संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. मा. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply