उन्हाळ्याचे दिवस होते.
सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं.
दुपारची वेळ होती.
गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं.
उन्हाने पाठ भाजायला लागली.
कानातून वाफा येत आहेत असं वाटू लागलं.
घसा सुका पडला.
जीभ कोरडी झाली.
डोळ्यांची आग-आग होऊ लागली.
शेपटी तापून-तापून पिळपिळीत झाली.
मग त्याने उड्या मारल्या..
लाथा झाडल्या..
झाडाला धरुन दोन पायावर उभं राहिला..
कान फिरवले..
पण ऊन काही कमी नाही झालं.
त्याने तोंड उघडलं आणि जोरात हँऽऽऽ फूर्रऽऽऽऽऽऽ खिंहॉऽऽऽऽ केलं..
तरीपण ऊन कमी नाही झालं.
त्याला कळेना आता काय करावं?
हे छोटे मूल, धावत-धावत आई जवळ गेलं.
आपल्या बाळाला पाहताच आईला सगळं कळलं.
आईने गाढवूची पाठ चाटली.
मायेने त्याच्या कपाळावरून जीभ फिरवली.
गाढव बाळाला खूप-खूप बरं वाटलं.
त्याने पण आईच्या पोटाला चाटलं.
आई म्हणाली, अरे बाळ गाढवू, ऊन तापू लागलं की उन्हात नाही खेळायचं.
झाडांच्या सावलीत बसायचं.
सावलीतच खेळायचं.
खेळ खेळून दमलं की सावलीतच निवांत पडायचं.
गाढवू उड्या मारत लाडाने म्हणाला,ठपण आई-आई त्या झाडांच्या सावलीत तर ती माणसांची मुलं आहेत. ती आम्हाला कधीच खेळायला घेत नाहीत ग. आणि आम्ही खेळायला गेलो ना तर ती मुलं आम्हाला उन्हातच हाकलून देतात.
आम्ही गेलो नाही तर आमच्या खोड्या काढतात.
आम्हाला उगाचच त्रास देतात.
आम्हा छोट्या छोट्या गाढवांना, ही मुले सावलीत येऊच देत नाहीत ग.
आई मला सांग, सावली काय फक्त माणसांच्याच मुलांसाठी आहे काय ग? आणि माझ्यासारख्या छोट्या गाढवांनी काय फक्त उन्हातच राहायचं काय ग?
आई गाढवूला प्रेमाने थोपटत म्हणाली, नाही रे बाळा.सावली तर तुम्हा सर्व मुलांसाठी असते रे!!
माणसं काय नी गाढवं काय, सावलीला सगळे सारखेच!!
जा, तुम्ही त्या लांबच्या दुसऱ्या सावलीत जाऊन खेळा बरं.
आईच्या अंगाला खसाखसा पाठ घासत गाढवू म्हणाला,ठआई ह्या वाईट उन्हामुळे माझ्या पाठीची आग-आग होते.. .. कानातून वाफा येतात.. .. .. डोकं तापतं आणि शेपटी पिळपिळीत होते.. ..
असं वाटतं… त्या लांबच्या सावलीत जाण्यापेक्षा…
थंडगार बरबरीत चिखलात मस्त मजेत लोळावं.
चिखलात लोळत खेळावं.
खेळताना चिखलाळावं.
गार गार मऊ मऊ चिखलाचं जाकीट घालावं.
आई आनंदाने खिंकाळली,“व्वाऽऽऽवा! माझा गाढवू आहेच हुशार!! आहेच हुशार!!!”
आई.. आई.. आणि आम्ही चिखलात लोळायला गेलो ना, की ती माणसांची मुलं काही तिकडे येणार नाहीत. का ते सांग बरं? शेपटी उडवत गाढवू ने ऐटित आईला विचारलं.
कान फिरवत आईने विचार केला.
तोंड वाकडं करत दातावरून जीभ फिरवत तिने विचार केला.
चवथ्या पायाने दुसरा पाय खाजवत तिने पुन्हा विचार केला.
मग मागच्या पायावर दोन उड्या मारल्या.
डोळे मोठे करत,शेपटी उडवत आई म्हणाली,नाही बाई माहित मला.मला नाही काही सूचत. खरंच नाही काही कळत.
गाढवूला खूप खूप-खूप आनंद झाला!
त्याने चार पायांवर वेड्यावाकड्या उड्या मारल्या.
कान ताठ करुन इकडम तिकडम शेपटी हलवली.
जमिनीवर लोळण घेतली.
आईच्या मानेला,पोटाला ढुश्या देत गाढवू म्हणाला, “अगं आई ती माणसांची मुले तर कसले-कसले कपडे घालतात. मऊ मऊ चिखलात लोळल्यावर त्यांचे कपडे चिखलाळणार नाहीत का? आपल्याला काय भीती? आपण तर सगळे नंगू-नंगू !! चिखलात जाऊन मस्त रंगू!!
आणि…
त्यांना काळजी कपड्यांची… मला काळजी उन्हाची!!”
शेपटीने एक अडम-तडम फटका मारत आई प्रेमाने म्हणाली, “अरे चावट्या! जा मग तिकडे लोळायला.
आणि…खिंखाँऽऽऽऽ
अरेऽऽ गाढवू लक्षात ठेव,चिखल अंगावर सुकला ना की…….”
“तुझ्या नंगू-पंगू गाढवूला उन्हाचा त्रास होणारच नाही!!
फुर्रऽऽऽऽखिंहॉऽऽऽऽ” असं म्हणत, आनंदाने खिंकाळत गाढवू चौखूर ऊधळला.
थंड बरबरीत,मऊ गुळगुळीत चिखलात मस्त लोळायला गाढवू धूम पळाला.
लांब जाणाऱ्या गाढवूकडे पाहात,गाढवीण आनंदाने म्हणाली,’खिंहाँऽऽऽऽ.
खरंच… …
सावलीत खेळणाऱ्या या माणसांच्या मुलांपेक्षा.. .. त्या चिखलात लोळणारं हे आपलं मूल हुशाऽऽर ग बाई!!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
– राजीव तांबे.
Leave a Reply