नितांतसुंदर निसर्गाशी जवळीक साधणं, डोंगरदऱयांच्या सहवासात रमणं यासारखा आनंद नाही. हा आनंद घेणारे; दुर्गभ्रमण आणि गिर्यारोहणाचा छंद डोळसपणे जपणारे आनंद पाळंदे यांनी `डोंगरमैत्री’ या पुस्तकामध्ये निसर्गनवलाईचे रसिकांना साक्षात दर्शन घडविले आहे.
श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते. गडाकडे कोणकोणत्या वाटांनी जाता येते, वाटेत कोणकोणती गावे आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत, साधारणपणे पोहोचायला किती काळ लागतो, तिथल्या सोई-गैरसोईंचा बारकाईने तपशील पुरवला आहे. गडाचे नकाशे आणि भरपूर छायाचित्रं हे पुस्तकाचं मर्मस्थान आहे. गिर्यारोहणातून मूल्यशिक्षण कसे देता येईल, याचे मार्गदर्शनही लेखकाने केलं आहे. त्यासाठी कोणत्या इयत्तेत कोणता अभ्यासक्रम ठेवल्यास तो फायदेशीर होईल, या बद्दलचे स्पष्ट मत नमूद केलेआहे. सोपी पण ठसठसीत भाषाशैली, चपखल शीर्षके, आग्रही आणि प्रेरक प्रतिपादन या सगळ्यांच्या जोडीला सखोल अभ्यासाने लेखन सजविण्याची पद्धत वाचकाला येथे दिसून येईल आणि गिरिभ्रमणाचा अनुभव घेण्याची प्रेरणा मिळेल. अंतरंगाचं प्रतिनिधित्व करणारं उठावदार मुख्यपृष्ट रसिकमनाला मोहिनी घालणारं आहे.
डोंगरमैत्री
लेखक : आनंद पाळंदे
प्रकाशकः उत्कर्ष प्रकाशन, पुणे- ४.
पाने : १४०,
किंमत- रुपये १०० /-
Leave a Reply