नवीन लेखन...

घराणेशाहीची अपरिहार्य चौकट



‘आपण शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला लादत नसतो’ असे म्हणत सेनाप्रमुखांनी नातू आदित्यला शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणून पेश केले. त्यामुळे शिवसेनेतील घराणेशाहीविषयी चर्चा सुरू झाली. अलीकडे प्रत्येक पक्षात घराणेशाही दिसते. काँग्रेसने तर ही परंपरा आजवर जपली. आश्चर्य म्हणजे घराणेशाही आणणार नाही असे सांगणारे प्रत्यक्षात त्याचा पुरस्कार करतात. घराणेशाही ही राजकारणातील अपरिहार्य चौकट बनली आहे.

खरे तर आता घराणेशाहीची चर्चा करण्याची आणि तिच्यावर टीका करण्याची काही सोय राहिली नाही. लोकशाहीशी विसंगत अशी ही घराणेशाहीची

परंपरा निर्माण केली त्या गांधी-नेहरू घराण्याने तर त्या संदर्भात दीर्घकाळ टीका होऊनही चार ते पाच पिढ्यांपासून जारी ठेवली आहेच पण त्यांच्यावर टीका करणार्‍यांनीही ती निर्ढावलेपणाने जारी ठेवली आहे. शरद पवार, लालू प्रसाद यादव, यांनीही आता आपल्या रक्ताचे वारस राजकारणात आपल्या जागांवर आणायला सुरूवात केली आहे. आता राजकारणात आपली घराणी प्रस्थापित करायला किती जणांनी सरूवात केली याची यादी करायला लागलो तर आगामी काळात सामान्य कुळातील पण अंगी नेतृत्वगुण असलेल्या तरुणाला राजकारणात करीअर करणे किती अवघड जाणार याची चिंता लागून राहते. राहुल गांधी सामान्य तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन करत आहेत. पण त्यांच्या घराणेशाहीतून अशा तरुणांना राजकारणात प्रवेश करण्याची सोय राहिली नाही आणि ती रहावी असे वातावरण तयार करण्याचा कसलाही प्रयत्न राजीव गांधी यांनी केला नाही.

आता विलासराव देशमुख, नारायण राणे, शरद पवार, छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे यांनी आपली घराणी प्रस्थापित केली आहेतच पण गोपीनाथराव मुंडे यांनीही आपल्या घराण्याचा झेंडा उंच रहावा अशी व्यवस्था केली आहे. या सगळ्यांच्या घराण्यातील दुसर्‍या पिढीचे प्रतिनिधी आता राजकारणात आले आहेत. पण काही घराण्यांनी तियार्‍या पिढ्याही राजकारणात उतरवल्या आहेत. सोलापूरच्या मोहिते-पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. त्यांच्या घराणेशाहीला आणि मक्तेदारीला सोलापूर जिल्हयात मोठा विरोध होत असतो. त्यातूनच विजयसिंह मोहिते-पाटील यांना पंढरपूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. तो पराभव करणार्‍या भारत भालके यांनी मोहिते-पाटलांच्या घराणेशाहीच्या विरोधात रान पेटवले. मात् र, निवडून येताच भालके यांनी आपल्या मुलाला राजकारणाच्या मैदानात उतरवण्यास सुरूवात केली आहे. घराणेशाहीच्या विरोधात रान पेटवून आपली घराणेशाही रुजवण्याचा हा प्रयत्न म्हणजे शुद्ध धूळफेक म्हणायला हवी.

या पार्श्वभूमीवर आता ठाकरे घराण्याच्या तिसर्‍या पिढीने जाहीरपणे राजकारणात तलवार हाती घेऊन उडी घेतली आहे. शिवसेनेच्या नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आपल्या नातवाला म्हणजे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्यला पेश केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा प्रमुख कोण हे आता ठरले आहे. शिवसेनेत इमानेइतबारे काम करून कधी ना कधी सर्वोच्च पद प्राप्त करण्याची मनिषा कोणी बाळगत असेल तर त्याला आता पुढची 60 ते 70 वर्षे या पदाची आशा धरता येणार नाही अशी व्यवस्था झाली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी नातवाला पेश केलेच पण तसे करताना आपण ठाकरे कुटुंबाला शिवसेनेत लादत नसतो अशी मखलाशी करायलाही ते विसरले नाहीत. अशी मखलाशी करत त्यांनी शिवसेनेत तिसरी पिढी लादली आहेच.

खरे तर शिवसैनिक बाळासाहेबांना देवासारखे मानतात. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणेच याही पक्षाचे अनुयायी आदित्यचा हा उदय नाइलाजानेच काय पण आनंदाने स्वीकारतील यात शंका नाही. खरे तर बाळासाहेबांनी कोणाला लादण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण पक्ष त्यांचा आहे. त्यामुळे त्या पक्षात ते वाटेल ते करू शकतात. आपले निर्णय आवडत नाहीत त्यांना बाहेरचा दरवाजा मोकळा आहे असे ते म्हणू शकतात कारण बाळासाहेबांच्या पक्षात ते म्हणतील तोच कायदा आणि नियम असतो. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. आदित्य म्हणजे सूर्य. या उगवत्या सूर्याला कोणाचा विरोध होणार नाही कारण आपल्याकडील राजकारणात उगवत्या सूर्याला अहमहमिकेने नमस्कार करण्याची प्रथाच आहे. केवळ ठाकरे यांनीच नव्हे तर मुलायमसिंग, येदीयुरप्पा, विलासराव यांच्यापर्यंत सर्वांनीच आपली घराणेशाही प्रस्थापित करताना, आढेवेढे घेतल्याचे नाटक केले आहे. मुलांनी राजकारणात यावे अशी आपली इच्छा नाही पण नाइलाजाने त्याला उतरावे लागत आहे असा अभिनय करतच या सार्‍यांनी मुलांना राजकारणात लाँच केले. त्यासाठी आपली सारी शक्ती आणि बुद्ध उपयोगात आणली. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी कसलेही आढेवढे न घेता सरळ आदित्याचा युवराज्याभिषेक केला असता तरी त्यांना

कोणी विरोध केला नसता. जनताही आता अशा घराणेशाहीला

रुळली आहे. पण राजकारणात या तिसर्‍या पिढीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे.

मुख्य म्हणजे शिवसेनेच्या या तिसर्‍या पिढीला नव्या युगाची नवी आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. या पक्षापुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते बदललेल्या वातावरणाचं. केवळ शिवसेनाच नव्हे तर इतरही संकीर्ण आणि तात्कालिक प्रश्नावर उभ्या असलेल्या पक्षांना या आव्हानांना तोंड द्यावे लागत असते. शिवसेना हा पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी उभा आहे. पण आता मराठी माणसाच्या हिताची कल्पना बदलत आहे. मुळात महाराष्ट्रात परराज्यातील लोक अपरिहार्य आहेत हे लक्षात येऊ लागले आहे आणि मराठी माणूसही आता मुलूखगिरी करु लागला आहे. केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगात आता मराठी माणूस दिसू लागला आहे. अशा वातावरणात साठाच्या दशकातली मराठी मुलांना नोकर्‍या नाहीत आणि तामिळ लोक नोकर्‍या पटकावत आहेत ही समस्या आता तशी तीव्र रहात नाही. या सार्‍यांचा विचार करता शिवसेनेला आपली उद्दिष्टे बदलावी लागणार आहेत. नवा अजेंडा हाती घ्यावा लागणार आहे. तरच ही तिसरी पिढी राजकारणात आपले स्थान कायम करू शकेल.

(अद्वैत फीचर्स)

— अभय अरविंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..