प्रकाशाचा झोत हा असंख्य आणि एकमेकांना समांतर असणार्या किरणांचा बनलेला असतो. त्यामुळं जेव्हा तो एखाद्या सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या पदार्थावर पडतो तेव्हा परावर्तन झाल्यानंतरही ते किरण एकमेकांना समांतरच राहतात.
कारण प्रत्येक किरण परावर्तनाच्या नियमाचं इमानेइतबारे पालन करतो. समांतर असणारे किरण एकाच कोनातून पृष्ठभागावर येऊन पडत
असल्यामुळे मग त्यांचे परतीच्या प्रवासाच्या दिशेचे कोनही समांतर असतात. पण तोच पृष्ठभाग जर खडबडीत असेल तर मग त्याच्या निरनिराळ्या तुकड्यांशी होणारा येणार्या किरणांचा कोन सारखाच असत नाही. येणारे किरण जरी समांतर असले तरी ते जेव्हा पृष्ठभागाच्या विशिष्ट तुकड्यावर पडतात तेव्हा त्यांचा पृष्ठभागाशी होणारा कोन वेगवेगळा असतो. परावर्तित होताना त्यांनी नियमाच्या चौकटीतच राहण पसंत केलं तरी आता त्या परावर्तित किरणांचे पृष्ठभागाशी होणारे कोन वेगवेगळे असल्यामुळे ते एकमेकांशी समांतर राहत नाहीत.
त्यामुळं परावर्तित प्रकाश विखुरल्यासारखा होतो. त्याचा झोत एकसंध न राहता धूसर, पसरट होतो. संथ जलाशयात डोकावणार्या चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. एकाच जागी राहून ते झळाळत असतं. पण त्याच जलाशयात जर खळबळ माजली असेल तर मग त्याचा पृष्ठभाग सपाट राहत नाही. तो दंतुर बनतो. साहजिकच डोकावणार्या चंद्राचं प्रतिबिंब धूसर बनतं. त्याच्या प्रकाशाचा एक लांबलचक पट्टाच त्या जलाशयावर उमटतो.
चित्रसंदर्भः संथ जलाशयातील चंद्राचं प्रतिबिंब, समुद्राच्या पाण्यावरचं चंद्राचं प्रतिबिंब, खडबडीत पृष्ठभागावरून होणारं किरणांचं परावर्तन
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply