नवीन लेखन...

गप्पा मारणे

सोशल मिडियावरचा नविन काळे यांचा हा ललित लेख शेअर करत आहे


उद्या रात्री आठ वाजता ‘गप्पा मारायला’ आमच्या घरी भेटायचं…’

असं आमंत्रण आलं की उद्याच्या गप्पा काही खास रंगणार नाहीत हे आता मला आधीच कळतं.

हो, आधीच कळतं. कारण ‘गप्पा मारणे’ ही वाटते तितकी साधी गोष्ट नाही. ती एक कला आहे. ती अनुभवाने आत्मसात करून घेता येते.

त्यासाठी रंगलेल्या आणि न रंगलेल्या अशा लक्षावधी गप्पांच्या फडांचे तुम्ही साक्षीदार असणं आवश्यक असतं. तुमच्याकडे समोरच्याला ऐकायचे पेशन्स असायला हवेत. समोरचा दमल्यावर तुमची स्वतःची वाफ खर्च करायची तयारी हवी. त्यासाठी स्वतःची महत्वाची कामं बाजूला ठेवायची तयारी हवी. प्रसंगी जागरणं करायची ‘योगसाधना’ हवी. गप्पा रंगणे किंवा न रंगणे यामधली अनप्रेडीक्टीबिलिटी पचवायची ताकद हवी. या अगदी बेसिक गोष्टी जमल्या की तुम्ही ‘गप्पा क्लब’चे क्वालिफाईड सभासद झालात म्हणून समजा.

आणखी एक. सुख जसं सांगून येत नाही, तशा गप्पा ‘ठरवून’ रंगत नाहीत. गप्पा ध्यानीमनी नसताना अचानक रंगतात. ठरवून फक्त बोलणी होतात. त्या गप्पा नसतात. गप्पा ऐसपैस असतात. अनिर्बंध असतात. गप्पा मारताना घड्याळ बघणं हा ‘फाऊल’ मानतात. गप्पा मारताना ‘गप्पा’ हीच प्रायोरिटी असते. बाकी सगळं झूट असतं. गप्पांना विषयांचे बंधन नसते. कुणाविषयी गॉसिप करताना सुरु झालेल्या गप्पा ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या एका ओवीपर्यंत येऊन थांबू शकतात. ‘थांबू शकतात’ असं दुर्दैवाने म्हणायचं. कारण गप्पांना खरं तर अंत नसतो. पूर्वीच्या ऋषीमुनींच्या यज्ञात असुर थैमान घालीत त्याप्रमाणे आता मोबाईलवर येणारे कॉल्स गप्पांमध्ये थैमान घालतात. आपण कुणाशीतरी जगजीतच्या एखाद्या गज़लविषयी बोलत असतो आणि नेमकं त्याच वेळी ‘फोनवरच्या बायकोला’ पुढल्या पाच मिनिटात अर्धा किलो तुरीची डाळ हवी असते. गप्पांना अपूर्णतेचा शाप असतो. गप्पा पूर्ण होऊही नयेत. गप्पा पूर्ण होऊ शकणारही नाहीत.

गप्पा मारणारी घरं मला आवडतात. मी स्वतःला भाग्यवान मानतो की, अशा काही मोजक्या घरांनी मला आपलंसं केलंय. तिथे मी सैल होतो. सगळे मुखवटे गळून पडतात. मी काय बोलतोय, काय कपडे घातलेत, आत्ता कसा दिसतोय, हे बोलू का-ते बोलू वगैरे मुद्द्यांवर फार विचार करावा लागत नाही. अशी घरं सुरुवातीला चार-चौघांसारखी दगड विटांची असतात. मग हळूहळू त्यात जीव येऊ लागतो. तिथे राहणारी माणसं त्या भिंतीत प्राण फुंकतात. अशा घरांचे उंबरठे आपलं स्वागत करण्यासाठी नेहमीच आतुर असतात. इथे ‘बेल’ वाजवावी लागत नाही. ‘च्याssयला किती उशीर’ अशा प्रेमळ उद्गारांनी आपले स्वागत करणारे यजमान असतात. सोफ्यावर वगैरे न बसता आपण खाली मस्त पाय पसरून बसलो तर त्या घरातल्या मंडळींना त्यात काही ऑड वाटत नसतं. या घरातली चहा पावडर कधीही संपलेली नसते. हातपाय धुवून झाल्यावर यांच्या किचनमध्ये जाऊन लुडबुड करण्याचा आपल्याला अधिकार असतो. ‘मला भूक लागल्ये’ हे आपण तिथे निर्लज्जपणे सांगू शकतो. आपण जातो तेव्हापासून इथला टीव्ही बंद असतो. मग जेवणाची पानं घेतली जातात. जेवताना काहीतरी माफक बोललं जातं. मग सुरु होतो यज्ञ – गप्पांचा. पानातलं जेवण संपलेलं असतं. पण उष्ट्या हातांनी आपण बोलत राहतो. हात धुवायचीही गरज नाही, इतके कोरडे झालेत हात. मग नाईलाजाने उठून हात धुण्यासाठी काय तो ब्रेक. मग तोंडात बडीशेप ठेवून पुढली इनिंग सुरु होते. भरपूर जेवून जडवलेली शरीरे आता जमिनीचा आसरा घेतात. आता गप्पांना उधाण आलेलं असतं.

अकरा-बारा-एक…घड्याळाचे काटे निमुटपणे सरकत राहतात. इतक्यात किचनमधून ‘जागरणी कॉफीचा’ घमघमाट येऊ लागतो. सत्यनारायण पूजेतल्या प्रसादाचा शिरा जसा पुजेच्याच दिवशी सॉलिड लागतो, तसा या कॉफीचा स्वाद रात्री एक वाजता लागतो तसा कधीही लागत नाही ! कारण स्वाद त्या कॉफीत नसतो. तो ‘माहोल’ स्पेशल असतो. गप्पा कुठल्या विषयावर सुरु झाल्या होत्या, कुठे कुठे भरकटत गेल्यात आणि शेवटी कुठे येऊन संपल्यात हे जर तिथल्याच कुणी गुपचूप बसून लिहून काढलं तर आपल्या गप्पांची रेंज पाहून आपणच थक्क होऊन जाऊ. रात्रीच्या गप्पांची आणखी एक मजा असते. अतिशय थिल्लर विषयांवर सुरु झालेल्या गप्पा हळूहळू भावनिक आणि गंभीर होत जातात. रात्रीची शांतता, तो बाहेरचा काळोख या गंभीर गप्पांना एक छान पार्श्वभूमी तयार करत असतात. सगळं वातावरणच मग भारल्यासारखं होतं. मी अशा अनेक अनेक क्षणांचा साक्षीदार राहिलो आहे. काय जादू होते माहित नाही, माणसं या वेळी स्वतःच्या आत डोकावून बोलतात. जुन्या आठवणीमध्ये रमतात. हळवी होतात. त्या खोलीत एक मायावी शक्ती संचार करते. मधेच सगळे गप्प होतात. निःशब्द शांतता. मागे फक्त रातकिड्यांचा आवाज. असेच सगळे गप्प बसलो तर कोणीतरी म्हणेल,’बापरे, तीन वाजले. झोपू या.’ या एका ‘भीती’पायी कोणीतरी मग कसलासा विषय काढणार. परत सुरु…मघाशी मी ‘मायावी’ शब्द वापरला तो यासाठी की याच वेळी अनेकदा माणसं गप्पांमध्ये काही रहस्य फोडतात ! ‘कुणाला सांगू नका…’ अशा काहीश्या वाक्याने सुरुवात होऊन रहस्यभेद होतात. आता यावर पुढे चर्चा झाली नाही तर छातीवर भार येऊन हार्टअॅटेक या भीतीने आपण बोलत राहतो….मग गप्पांची ‘नशा’ चढते आणि आपली गाडी हळूहळू फिलोसॉफीवर येते. आयुष्याचा अर्थ, या अफाट सृष्टीतील आपले नगण्य अस्तित्व, माणसे अशी का वागतात, सुख म्हणजे नक्की काय, आपण सुखाच्या मागे किती पळतोय…वगैरे साक्षात्कार होत होत हळूहळू जांभया येऊ लागतात. जीभ आणि डोळे जड होतात. काही मिनिटांपूर्वी ‘जीवनाचा अर्थ’ उकलून सांगणारी माणसं आता ऑफिसमध्ये पडलेल्या उद्याच्या कामांचे दाखले देत झोपी जाऊ लागतात. खोलीत पूर्ण काळोख होतो. त्यातही आता झोप उडालेले किमान दोन असतातच. मग गादीवर पडल्या पडल्या गप्पा सुरु होतात. पारलौकिक जगातल्या मघाचच्या गप्पा आता सासूबाई, मोबाईलच्या किमती, लहान मुलं कशी जेवत नाहीत वगैरे लौकिक स्तरावर आलेल्या असतात.

वरकरणी हे सगळं वर्णन खूप विरोधाभासी आणि सामान्य वाटू शकतं. But I love this. I love this माहोल.

गप्पांनी माझं आयुष्य समृद्ध केलंय. गप्पा मारल्याशिवाय मी जगू शकत नाही. आवडत्या लोकांबरोबर, अनोळखी लोकांबरोबर गप्पा मारणे हा माझ्या आयुष्यातला ‘अन्न-वस्त्र-निवारा-ऑक्सिजन व वाय-फाय’ यांच्या नंतर येणारा महत्वाचा घटक आहे. नुसती गप्पा मारणारी माणसे काम कमी आणि बोलतात जास्त, या ओळीतले तथ्य, या ओळीतला आरोप मला सपशेल मान्य आहे. त्यासाठी एकांतवास सोडून कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा हे माझ्या आयुष्याचे संचित आहे. एक लेखक म्हणून मला गप्पांमधून लिहिण्यासाठी खूप विषय मिळतात हे जरी खरं असलं तरी माणूस म्हणून घडण्याच्या या प्रवासात पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे ‘गप्पा’ हे खूप महत्वाचे स्टेशन आहे. गप्पा तुम्हाला खुप शिकवतात. जगण्याची समज देतात. ‘गप्पा मारणे’ हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण भारतीयांनी ही कला नेहमीच जतन केली आहे.

—  नविन काळे

— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..