‘’मी छत्री उगडली आणि पाऊस सुरू झाला,’’ हे दोन तरूणींच्या संवादातील एकीचे वाक्य माझ्या कानावर पडले. पण पाऊस पाडण्याची जादू ती छत्री उगडणार्या तिच्यात होती की तिने उगडलेल्या छत्रीत होती हे त्या देवालाच ठावूक कारण तिच्यासह तिच्या छत्रीला ही मी प्रत्यक्ष पाहिलेले नव्ह्ते. पाऊस म्ह्टला की पावसासोबत आपल्याला हमखास आवडते ती छत्री. मराठी साहित्यात पावसासोबत छत्रीला ही एक अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे. खास करून विनोदी साहित्यात ते स्थान अधिक अधोरेखीत होते. एकत्र कुटुंबपध्दती जवळ – जवळ नष्ट होऊन त्याजागी विभक्त कुटुंबपध्दती जोमाने वाढली त्यामुळे पुर्वी संपूर्ण कुटुंब आपल्यात सामावून घेणारी छत्री आकाराने लहान, इतकी लहान होत गेली की आता नवरा – बायको ही एकत्र एका छत्रीतून चालत नाहीत. पुर्वी माणूस पावसाळ्यात छत्री जीवापाड जपत असे अगदी नवरा बायकोला जपतो तसे पण आता हे चित्र बदलले आहे. आता माणूस छत्री कोठे ही विसरतो आणि आपण छत्री विसरलोय हे लक्षात आल्यावर तिला शोधण्याच्या भानगडीत न पडता तो सरळ नवीन छत्री विकत घेतो. मी पावसावर वीस- पंचवीस कविता लिहल्या पण छत्रीवर एकही कविता लिहली नाही. कदाचित माझा छत्री बाबतचा अनुभव तितकासा चांगला नाही हे कारण असावं . मला प्रत्येक वर्षी एक नवीन छत्री हमखास विकत घ्यावी लागते. अगदी पाऊस संपता संपता तरी कारण जगातील कोणत्याच नश्वर वस्तूवर आमच प्रेम नसल्यामुळे आंम्ही छत्रीची ही फारशी काळ्जी घेत नाही. पावसापासून संरक्षण करणारी एक वस्तू म्ह्णून आम्ही तिच्याकडे पाहतो. तशी ती जवळ नसली तरी आम्हाला काही फरक पडत नाही पण आपल्याकडे नवीन छत्री घ्यायला पैसे नाहीत अथवा आपल्या पावसात भाजण्याची भारीच हौस आहे असा कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून ! एका पावसाळ्यात मी माझ्या घराच्या दारात उभा होतो, मुसळ्धार पाऊस कोसळ्त होता, एक सत्तरीच्या वयाचं वृध्द जोडप पावसात भिजत जात होतं तर पावसापासून वाचण्यासाठी ते आमच्या दारा समोरच्या आडोशाला थांबल, त्यातील आजीबाईना घरी जायची घाई होती त्या आजोबांना भिजत चलण्यासाठी आग्रह करीत होत्या, नेमकी त्याच दिवशी मी एक नवीन छत्री विकत घेतली होती. मी ती छत्री त्यांना देत म्ह्णालो,’’ ही छत्री घेऊन जा जमेल तेंव्हा द्या परत ती छत्री मला परत द्यायला त्यांना कधीच जमले नाही आणि त्यानंतर कोणाला छत्री देणे मला जमले नाही. शाळेत असताना मी कधीच छत्री घेऊन जायचो नाही. शाळेत जाता – येताना मला पावसात भिजण्याचा छंदच होता असं म्हटल तर ते वावग ठरणार नाही माझ्या या छंदामुळे माझ्या डोक्यावर कधी – कधी एखादी रंगीत छत्री धरली जायची पण त्या छत्रीखाली ज्यावर कविता लिहावी अथवा सुचावी असं काही कधीच घडल नाही. माझा एक मित्र शाळेत जाताना कधीच छत्री घेऊन जात नसे त्याच्या या सवयीचा फायदा त्याच्या वर्गातील एका मुलीने उचलला ती रोज तिच्या छत्रीतून तिला घरी सोडू लागली. तिचा त्याच्यावर जीव जडला होता पण त्याचा…? शेवटी तो ही आमचाच मित्र आपण प्रेमाच्या बाबतीत कसे गाढव आहोत हे दाखविण्यात आणि पटवूनही देण्यात तरबेज…बिचारी…आता तिच्या छत्रीत इतकी जागाच नसते की त्याने तिच्यात शिरावं. पुर्वी छत्री जवळ असली तर माणूस क्वचित आणि किंचित भिजायचा पण हल्ली का कोणास जाणे पावसात छत्रीसह चालणारा माणूसच जास्त भिजलेला असतो. उन्हाळ्यात छत्री घेऊन चालणार्यांवर आम्हाला हसू येत आणि पावसात छत्री जवळ असतानाही भिजत चालणार्या आमच्यावर लोकांना हसू येत असेल कदाचित…छत्रीत ही जाती-भेद आहेत काळी छत्री पुरूषांची आणि रंगीबेरंगी छत्री बायकांची अथवा तशी ती असावी हा अलिखित नियम पण आंम्हाला रंगाच आकर्षण त्यामुळे अशी एखादी रंगी- बेरंगी पुरूषांची छत्री शोधण्यात आंम्ही आमचा बराच काल वाया घालविला होता. हल्लीच्या बायकांना पुरूषांच्या जवळ- जवळ सर्वच वस्तू वापरायला जमल्या पण पुरूषांना ते काही अजून जमलेले दिसत नाही. फार फार तर पुरूष बायकांची साडी लुंगी म्ह्णून वापरून लुंगी डान्स करू शकेल. पावसात नवरा-बायको आणि त्यांच्या मुलांनी एकत्र एका छत्रीतून चालणे हे निदान मुंबईत तरी दिवाळ स्वप्न पाहण्यासारखे आहे. बर्याच गुन्हयात गुन्हयाची उकल करण्याच्या कामी छत्रीचा बर्याचदा उपयोग झालेला असतो खास करून नवर्याने बायकोसोबत खोट बोलण्याच्या गुन्हयात… पुर्वी छत्रीला संपूर्ण खोलून पुन्हा जोडण्याचा आंम्ही यशस्वी प्रयत्न केला होता पण एका पावसात नवीनच घेतलेली फोल्डींगची छत्री पहिल्यांदा उगडता क्षणी तिच्या सर्वच्या सर्व तारा तुटलेल्या पाहिल्या आणि त्यानंतर छत्री दुरूस्त करण्याच्या भानगडीत आंम्ही कधीच पडलो नाही. आता आंम्हाला छत्रीची आठवण येते ती पावसाळा सुरू झाल्यावर तिला पावसात भिजताना पाहून…
— निलेश बामणे
Leave a Reply