नवीन लेखन...

गीतकार मा.शांताराम नांदगावकर

आज १९ आक्टोबर…. आज गीतकार मा.शांताराम नांदगावकर यांची जयंती

जन्म: १९ आक्टोबर १९३६

“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.
मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. ‘पाहिले न मी तुला’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ही नव्हे चांदणी’, ‘दाटून कंठ येतो’, आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,’नवरी मिळे नवर्याला’, ‘बनवा बनवी’, पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. ‘ससा तो ससा’ हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती. अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.
एक आठवण मा.नांदगावकरांची.
१९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.
‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले. क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…?’ हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. मा.शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.शांताराम नांदगावकर यांना आदरांजली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ. विकीपीडीया
मा.शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
पहिले ना मी तुला
रजनीगंधा
रुपेळी वाळूत
हरी नाम मुखी रंगते
श्रीरंग सावळा तु

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..