निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.
तो माणूस म्हणाला, ‘माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.
बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.
साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!
ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!
Leave a Reply