कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. “टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले.” तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली. आता काय उत्तर देणार तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला विचारले, चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग……. . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात. पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर दरवर्षीच्या बजेटमध्ये नेहमीच मुंबईकरांना मूर्ख बनवितातच.
संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे मूर्ख बनविता येईल याची आयडिया आली.
दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो. थोडे भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकला.
कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले. एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले.सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून उपमा वाढला. पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले. अश्या रीतीने अस्मादिकांनी चिंकीच्या सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.
मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप ताटात वाढलेली दुधीची भाजी संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी.
— विवेक पटाईत
Leave a Reply