हिंदीत ‘शिक्षा’ चा अर्थ शिक्षण.
आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी ‘शिक्षा’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत,चाखल्या आहेत,गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत.
आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या आपल्याच मुलांपर्यंत ताकदिने पोहोचविल्या आहेत. मुलांशी गप्पा मारताना शिक्षेचे विविध प्रकार कळले तेव्हा अचंबितच झालो. शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे घराणी आहेत त्याप्रमाणेच या शिक्षा प्रकारात तीन मुख्य घराणी आहेत. त्या त्या घराण्याप्रमाणे शिक्षेचे राग,ठुमरी,टप्पा,ख्याल किंवा फ्युजन असे स्पेशलाइज्ड प्रकार आहेत. ‘घर,शाळा आणि क्लास’ ही शिक्षेची मुख्य उगमस्थाने किंवा घराणी!! संजानाची निबंधाची वही वाचत असताना,जाणवलं की, तिने नवीन निबंध अत्यंत खराब अक्षरात लिहिला आहे.
माझी उत्सुकता चाळवली. अचानक अक्षर खराब होण्याचं कारण काय असावं? तिने फक्त निबंधच खराब अक्षरात लिहिलाय की तिचे एकंदर अक्षर लेखनच खराब होउ लागले आहे? सहज म्हणून तिच्या वर्गात गेलो. संजानाच्या इतर वह्या चाळल्या. मला धक्काच बसला! गेल्या दोन दिवसांपासूनच तिचं अक्षर खराब होऊ लागलं आहे. मुलांना भेटायला ऑफिसमधे बोलावलं तर मुलांवर दडपण येतं, म्हणून मुलांशी गप्पा मारण्यासाठी शाळेत एक ‘गप्पा कोपरा’ आहे.
प्रचंड बेचैन होती ती! मला थोडाफार अंदाज आला होता. तरी खात्री करण्यासाठी म्हणून तिला प्यायला पाणी दिलं. तिच्या उजव्या हाताची तीन बोटं सुजली होती. तिला कुणीतरी शारीरिक शिक्षा तरी केली होती किंवा तिच्या बोटांना अपघात झाला असावा. तिचा उजवा हात हातात घेत तिला विचारलं तर…. एव्हढावेळ थोपवून ठेवलेला बांध फुटला व एक नवीनच गोष्ट समोर आली. संजानाच्या आईने तिला शिक्षा केली होती.
पट्टीने तिच्या हातावर मारताना,पट्टी आडवी न ठेवता ती उभी ठेवण्याची विशेष काळजी घेतली होती. म्हणजे पट्टीचे फटके जरी कमी मारले तरी मुलीला इजा मात्र अधिक होईल,हा त्यामागचा उदात्त हेतू होता.
संजानाशी बोलताना आणखीन एक नवीन गोष्ट समजली. आईने शिक्षा केली म्हणून संजानाला आईचा अजिबात राग आला नव्हता. किंबहुना शिक्षा नेमक्या कुठल्या कारणास्तव झाली हे सुध्दा तिला नीटसं आठवत नव्हतं. तरीपण तिचं हुंदके देणं थांबलं नव्हतं. तिला खूप भरून आलं होतं. दाटून आलं होतं. तिला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं. आम्ही बोलत बोलत ऑफिसमधे गेलो.
संजाना रिलॅक्स झाली,हळूवारपणे बोलू लागली…… त्यातूनच मला एक अनोखा साक्षात्कार झाला.आपली चूक झाल्याची संजानाला जाणीव होती.
पण शिक्षेच्या अलिकडची आई व शिक्षेच्या पलीकडची आई याबाबत तिचा फार गोंधळ झाला होता. शिक्षा करणारी आई तिला मान्य होती. किंवा असं म्हणता येईल की,‘शिक्षा करणार्या आईला ती समजून घेऊ शकत होती.’ संजानाला शिक्षा केल्यानंतर तिच्या आईत झालेला बदल तिला उमजत नव्हता,म्हणून ती व्यथित झाली होती.
शारीरिक शिक्षा केल्याने मुलांच्या फक्त शरीरालाच इजा होते असा कृपया गैरसमज करुन घेऊ नका. आणि त्यामुळेच मुले सुधारतात असा महागैरमज तर कधीही करुन घेऊ नका. शारीरिक शिक्षेमुळे मुलांच्या मनाला, त्यांच्या भावविश्वाला जबर धक्का बसतो. वरुन न दिसणारी पण त्यांच्या अंतर्मनाला होणारी जखम दिवस रात्र भळभळत राहाते. आणि ही ठसठस ते कुणाला मोकळेपणाने सांगू पण शकत नाहीत. शारीरिक शिक्षेमुळे आपलं मूल कायमचं दुखावलं जातं,याचं भान शिक्षा करणार्या मोठ्या माणसांना येतच नाही!
संजाना म्हणाली,“मी कधी रस्त्यातून चालताना पायाला ठेच लागली, किंवा खेळताना पाय मुरगळला तर आई माझी किती काळजी घेते. माझ्या पायाला मालीश करते. लागलं असेल तर औषध लावते. अशावेळी घरातली माझी कामंसुध्दा तीच करते.
पण हीच आई जेव्हा मला शिक्षा करते, मला उभ्या पट्टीने मारते आणि त्यानंतर जणूकाही काही झालेच नाही अशाप्रकारे कामाला लागते. मला किती लागलंय? मला किती दुखतंय? याचा विचारसुध्दा तिच्या मनात येत नाही! मला जवळ घेऊन माझ्या सुजलेल्या हातावरून ती हात सुध्दा फिरवत नाही!
मला ठेच लागल्यावर जवळ घेणारी आणि स्वतःच शिक्षा करुन मला दूर ढकलणारी, यातली खरी आई कोणती? का वागते आई असं?…” संजानाचा प्रश्न काही अगदीच चुकीचा नाही. आणि याचा अर्थ मुलांना काही शिक्षाच करु नये असा ही नव्हे. जर सगळेच उपाय थकले असतील तर आपला राग व्यक्त करण्यासाठी एखादी थप्पड मारणे इतपत समजणे शक्य आहे. पण मुलांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी एखादी चूक पुन्हा करू नये म्हणून त्यांना काठीने मारणे,चटके देणे अशा शारीरिक इजा करणार्या शिक्षा करणे हे सर्वार्थाने गैर आहे.
जबर शिक्षा करुन जर मुले सुधारली असती तर शाळा बंद करुन व्यायामशाळाच सुरु केल्या असत्या की सर्वांनी!
पालकांसाठी गृहपाठ ः
‘दोन तडाखे दिल्याशिवाय हा काही सुधारणार नाही’ असं जेव्हा मनात येईल त्या संघर्ष क्षणी स्वतःचाच चेहरा आरशात पाहा; आणि मनातले ‘ते वाक्य’ जरा जोरात म्हणा. पाहा चमत्कार होतो की नाही? मुलांना शारीरिक शिक्षा करणारे पालक हे मनाने कमकुवत असतात. आपले पालक असे असावेत असं समझदार पालकांच्या मुलांना कधीच वाटत नाही. तुमच्या मुलांना काय वाटतं ते मला कळवाल? तुमच्या ‘सुशिक्षित पत्रांची’ मी वाट पाहात आहे.
— राजीव तांबे
Leave a Reply