खड्या आवाजातली पांढरी सहा ची अद्भुत गायकी असलेले भरत बलवल्ली यांचा जन्म २८ मार्च १९८८ रोजी झाला.
भरत बलवल्ली हे लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज; विलंबीत, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयीत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणा-या भावना ही सर्व भरत बलवल्ली यांची बलस्थानं आहेत. भरत भरत बलवल्ली यांचे वडील तबला वादक असल्याने त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतंच, पंडीत यशवंतबुवा जोशी आणि पंडीत उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरत बलवल्ली यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. पंडीत तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले. लहानपणी बालगंधर्वासह अनेक थोरामोठय़ा गायकांची गाणी ते ऐकत होते, मात्र त्यांनी मा.दीनानाथांची गाणी ऐकली आणि आतूनच त्यांना असं जाणवलं की हे गाणे तर मी गाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्यांची पारायणं केली, भरत बलवल्ली आवाजातील दीनानाथांची गाणी श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासारख्या जेष्ठ संगीतकारांनी ऐकली, त्यांनी दीनानाथांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेलं. हा मुलगा हुबेहूब तसंच गातोय, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
भरत बलवल्ली यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती गणपतराव मोहिते ऊर्फ मा. अविनाश यांच्याकडून. मा.मोहिते हे तर दीनानाथांचे स्नेही व सहकारी. भरत बलवल्ली यांनी आतापर्यंत देश विदेशात सुमारे १५० हून अधिक मैफीली सादर केल्या असून लंडन मधल्या लेसिस्टर आणि कॉलीनडेल, स्वितझर्लंडमधल्या झ्युरीक, बाझल या परदेशातल्या मैफीली आणि स्वरांकीत मल्हार महोत्सव, दिनानाथ मंगेशकर स्मृती समारोह, पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, पं मल्लिकार्जून मन्सूर स्मृती समारोह, पं बसवराज राजगुरू स्मृती समारोह, सानरसखा संगीत महोत्सव या भारतातल्या मैफीलींचा त्यांनी गाजवलेल्या आहेत. देणे मंगेशाचे हा पं. दीनानाथ मंगेशकरांच्या गीतांवर आधारीत कार्यक्रम आणि भक्तीरस हा अभंग, भजने, निर्गुणी भजने, दोहे इत्यादींचा समावेश असलेला हे ही कार्यक्रम भरत सादर करतात. मा. दीनानाथ मंगेशकर ज्यापद्धतीने शास्रीय संगीत गायचे ती गायकी विलक्षण अवघड अशी गायकी आहे. भरत बलवल्ली यांनी या गायकीवर केवळ संशोधनच केलं नाही तर त्या गायकीचं शिवधनुष्य यथार्थपणे देणे मंगेशाचे या कार्यक्रमात पेलूनही दाखवलंय. याबद्दल मंगेशकर कुटंबातल्या पाचही भावंडानी याबद्दल त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्याचे विशेष आभारही मानले आहेत. भरत बलवल्ली यांना वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळली आहे. या व्यतिरीक्त भरत बलवल्ली यांना आतापर्यंत पंडीत विष्णू दिगंबर शास्त्री पुरस्कार, स्वर संस्कार, वाद्यसंगीतामध्ये पहिला क्रमांक आणि कै. विश्वनाथ पेंढारकर पुरस्कार, स्वरसाधना समिती लाईट क्लासिकल व्होकल्समध्ये प्रथम पारीतोषिक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन स्पर्धेत प्रथम पारितोषिक, कवी वसंत बापट गीत गौरव पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. भरत बलवल्ली यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मंगेश तेंडुलकर यांनी भरत बलवल्ली यांच्यावर लिहीलेला लेख
http://m.maharashtratimes.com/no/-/articleshow/6041852.cms
भरत बलवल्ली यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=3qm38hHBC9M
Leave a Reply