ओरिसातील जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे ( भगवान श्रीकृष्णाचे) मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथेच घडलेली ही एक प्राचीन कथा आहे.
त्या नगरीत जयदेव नावाचा हरिभक्त राहत होता. श्रीकृष्णावरील भक्तीपोटी त्याने ‘गीत गोविंद’ हा ग्रंथ लिहिला. तो खूपच लोकप्रिय झाला. अतिशय प्रासादिक व मधुर रचना असलेला हा ग्रंथ घराघरात पोहोचला होता. त्या नगरीचा राजाही कृष्णभक्त होता. त्यानेही असाच एक ग्रंथ लिहिला होता. मात्र लोकांनी त्याचा फार स्वीकार केला नाही. राजाला त्याची फार मोठी खंत होती. त्यामुळे त्याने आपल्या राजसत्तेचा वापर करून आपला ग्रंथ लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही. नगरीतील प्रजा ‘ गीत गोविंद’ याच ग्रंथाचे पारायण करी.
त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. त्याने काही पंडितांना बोलावून यावर मार्ग काढण्याची सूचना केली. त्यावर पंडितांनी ग्रंथाबाबत जगन्नाथाचाच कौल घेण्याची राजाला विनंती केली. जगन्नाथाच्या मंदिरातील गाभार्यात जयदेव याचा ‘गीत गोविंद’ आणि राजाचा ग्रंथ असे दोन्ही ग्रंथ ठेवायचे. जगन्नाथाला जो ग्रंथ आवडेल तो गाभार्यात राहील व नावडता ग्रंथ मंदिराबाहेर पडेल, असे गृहीत धरून मंदिरात कौल मागण्यात आला.
दोन्ही ग्रंथ रात्री मंदिराच्या गाभार्यात जगन्नाथापुढे ठेवले गेले व सर्वाच्या समक्ष मंदिराला कुलूप लावण्यात आले. दुसर्या दिवशी राजासह सर्व लोकांना असे दृश्य दिसले की जयदेवचा ग्रंथ मंदिराच्या गाभार्यात आहे व राजाचा ग्रंथ मंदिराच्या बाहेर आहे.
जगन्नाथाचा कौलही आपल्या विरोधात गेल्याचे पाहून राजाही खूपच व्यथित झाला व त्याने मंदिरातच प्राणार्पण करण्याचे ठरविले. तलवारीने तो आपला शिरच्छेद करणार तेवढ्यात प्रत्यक्ष जगन्नाथ प्रकट झाले व त्यानी राजाला थोपविले. ते राजाला म्हणाले की, तुझ्या भक्तीबद्दल मला आदर आहे. मात्र जयदेवाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे यात मुळीच शंका नाही. मात्र तुझ्या ग्रंथातील चोवीस ओव्या जयदेव याच्या ‘ गीत गोविंद ‘ ग्रंथात घातल्या जातील.
ते ऐकून राजाचे समाधान झाले.
असे म्हणतात की, जयदेव याच्या त्या ‘गीत गोविंद’ ग्रंथात राजाने रचलेल्या चोवीस ओव्या नंतर लोकांना पहायला मिळाल्या.
Leave a Reply