तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो. शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो. इंच टेप आणि घेतलेली मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी नवीन कपडे मिळणार. शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे, त्या मुळे कपडे शिवून आल्यावर, चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.
नई बस्तीतून, तिलक बाजार कडे जाणार्या गल्लीत चुन्नी मियां यांचे दुकान आणि राहते घर होते. दुकान छोटेसे होते, एक बसण्यासाठी खुर्ची, समोर जुनाट टेबल आणि तेवढीच जुनी उषा सिलाई मशीन. त्याच गल्लीत अमजद कसाई याचे दुकान ही होते. (शोले पिक्चर लागल्या नंतर आम्ही मुलें त्याला गब्बर सिंग म्हणू लागली आणि त्याचा दुकानासमोरून जाताना मुद्दामून जोर जोरात शोलेतला संवाद म्हणायचे , पचास कोस दूर दूर के बकरे अमजद कसाई का नाम सुनकर…). असो. अमजद कसाई आणि चुन्नी मियां यांच्यात बोलचाल बंद होती. कारण ही तसेच होते. चुन्नी मियां यांनी कपडे बरबाद केले म्हणून शिलाईचे पैसे अमजद यांनी दिले नाही. चुन्नी मियां शिलाईचे पैसे मागायला गेले कि काही न काही बहाणा करून, अमजद भाई पैसे देण्याचे टाळायचे. अमजद भाई सारख्या दबंग माणसाकडून पैसा वसूल करणे चुन्नी मियां यांना शक्य नव्हते. माझा मुसलमान मित्र कालू (त्याचे खरे नाव काय होते, कधीच कळले नाही), आणि मी चुन्नी मियांच्या दुकाना समोरून जाताना नेहमीच मियाजींची फिरकी घेत असू. मियांजी, अमजदने आपके पैसे दिये कि नहीं. मियांजी ओरडतच म्हणायचे, नाम मतलो उस पाजी हरामखोर का? वह क्या समझता है, चुन्नी मियां के पैसे डुबायेगा, मेहनत की कमाई है. पैसे नहीं चुकाए तो देखना एक दिन उसकी मोटी गर्दन पकड़कर कोई बकरा ही उसे हलाल करेगा. सुबह सुबह आ जाते हो परेशान करने. भागो शैतानो यहां से. आम्ही हसत-हसत तेथून पळ काढायचो.
एक दिवस बघितले, मियांजीच्या दुकानासमोर, एक बकरा बांधलेला होता. सहज विचारले. कुर्बानी के लिए बकरा ख़रीदा है, म्हणत मियांजी बकऱ्याला आपल्या हातानी बदाम खिलवू लागले. कालूला राहवले नाही, वाह! मियांजी, यहाँ दो टैम रोटी के लाले पड़े हैं और बकरा बादाम पाड़ रहा है. चुन्नी मियां त्याचाकडे पाहत म्हणाले, यहाँ आके बंध जा, तुझे भी बादाम खिलाऊंगा आणि हाताने गळ्यावर छुरी फिरवण्याचा अभिनय केला. कालू ही कमी नव्हता, जोरात ओरडला, एक बादाम की खातिर बच्चे की जान लोगो, जहन्नुम में जाओगे मियांजी. चुन्नी मियां यांनी मारण्यासाठी काठी उचलली आणि नेहमीप्रमाणे आम्ही तेथून पळालो.
बकरीदच्या दोन-तीन दिवसांनी पुन्हा आम्ही मियांजीच्या दुकानासमोरून गेलो, बघितले, बकरा तिथेच बांधलेला होता. चुन्नी मियां ही उदास दिसत होते. मी विचारले, मियांजी क्या बात है, बकरे कि कुर्बानी नहीं दी क्या? मियांजी म्हणाले, बेटे दिल लग गया. मियांजी पुढे काही म्हणणार, कालू एक डोळा मिचकावित म्हणाला, क्या जमाना आ गया है. इन्सान बकरों से मोहब्बत करने लगें है. चाचीजान को बताना पड़ेगा. मियांजी जवळ ठेवलेला डंडा उचलत म्हणाले, बत्तमीज, शैतान, भाग यहाँ से. तेथून पळ काढण्यातच भलाई होती.
पुढे जवळपास एका आठवड्या नंतर, पुन्हा मियांजीच्या दुकानासमोरून गेलो या वेळी तिथे बकरा बांधलेला नव्हता. बकर्याचे काय झाले या उत्सुकता पोटी मियांजीना विचारले, मियांजी बकरा कहाँ गया? मियांजी म्हणाले, अमजद कसाई को बेच दिया, कई दिनों से नजर थी उसकी बकरे पर. मी विचारले, मियांजी पैसे दिए की नहीं दिए, या मुफ्त में उड़ा के ले गया. मियांजी म्हणाले, पूरे नगद २०० रूपये में बेचा है. ये बात अलग है इतने के तो बादाम ही खिला दिए थे, उस हरामखोर, पाजी बकरे को. फिर भी सौदा घाटे का नहीं रहा. कालूला राहवले नहीं, मियांजी आप तो उससे मोहब्बत करते थे, कसाई को बेच दिया, अब तक तो कट भी चुका होगा. चंद चांदी के टुकड़ों की खातिर मोहब्बत कुर्बान कर दी, लानत है आप पर. नेहमीप्रमाने मियांजी चिडले नहीं, म्हणाले उस कमीने से कौन महब्बत करेगा, बकरीद के पहले की रात, उसे बादाम खिला रहा था, उस नीच बकरेने ने इंसानी आवाज में मेरे कान में कहा, मियांजी, ख़बरदार मुझे कुर्बान किया तो, अगले जन्म में कसाई बनकर तेरी गर्दन पर छुरी चलाऊंगा. डर गया मैं. अब सवाल था, बकरे का क्या करें, अचानक अमजद कसाई का ख्याल आया. बेच दिया उसको. त्या वर कालू म्हणाला, तो अगले जन्म में अमजद कसाई कि गर्दन पर छुरी चलेगी. एक तीर से दो शिकार कर दिये मियांजी आपने. चुन्नी मियां खळखळून हसले.