छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते.
हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, मानेत अगर पाठीत, क्वचित वरच्या पोटात दाब आल्यासारखे दुखते. मळमळ होते, उलटी येते, धाप लागते, अंगाला घाम सुटतो व अकस्मात खूप थकवा जाणवतो. अंजायना पेक्टोतरिस या प्रकारात सहसा श्रमामुळे छातीत किंवा उपरोधित इतर ठिकाणी वेदना येते. ही वेदना विश्रांती घेताच शमते. हृदयविकाराचा झटका विश्रांती घेतानाच येतो.
छातीच्या मध्यभागी दुखण्याचे दुसरे नेहमी आढळणारे कारण म्हणजे अन्ननलिकेचा दाह होणे. असा दाह जठरातील आम्लयुक्त पाचकरस अन्ननलिकेत येण्याने होतो. कधी केवळ सौम्य जळजळ जाणवते, तर कधी हृदयविकाराच्या झटक्याकसारखी तीव्र वेदना होते.
मनाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, हे तर माहीत आहेच. चिंतातूर व्यक्तीला तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली, की छातीत, सहसा डाव्या बाजूला धारदार शस्त्र खुपसल्यासारखी जोरात वेदना येते.
काही वेळा शारीरिक श्रमानंतर विशेषतः हाताच्या स्नायूंच्या अतिश्रमाने, छातीच्या स्नायूत गोळा आल्याप्रमाणे वेदना येतात. गोळा गेला तरी वेदना रेंगाळते.
छातीचा फासळ्यांचा पिंजरा दर श्वसनाबरोबर कार्यरत असतो. फासळ्यांचे पुढचे टोक कूर्चेला जोडलेले असते. या कूर्चेतील सूजेमुळे छातीत मध्यभागाच्या डाव्या बाजूला दुखते. ही जागा एका बोटाने दाखविता येते व बोटाने दाब दिल्यास वेदना येते. इतर अनेक कारणांनी छातीत दुखू शकते.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई.
Leave a Reply