’शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार
होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही
निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही. खरे म्हटले तर हा न्याय जीवनाच्या
प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो. एखाद्या कुटुंबातील मुले नालायक निघालीत तर आपण सहजच म्हणून जातो, ‘पेराल ते उगवेल’.
याचा अर्थ हा की, त्या कुटुंबातील वडिलधारी मंडळी मुलांवर योग्य ते संस्कार करण्यात कमी पडली. मुलांवर जसे संस्कार झाले
तसे ते वागत आहेत. चांगले संस्कार झाले असते तर मुले निश्चितच चांगली वागली असती. थोडक्यात म्हणजे जसे पेरले तसे
उगवले. आपल्या रोजच्या वापरातल्या प्लास्टिकचेच उदाहरण घ्या. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या नानाविध प्रकारच्या
प्लास्टिकच्या वस्तू वितळवून तयार केलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंना दर्जा नसतो. त्या लवकर तुटतात किंवा फुटतात. त्या
वस्तूंचे बाह्य स्वरूपही चांगले नसते. याउलट शुद्ध स्वरूपातील प्लास्टिकच्या दाण्यांपासून तयार केलेल्या वस्तू दर्जेदार असतात.
पुन्हा तेच तत्त्व. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला लागू पडणारे किती मोठे हे तत्त्वज्ञान? पण
तुकाराम महाराजांनी किती साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि अल्प शब्दात सांगितले आहे?
आज संपूर्ण जगात पारजनुक तंत्रज्ञान (जेनेटिक टेक्नॉलॉजी) द्वारा विकसित बियाण्यांचा मोठा बोलबाला सुरू आहे. बी.टी.
कपाशीच्या रूपाने आपल्या देशातही या बियाण्यांचा प्रवेश झाला आहे. त्यापूर्वी आणि नेमके सांगायचे झाले तर 1960 च्या
दशकात संकरित बियाण्यांचे आगमन झाले.
या बियाण्यांमुळे आमच्या देशात हरितक्रांती
झाली, धान्याचे विक्रमी उत्पादन झाले,
अन्नाच्या क्षेत्रातील विदेशी राष्ट्रांवरचे परावलंबित्व संपले, अशा शब्दात संकरित बियाण्यांचे गोडवे गायले जातात. काही
मर्यादेपर्यंत हे खरे असले (देशात हरितक्रांती होण्यास संकरित बियाण्यांचे आगमन हा एकमेव पैलू कारणीभूत आहे, असे
अजिबात नाही.) तरी या संकरित बियाण्यांमुळे अन्नधान्याची, भाजीपाल्याची चव आणि सत्व हरवले, ही वस्तुस्थिती विसरता
येणार नाही. पन्नासच्या किंवा साठच्या दशकात ज्यांचा जन्म झाला असेल त्या वाचकांना, मला काय म्हणायचे हे बरोबर कळले
असेल. कारण त्यांनी आमचे परंपरागत बियाणे (तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास शुद्ध बीज) आणि
आजकालचे संकरित बियाणे अशा दोन्ही प्रकारच्या बियाण्यांपासून तयार झालेल्या अन्नधान्याची व भाजीपाल्याची चव चाखली
आहे. त्यामुळे त्यांना फरक बरोबर कळतो. आजच्या पिढीने शुद्ध स्वरूपातील परंपरागत बियाण्यांपासून तयार झालेले अन्नधान्य
किंवा भाजीपाल्याची चवच चाखली नाही तर त्यांच्या ध्यानात फरक येणार तरी कसा? पण या पिढीच्या शिलेदारांनी जर
त्यांच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना विचारले तर ते सांगतील की, गावरान ज्वारीच्या भाकरीला कशी अवीट चव होती,
तेव्हाच्या कोथिंबीरीला किंवा शेपूच्या भाजीला कसा जठराग्नी प्रदिप्त करणारा घमघमाट होता, तेव्हाच्या टमाट्यांना आकाराने छोटे
असले तरी कशी गोडी होती. मात्र दुर्दैवाने अधिक उत्पादनाच्या मृगजळामागे धावून आम्ही आमच्या हाताने आमची बरीचशी शुद्ध
बियाणी गमावून बसलो आहोत.
जे अन्नधान्य, भाजीपाला आणि फळ-फळावळांच्या बाबतीत तेच मनुष्याच्याही बाबतीत. पूर्वीच्या काळी लोक कसे धिप्पाड
असायचे. सहा – साडेसहा फुटाच्या खालचा माणूस अभावानेच आढळायचा. केवळ उंचीच भरपूर होती असे नव्हे तर हाडापेरानेही
ते तसेच मजबूत असायचे. महाराणा प्रतापांचेच उदाहरण घ्या. आज जिथे माणसांचेच वजन पन्नास किलोच्या पुढे सरकत नाही
तिथे हा माणूस 50 किलो वजनाचा भाला आणि तिस किलो वजनाची तलवार लीलया पेलायचा. केवळ पेलायचाच नाही तर
विद्युलतेच्या गतीने फिरवायचादेखील. इतिहासात असे दाखले आहेत की, महाराणा प्रतापांनी समोरच्या शिरस्त्राणधारी योद्ध्याच्या
डोक्यावर केलेला तलवारीचा वार त्याचे शिरस्त्राण कापून धडाची दोन शकले करीत त्याच्या बुडाखालच्या घोड्यालाही कापून काढत
असे. तिस किलो वजनाची तलवार आणि ती तलवार लीलया पेलणार्या महाराणा प्रतापांच्या मनगटातील ताकद यांचा मिलाफ
झाल्यानंतर दुसरे काय होणार म्हणा? दूर कशाला आपल्या नरवीर तानाजी मालुसर्यांचीही तलवार तब्बल 30 किलोची होती.
अशा अचाट शक्तीच्या सपुतांना जन्म देणार्या माताही धन्यच म्हणायला हव्यात. आज पुरूषांची सरासरी उंची पाच फूट तीन
इंचावर व वजन चाळीस किलोवर आणि स्त्तियांची सरासरी उंची चार फूट नऊ इंचावर व वजन पस्तीस किलोवर येऊन ठेपले
आहे. शंभरपैकी नव्वद स्त्तियांची निसर्गसुलभ प्रसूती होऊ शकत नाही. अशा किरकोळ स्त्री-पुरूषांच्या संकरातून उत्पन्न होणारी
प्रजा कशी असेल, याची सहज कल्पना करता येते.
अन्नातील सत्त्व किंवा कस संपला हेच मनुष्याची शारीरिकदृष्ट्या अधोगती होण्यामागचे कारण आहे. आज दाण्यांचा, फळांचा
आकार वाढला आहे, पण त्यामधील सत्त्व नष्ट झाले आहे. ‘फास्ट फूड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांनी पोट
भरल्यासारखे वाटते, पण भूक होत नाही कारण त्या पदार्थांमध्ये कस नसतो, असे आपण म्हणतो. पण खरे सांगायचे म्हणजे
आमचे संपूर्ण अन्नच आज त्या अर्थाने ‘फास्ट फूड’ झाले आहे. त्यामुळेच इंठाजीत विनोदाने ‘फास्ट फूड’ ला
‘जंक फूड’ म्हणूनही
संबोधतात. पूर्वी आमच्या देशात फळांपासून
मुरब्बे बनवून ठेवत असत किंवा आसव काढून ठेवत असत. आसव म्हणज अर्क.
इंठाजीत त्याला वाईन म्हणतात. फळांमधील क्रियाशील घटक आसवांमध्येही कायम असतो. त्यामुळे ज्या हंगामात एखादे
विशिष्ट फळ उपलब्ध नसते त्या हंगामातही त्या फळाच्या गुणांचा लाभ घेता येत असे. आमच्या दुर्दैवाने इंठाजांनी ‘वाईन मार्ट’
सुरू करून ‘वाईन’ ला म्हणजेच आसवांना बदनाम केले आणि फळांपासून आसव काढून ठेवण्याची आमची पूर्वापार चालत आलेली
परंपरा जवळपास संपली. आज तर ‘वाईन शॉप’ मध्ये वाईन नव्हे तर ‘अल्कोहोल’ च मिळते. ‘अल्कोहोल’ प्राशन केल्याने झिंग
येऊन शक्तिपात होतो तर दुसरीकडे ‘वाईन’ किंवा ‘आसवा’ मुळे झिंग तर येतच नाही पण शक्तीही मिळते. फळांपासून तयार
होणारे हे गुणकारी पेय आम्ही सोडून दिले आणि केवळ चव व वास (फ्लेवर) असलेल्या कृत्रिम सत्त्वहीन, निकस व कृत्रिम
पेयांच्या मागे लागलो आहोत.
मनुष्य जसा अन्नाच्या बाबतीत वनस्पतींवर अवलंबून आहे तसेच शाकाहारी प्राणीही अन्नासाठी वनस्पतींवरच अवलंबून आहेत.
त्यामुळे साहजिकच जे मनुष्यजातीचे झाले तेच इतर प्राणिमात्रांचेही होत आहे. शारीरिक अधोगती! पूर्वी आमच्याकडचे बैल कसे
धिप्पाड असायचे. आपापल्या खिल्लारी जोडीचे गुणवर्णन करताना मालक थकत नसत. आमच्या कृषिप्रधान देशाची शेती बव्हंशी
बैलांवरच अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या देशातील गायी जाणीवपूर्वक संपविण्यात आल्या आहेत. तसे नसते तर
बीजारोपणाची प्रक्रिया केवळ गायींवरच का करण्यात येते, म्हशीवर का नाही? या प्रश्नाचे उत्तर कुणी देईल का? आमच्या देशात
केवळ गायींचाच होस्टन, जर्सी आदी विदेशी जातींशी संकर घडवून आणण्यात आला. म्हशींवर हा प्रयोग अजिबात करण्यात
आलेला नाही. आमच्या देशी जातीच्या गायींचा विदेशी जातीसोबत संकर घडविल्यानंतर निर्माण झालेले बैल शेतीच्या अजिबात
उपयोगाचे नाहीत. पूर्वी आमच्याकडे बैल दिवसभर शेतात राबायचे. हे संकरित बैल मात्र अवघ्या दोन-तीन तासातच तोंडातून
फेस गाळायला लागतात आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैलांना खांदा नसल्यामुळे त्यांना नीट जुंपता येत नाही.आमचे
गोधन संपविण्याचा जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. हे खोटे वाटत असेल तर एकदा या आकडेवारीवर नजर टाका.
जगातील एकूण गायींपैकी केवळ पंधरा टक्के गायी आमच्या देशात आहेत. याउलट जगातील एकूण म्हशींपैकी तब्बल पंच्चावन्न
टक्के म्हशी आमच्या देशात आहेत. आता बोला?
या देशाला पुन्हा एकदा गुलामीत ढकलण्यासाठी टपून बसलेल्या अमेरिका, ब्रिटन आदी विकसित पाश्चत्त्य राष्ट्रांनी षडयंत्र रचून
आमची परंपरागत बियाणे आणि गोधन संपविण्याचा घाट घातला, ही वस्तुस्थिती आहे. परंपरागत बियाणे व गोधन संपवले की
शेती संपणार आणि शेती संपली की, अर्थव्यवस्था कोसळणार. दुसरीकडे अन्नधान्य निकस झाल्यामुळे शक्तिहीन,कमकुवत, रोगट
प्रजा उत्पन्न होणार आणि एकदा का अर्थव्यवस्था कोसळली की, रोगट आणि त्याचमुळे विरोधाची शक्ती गमावून बसलेल्या
माणसांचा हा देश ताब्यात घ्यायला कितीसा वेळ लागणार, अशी ही कुटिल नीती आहे. दुर्दैवाने हे समजून घेण्याची कुवत
नसलेले आमचे राज्यकर्ते विकसित पाश्चात्त्य राष्ट्रांनी फेकलेल्या जाळ्यात अलगद अडकले आहेत.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply