नवीन लेखन...

चढतेय विश्वचषकाची झिंग

 
आयसीसी विश्वचषक स्पर्धा केवळ दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या प्रमुख दावेदारांबरोबरच इतर देशही तयारीला लागले आहेत. भारताची सध्याची कामगिरी पाहता या विश्वचषकावर धोनीच्या शिलेदारांनी नाव कोरल्यास कोणालाच आश्चर्य वाटणार नाही. प्रश्न आहे तो अंतिम अकरा जणांच्या योग्य निवडीचा.जगाच्या दृष्टीने फूटबॉल हा

सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार आहे. फूटबॉल विश्वचषक स्पर्धा म्हणजे एक मोठा जागतिक महोत्सवच असतो. परंतु, भारतीय उपखंडात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये ब्रिटिशांनी क्रिकेट रुजवले. आज भारत या खेळातील महासत्ता म्हणून उदयास आला असून इतर देशही चांगली कामगिरी करत आहेत. क्रिकेट हा एक धर्म असल्याचे मानणार्‍या भारतीय उपखंडातच या वर्षीची आयसीसी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सामन्यांना प्रेक्षकांची तुडूंब गर्दी होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. ही स्पर्धा दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने क्रिकेटवेड्या प्रेक्षकांवर हळूहळू त्याची झिंग चढू लागली आहे. ही स्पर्धा भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे देश संयुक्तपणे आयोजित करणार होते. परंतु, पाकिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे तसेच दहशतवादाच्या धोक्यामुळे आता ती केवळ भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्येच आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार असून त्यातील नऊ संघांना कसोटी दर्जा प्राप्त आहे आणि इतर पाच संघ पात्रताफेरीतून पुढे आले आहेत.2011 विश्वचषक स्पर्धेसाठी ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन गट करण्यात आले असून ‘अ’ गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, कॅनडा आणि केनिया तर ‘ब’ गटात भारत, इंग्लंड, बांगलाद श,
दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. 19 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमधील ढाका येथे स्पर्धेचा पहिला सामना बांगलादेश आणि भारत या दोन संघांदरम्यान खेळला जाईल. प्राथमिक फेरी, सुपर 8, उपांत्य फेरी अशी ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत जाईल आणि 2 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाईल.ऑस्ट्रेलियाने यापूर्वी तीनदा विश्वचषक जिंकला असून हा संघ गतविजेता आहे. असे असूनही यावेळी भारताला ही स्पर्धा जिंकण्याची अधिक संधी असल्याचे बोलले जाते. अर्थात भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांमध्येही विश्वचषकावर नाव कोरण्याची क्षमता आहे. सध्या एकदिवसीय सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानावर असून त्यांच्या पाठोपाठ भारत, श्रीलंक, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड अशी क्रमवारी आहे. पाकिस्तानचे क्रिकेट अंतर्गत वादांमुळे संकटात सापडले असल्यामुळे त्यांना कोणीही विश्वचषकाचा दावेदार समजत नसले तरी त्यांचा संघ कधी कधी अफलातून कामगिरी करू शकतो. रिकी पॉटिंगला सध्या बोचर्‍या टीकेला सामोरे जावे लागत असले तरी किमान विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्याचे कर्णधारपद सुरक्षित असल्याचे बोलले जाते. चौथ्यांदा विश्वचषक जिंकून टीकाकारांची तोंडे बंद करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. इंग्लंडने गतवर्षीची ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवल्यामुळे त्यांचा संघही विश्वचषकाचा दावेदार बनला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याने त्यांना कमी लेखून चालणार नाही. न्यूझीलंडने नुकताच बांगलादेश आणि भारताच्या दौर्‍यांमध्ये सपाटून मार खाल्ल्याने सध्या विजेतेपदाच्या दावेदारांम ध
ये त्यांची गणना केली जात नाही.वेस्ट इंडिजचा संघ सध्या बराच धोकादायक मानला जातो. ख्रिस गेल, पोलार्ड यांच्यासारखे स्फोटक फलंदाज कोणताही सामना एकहाती फिरवू शकतात. तसेच ब्राव्हो, चंद्रपॉल यांच्यासारखे खेळाडूही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या या खेळाडूंना सूर गवसला तर ते देशाला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतील. पण, सध्या तरी क्रिकेटतज्ज्ञांच्या मते, विश्वचषक जिंकण्याची संधी भारतालाच आहे. एक तर ही स्पर्धा भारतीय उपखंडात होत असल्याने आपल्या खेळाडूंना येथील खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे. शिवाय भारताची फलंदाजीही बळकट आहे. जहीर खान आणि हरभजनसिंग यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजीची बाजूही भक्कम आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कुशल नेतृत्वाला सर्वांची योग्य साथ लाभली आणि क्षेत्ररक्षण चोख झाले तर भारताला विश्वचषक जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतीय प्रशिक्षण गॅरी कर्स्टन यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून भारतीय संघाची कामगिरी खूपच सुधारली आहे. कसोटी क्रमवारीत तर भारताने अव्वल क्रमांक पटकावला असून एकदिवसीय सामन्यांमध्येही हा संघ दुसर्‍या क्रमांकावर आहे.कर्स्टन आणि संघातील सर्व खेळाडूंचे संबंध चांगले असल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे असते. सचिन तेंडुलकरची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असल्याने हा विश्वचषक भारताने जिंकावा अशी खेळाडूंबरोबरच संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्या दृष्टीने संघाने जोरदार तयारीही सुरू केली आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर पाच एकदिवसीय सामने खेळणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांबरोबर दोन सराव सामनेही खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. पण, दक्षिण आफ्रिकेबरोबरील सामने विश्वचषक स ्
पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने फारसे उपयुक्त ठरणार नाहीत. कारण हे सामने दक्षिण आफ्रिकेत होणार असून विश्वचषक स्पर्धा भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळली जाणार आहे. या दोन्ही खेळपट्ट्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.या स्पर्धेच्या मानाने 2007 मधील स्पर्धेसाठी भारतीय संघाची चांगली तयारी झाली होती. परंतु, त्या वेळचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या काही चुकीच्या धोरणांमुळे आपली कामगिरी अगदीच सुमार झाली. आता तयारीसाठी फारसा वेळ शिल्लक नसला तरी भारतीय संघ पूर्ण बहरात आहे. सलामीला वीरेंद्र सेहवाग खेळणार हे निश्चित आहे. त्याच्याबरोबर ‘मिस्टर कन्सिस्टंट’ गौतम गंभीर किवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळू शकतील. या तिघांमुळे संघाला सलामीच्या जोडीची फारशी चिता नाही. सेहवाग सध्या पूर्ण भरात असल्याने त्याने चांगली सुरुवात करून दिल्यास कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवणे अशक्य नाही. पण, सचिन

तेंडुलकरने गेल्या वर्षभरात बोटावर मोजण्याएवढेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. दक्षिण आफि’केविरुद्ध ग्वाल्हेर येथे द्विशतक ठोकल्यानंतर तो एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्याला विश्वचषक स्पर्धेपूर्वी एवढी प्रदीर्घ विश्रांती देणे कितपत योग्य होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण, सचिनचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म पाहता त्याला ही स्पर्धा जड जाऊ नये.तेंडुलकर आणि सेहवाग सलामीला खेळल्यावर गंभीर तिसऱ्या स्थानावर ढकलला जाईल. परंतु, त्याने या स्थानावर खेळतानाही चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या निर्भेळ यशात त्याने कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली. युवराज सिंग केव्हाही सामन्याचे पारडे फिरवू शकतो. परंतु, सध्या तो फॉर्म आणि फिटनेसशी झगडत असल्याने बराच काळ संघाबाहेर आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याचे पुनरागमन होईल अस
वाटते. मधल्या फळीत धोनी, सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ तिवारी असे उत्तमोत्तम फलंदाज असून अंतिम अकराजणांमध्ये नेमके कोणाला खेळवावे ही समस्या धोनीपुढे निर्माण झाली आहे. युसुफ पठाणने स्फोटक फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज अशी दुहेरी उपयुक्तता सिद्ध केली आहे. विशेषत: न्यूझीलंडविरुद्ध शतकामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला असेल. युसुफ पठाणबरोबरच प्रविण कुमारही अष्टपैलू कामगिरीमुळे संघात दिसेल. फिरकी गोलंदाजांमध्ये हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझाचे नाव चर्चेत असेल. परंतु, त्यापैकी एकालाच संधी मिळू शकेल. हरभजन सिंगचा अनुभव आणि त्याला नव्याने सापडलेली फलंदाजीतील क्षमता यांच्या जोरावर त्याची निवड जवळजवळ निश्चित मानली जाते. द्रुतगती गोलंदाजांमध्ये झहीर खान, आशिष नेहरा, श्रीशांत आणि ईशांत शर्मा यांच्यामध्ये स्पर्धा असेल. एकदिवसीय सामन्यांसाठी आशिष नेहरा अधिक उपयुक्त मानला जातो. तर झहीर खान संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने त्याची निवड निश्चित आहे.कर्णधारपद, फलंदाजी आणि यष्टीरक्षण या तिन्ही जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळणार्‍या धोनीच्या क्षमतेबद्दल कोणालाही शंका नाही. परंतु, संघात अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान सहा आणि पार्थिव पटेल यांच्यापैकी एकाची वर्णी लागेल. न्यूझीलंड विरुद्ध पार्थिव पटेलने फलंदाजीत मोलाची कामगिरी केल्याने त्याची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. आता अंतिम अकराजणांमध्ये कोणाची निवड करावी या अवघड प्रश्नावर धोनीने योग्य उत्तर निवडले तर विश्वचषकावर नाव कोरणे अवघड नाही.(अद्वैत फीचर्स)

— महेश जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..