वाटल होत निदान आता तरी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील पण नाही ! कदाचित आपल्या देशातील निसर्गाच्या लहरीपणालाच ते मान्य नसावं कदाचित. आपल्या देशातील शेतकर्यांना निसर्गाचा लहरीपणा काही नवीन नाही या पूर्वी ही कित्येकदा आपल्या देशातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा शिकार ठरलेला आहे पण हल्ली हे नित्याचेच झाल्या सारखे वाटू लागले आहे. या वेळी शेतकर्यांच्या शेतावर निसर्गाने गारपीटांचा मारा करत जो काही तासाभराचा लहरीपणा दाखविला तो शेतकर्यांनाही अनपेक्षीतच होता. त्या गारपीटांच्या मार्याने शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अचानक हेरावून घेतला, शेतकर्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी केली. त्यांच्या कुटूंबावर जणू नांगरच फिरवला. ऐन निवडणूका तोंडावर असताना हे झाल्यामुळे आचारसंहिता व इतर कारणांमुळे शेतकर्यांना मदत ही वेळेवर मिळाली नाही, शेतकर्यांची परिस्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली. निसर्गाने त्यांना दगा दिला आणि सरकारने जवळ – जवळ पाठ फिरविल्यासारखी परिस्थिती असताना. गारपीटग्रस्त शेतकर्यांची हजारो एकर शेती गारपीटांखाली दबली गेल्यानंतर अगोदरच कर्जबाजारी असणार्या शेतकर्यावर आता ते आणखी वाढीव कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला. शेतकर्यांची स्वप्ने साकार होण न होण हे शेतीवर अवलंबून असतात ती शेतीच वाया गेल्यावर आपली स्वप्ने गुंडाळून बसलेल्या शेतकर्याच्या मनात आत्महत्येचा विचार चुकून का होईना येणारच.
आपल्या देशात शेतकर्यांच्या आत्महत्या काही नवीन नाहीत. वर्षानुवर्षे आपल्या देशात ‘शेतकर्यांच्या आत्महत्या’ हा विषय प्रसारमाध्यमे चघळता आहेत. पण त्यावरील ठोस उपाय अजूनही सापडला नाही. निसर्ग आणि निसर्गाचा लहरीपणा माणसाच्या ताब्यात नाही. त्याचा लहरीपणा तो माणसासाठी सोडणार नाही. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठीच प्रत्येक वेळी माणसालाच सज्ज रहावे लागेल. गारपीटांसारखे प्रकार वारंवार घडणार नाहीत असा विचार करून ते सोडल तर ते चालणार नाही. प्रत्येक वर्षी निसर्गाच्या अशा कोणत्या ना कोणत्या लहरीपणाचा शेतकरी शिकार ठरतच राहिला तर शेतकर्यांना आत्महत्या करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. अगदी सरकारही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यावर कोणती संकटे येऊ शकतात हे आता आपल्याला निरीक्षणाने लक्षात आलेले आहेच मग सर्व प्रकारच्या संकटांना सामोर जाण्यास शेतकर्यांने सज्ज असायला नको का ? शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तोच कोलमडला तर चालणार नाही. आपल्या देशातील त्या त्या राज्यातील शेतकर्यांचा विचार त्या – त्या राज्यातील राज्यसरकारणे करायला हवा ! पण शेतकर्यांवर संकट आल्यावर केंद्राकडे हात पसरण्याची वेळ येतेच का ? केंद्राची मद्त येईपर्यत काय शेतकर्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसायच ? शेतकर्यावर कोणतही नैसर्गिक संकट ओढावल की त्यांना ताबडतोब मदत मिळायलाच हवी. वराती मागून घोडे नाचवून त्याचा उपयोग काय ? सरकार आपल्या पाटीशी आहे. आपल्यावर कोणतेही संकट आले तरी त्यातून मार्ग काढत आपल्या हिताच संरक्षण करण्यास कोणतही सरकार सक्षम आहे हा विश्वास प्रथम शेतकर्यांच्या मनात निर्माण व्हायला हवा ! तो जोपर्यत तो निर्माण होत नाही तोपर्यत शेतकर्यांच्या आत्महत्या होतच राहणार. शेतीलाही उद्योगाचे स्वरूप प्राप्त करून दिल्यास कदाचित परिस्थिती बदलेल. पण जो पर्यत शेतकर्यांच्या खांद्यावर एक विश्वासाचा हात ठेवला जात नाही तो पर्यत शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणारच नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply