जगाने उरी जी धरावी गझल
अशी एक मजला सुचावी गझल
मला लोक हे गुणगुणू लागले
कुणी लाख माझी न गावी गझल
कथा मी लिहावी न कादंबरी
तुला भेट द्याया लिहावी गझल
रहावेत हे पाय जमिनीवरी
नभा स्पर्श करण्या उडावी गझल
हवेची जशी वाट बघते धरा
जिवाला तशी ओढ लावी गझल
कुणाची तरी पैंजणे वाजली
उघड दार आली असावी गझल
म्हणाला मला राम स्वप्नामध्ये,
‘‘ तुझी एक मीही विणावी गझल’’
तुझ्या सोबतीने फिरावी गझल
इथे बैस म्हणता बसावे तिने
‘‘निघू’’बोललो की निघावी गझल
जरी पाचशे शेर लिहिलेस तू
तरी का तुला ना मिळावी गझल
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply