मुले आनंदाने किंचाळली,“वॉऽऽऽऽव! माहितिचं नाही की आज हे डब्यात आहे. चला खाऊया.. आडवा हात मारुया.” मुलांच्या किंचाळ्या ऐकून जोशी सर धावत आले. मुलांची खाऊ पार्टी पाहून तर त्यांना धक्काच बसला. डब्यात पोळी भाजि न आणता, हे असले पदार्थ? “आणि हे मुख्याध्यापकांना कळलं तर?” या भीतीनेच त्यांचं तोंड उघडलं.
इतक्यात अर्णवने चटकन त्यांच्या तोंडात तीन मोठे गुलाबजाम कोंबले आणि हातात चाळीस जिलब्यांची चवड ठेवली.
सरांच्या पाठोपाठ मुख्याध्यापक आले. तोंडात गुलाबजामचा बकाणा भरलेले व हातात जिलब्यांचा ढिगारा घेतलेले जोशी सर पाहताच, मुख्याध्यापक रागाने लालेलाल झाले. ते रागाने ओरडत म्हणाले,“द्या त्या जिलब्या इकडे.” आणि त्यांनी सरांच्या हातातल्या जिलब्या हिसकावून घेतल्या. त्या जिलब्या ते तोंडात कोंबणारच होते, पण..
त्याक्षणी मुख्याध्यापकांना कळलं की आपल्या काहीतरी विचित्र भास होतोय. कारण त्यांच्या हातात भरपूर खडू होते आणि सरांच्या हातात डस्टर. ते दोघे ही परत गेले. जाताना
मुख्याध्यापक हातातल्या खडूंकडे पाहात दात-ओठ खात होते. तर जोशी सर मात्र तोंड बंद ठेवून हळूच गुलाबजाम खात होते.
मुले मस्त चापून चोपून जेवली. वॉटरबॅगमधलं थंडगार सरबत प्यायली. तोंडी परीक्षेसाठी तयार झाली.
जोशी सर आणि मुख्याध्यापक वर्गात आले.
रैनाने हळूच डाव्या हाताची मूठ उजव्या हाताच्या तळहातावर घासत इशारा केला. खिशीफिशी हसत “ते आलं. रैना त्याला म्हणाली, “अरे आता आम्हा सगळ्यांनाच मदत कर. नाहीतर आमची घरी चंपी होईल.” ते खुसफुसलं, “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के”
सर म्हणाले ,“आता मी तुम्हाला एक गणित घालतो. मग मुख्याध्यापक ज्याला विचारतील त्याने गणिताचं उत्तर द्यायचं आहे. समजलं?”
सर्व मुलांनी माना हलवल्या.
“दाजीबाने विहिर खणण्यासाठी 4 माणसांना बोलवलं. त्यांनी एका तासात 6 फूट खड्डा केला..” सर पुढे काही बोलण्याआधीच वर्गात 5 माणसं आली. त्यातला दाजिबा कोपऱ्यात उभा राहिला. बाकीची 4 माणसे वर्गात दे दणादण खणू लागली. वर्गात सगळीकडे धूळ उडू लागली. मातीचे फवारे उडू लागले. मातीचे ढिगारे उभे राहिले. दगड धोंड्यांचा ढीग जमा जाला.
सर घाबरुन बाजूला सरकले. त्या 4 माणसांनी एका मिनिटात 6फूट खोल खड्डा केला.
मातीच्या एका ढिगावर बसत दाजीबा सरांना म्हणाला,“हं.. आता पुढे बोला ते गणित..”
सर भीत भीत म्हणाले,“काम लवकर होण्यासाठी दाजीबाने आणखी 3 माणसं बोलावली.. ..ठ
दाजीबाने हाक मारताच, वर्गात आणखी 3 माणसं आली. त्यांनी दे धपाधप कामाला सुरुवात केली.
वर्गातला हा सगळा प्रकार पाहताना मुख्याध्यापकांचा तर भीतीने गोठून पुतळा व्हायची पाळी आली.
दाजीबाने हातात दगड उचलत, सरांना बोलण्याचि खूण केली.
सर चाचरत म्हणाले,“4 माणसांनी एका तासात 6 फूट खड्डा केला, तर मुलांनो आता सांगा, 7 माणसांनी मिळून पुढच्या तासात किती खोल खड्डा केला असेल?”
दाजीबा हातातला दगड भिरकावत, वैतागून म्हणाला,“आवो सर, हे मुलांना काय विचारता? त्यांना काय कळणार? ज्यांनी खड्डे खणले त्यांना विचारा की. थांबा सर. मोजूनच सांगतो तुम्हाला.”
दाजीबाने खिशातून टेप काढली. दोन कामगार खड्यात उतरले. त्यानी मोजलं आणि म्हणाले,“हां, बरोबर आ” फूट.”
मुले पण ओरडली “आठ फूट.. आऽऽठ फूट.”
दाजीबाने विचारलं,“काऽऽय सऽऽर, बरोबर आहे ना उत्तर?”
मुख्याध्यापक चिरचिरत म्हणाले,“न..नाही! दोन तासात खड्डा जास्त व्हायला पाहिजे.”
दाजीबा रागावून म्हणाला,“कमालच आहे तुमची? सगळी माणसं एकाच स्पीडने काम करायला, ती का मशीन आहेत का हो मुख्याध्यापक? आणि या सदूच्या हाताला लागलंय ते
दिसलं नाही वाटतं तुम्हाला? आवो खड्याची गणित वहीत सोडवायची नाहीत तर मातीत खणायची! कळलं का?”
दाजीबा आपल्या कामगारांना म्हणाला,“चला गड्यांनो, आपण दुसरीकडे जाऊ.”
दाजीबा आणि त्याचे 7 कामगार निघून जाताच वर्गातला खड्डा बुजला.
मुख्याध्यापक घाम पुसत म्हणाले,“सर, दुसरं साधंच गणित घाला. त्यात कामगार-बिमगार कुणी नकोत हां.”
डोकं खाजवत सर म्हणाले,“ऐका मुलांनो, 2 पाणघोडे रोज 20 किलो गवत खातात.. .”
वर्गातलि बाकं पाण्यावर तरंगू लागली. जिकडे तिकडे शेवाळं तरंगू लागलं. चिखालाने बरबटलेले 2 पाणघोडे डबाक डबाक करत वर्गात आले. एका पाणघोड्याने मुख्याध्यापकांजवळ जाऊन मोठा जबडा उघडला, आणि हळूच म्हणाला,“नॉमॉस्कॉर सॉर.”
पाणघोड्याचा तो प्रचंड जबडा, टोकेरी दात आणि वळवळणारी जीभ पाहून मुख्याध्यापक जाम घाबरले. गडबडून खूर्चीतून खाली पाण्यात पडले.
मुलांनी पण पाण्यात उड्या मारल्या.
एक पाणघोडा तर टेबलावर बसत म्हणाला,“सॉर ऑमचं गॉवत खॉऊन झॉलंय. पुढचॅ गॉणित साँगा. मॉला तॉहॉन लॉगलीय हे लॉक्षात ठेवॉ..”
पाण्यात पडलेले मुख्याध्यापक आपले कपडे सावरत म्हणाले,“अरे याला पाणी पाजा आणि ही तोंडि परीक्षा संपवा.”
शेपटी हलवत पाणघोडे म्हणाले,“धॉन्यॅवॉद सॉर.”
पाणघोडे मटामट सगळं पाणी प्यायले.
एक पाणघोडा मुख्याध्यापकांकडे वळत म्हणाला,“ऑतॉ ऑम्ही पुन्हॉ कॉधी येऊ?”
मुख्याध्यापक धडपडत उठले आणि ते काही बोलण्या आधीच कसं कुणास ठाऊक पण जोशी सर म्हणाले,“रोज या. येताना तुमच्या मित्रांना पण घेउन या. खायला,प्यायला आणि लोळायला इकडेच या. ही शाळा आपलिच आहे समजा.”
पाणघोडे खॉऽऽ खॉऽऽ खॉऽऽ करत, गडाबडा लोळत हसू लागले.
मुख्याध्यापक जोशी सरांकडे रागाने पाहू लागले.
मुख्याध्यापकांकडे पाहात जोशी सर चाचरत म्हणाले,“म.. म.. मी नाही बोललो. माझ्या तोंडातून दुसरंच कुणीतरी बोललंय. खरंच.. हे पाहा मिस्टर पाणघोडे, मी खरंच बोलतोय.. ..”
हे ऐकताच मुख्याध्यापक रागाने किंचाळले,“काऽऽय?मी मिस्टर.. .. ..”
त्याक्षणी पुन्हा वर्ग आधी होता तसा चकाचक झाला.
सर त्यांना म्हणाले,“सुरू करुया का तोंडि परीक्षा? मुलांना आणखी एक गणित घालू?”
दोन्ही हातांनी कान दाबत मुख्याध्यापक म्हणाले,“नको. आता मला काही ऐकायचं नाही. ही सगळी मुले तोंडि परीक्षेत पण पास झाली आहेत.”
इतक्यात मुख्याध्यापकांच्या मागून एक गुळगुळीत आवाज आला,“मी पण पास झालोय ना सऽऽर?”
मुख्याध्यापक मागे न बघताच वर्गातून बाहेर धावत सुटले.
गणितात पास झाल्याने मुले वर्गात नाचू लागली.
तुम्हाला काय वाटतं,सरांच्या तोंडातून कोण बोललं असेल? तो गुळगुळीत आवाज कुणाचा असेल? असलि गणितं करायला तुम्हाला आवडतील?
“त्याने तुम्हाला काय मदत कराविशी असे वाटते?
प्रेमळभुताला नक्कि कळवा.
प्रेमळभूत तुमच्या पत्रांची व इमेलची नेहमीच वाट पाहात असतं.
प्रेमळभूत फक्त मुलांच्याच इमेलला उत्तर देते. कारण प्रेमळभूताला कोण आवडतं हे तुम्हाला माहितच आहे.
लक्षात ठेवा,“ओके..बोके..पक्के तर काम शंभर टक्के.”
– राजीव तांबे.
Leave a Reply