प्रियाने त्यांच्याकडे पाहिलं. रैनाला काय ते समजलं. प्रिया मात्र गोंधळली.
गणिताच्या परीक्षे आधी एक दिवस सुटी होती. नंतर मात्र दोन भागात परीक्षा होती. सकाळी लेखी परीक्षा. दुपारी तोंडी परीक्षा.
आदल्या दिवशी सगळे जण लेखी परीक्षेच्या अभ्यासाला बसले. पण का कुणास ठाऊक, त्याचं अभ्यासात लक्ष लागेना. आपोआप टिव्ही सुरू व्हायचा किंवा सिनेमातली गाणी ऐकू यायची.
मुले वैतागली.
रैनाने हळूच डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली.
उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली.
उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला.
मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत”
त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला.
आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“बोल रैना तुला काय मदत करू? जगातल्या सगळ्या गणितांची उत्तरं शून्य-शून्य करु? की सगळ्यांची गोल डोकी त्रिकोणी करु?”
“असलं काही नको रे भुता.” असं म्हणत, मग रैनाने मनातल्या मनात प्रेमळ भुताला सगळं सांगितलं. आणि पुढे म्हणाली “आता उद्या तूच आम्हाला मदत कर.”
“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
रैना सगळ्यांना म्हणाली,“मला वाटतं आपला अभ्यास झालाय. आता आपण खेळायला जाऊया.”
हे ऐकताच बाकीचे किंचाळत म्हणाले,“का।़।़य? अभ्यास झाला? नाही.. नाही! आम्ही करणार अभ्यास. हवं तर तू जा खेळायला.”
रैना खेळायला गेली. बाकीचे अभ्यास करत बसले.
परीक्षेचा दिवस उजाडला. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. शेवटच्या क्षणापर्यंत काही मुले पुस्तकात पाहून सूत्रं पाठ करत होती. तर काही मुले वह्या हातात घेऊन सोडवलेली गणिते पाहात होती. काही मुली भूमिती मधल्या आकृत्या पाहात होत्या. इतक्यात घंटा झाली. सगळी मुले आपापल्या जागेवर बसली.
हातात पेपरचा गठ्ठा घेऊन जोशी सर वर्गात आले. पाठोपाठ मुख्याध्यापक आले. मुलांकडे डोळे वटारुन पाहात म्हणाले,“लक्षात ठेवा, यावेळी जो गणितात नापास तो सर्व विषयात नापास! आणि नापास मुलांना या शाळेत जागा नाही. मला या शाळेत फक्त हुशारच मुलं हवी आहेत. कळलंय का? आणि म्हणूनच यावेळी गणिताचा पेपर मी मुद्दामहून एकदम कठीण काढला आहे. हा 100 मार्कंचा पेपर आहे. यात ज्याला 100 पैकी 100 मार्क मिळतील तोच पास. एक मार्क कमी मिळाला तरी नापास! आणि दुपारी 100 मार्कंची तोंडी परीक्षा आहे. त्यालासुध्दा हाच नियम लागू आहे. लेखी परीक्षेच्यावेळी मीच वर्गात बसणार आहे. तोंडी परीक्षा माझ्यासमोरच जोशी सर घेतील. कळलंय?”
जोशी सर घाबरुन, वर्गातून निघूनच गेले.
Leave a Reply