खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.
माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतो. तीच्याजवळ एक दुसरी मुंगी आली. नंतर तीसरी. बघता बघता बऱ्यांच मुंग्या निरनीराळ्या मार्गाने तेथे जमल्या. सर्वजणींची हलचाल त्या मेलेल्या मुंगीभोवती होत होती. मुंग्यांचा आपसातील संवाद, मृतमुंगीला स्पर्ष करणे, कदाचित् हूंगणे, तिच्या अवयवाचा लचका तोडणे, तीला तेथून हलविण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक लहानसहान गोष्टी होत होत्या. सर्वांचा अर्थ वा उद्देश समजणे, ह्याचे अकलन होत नव्हते. यामागची निसर्ग योजना, काय असावी हे कळले नाही.
हां एक मात्र लक्षात आले. ज्या मुंगीला मारले व टाकले होते, ती मृत होता क्षणीच कोणती तरी प्रक्रिया सुरु झाली. कदाचित् एखादी गंध निर्मीती असेल, की ज्याच्या पसरण्याने संबंधीत जीवजंतूना त्याचे चटकन आकलन व्हावे. तो सजीव प्राणी मृत झाला, ह्याची सुचना मिळावी. त्या मृत देहावर निसर्ग प्रेरीत, वा योजीत सोपस्कार व्हावे. ह्याच साऱ्यांचा उद्देश फक्त एकच वाटला. आणि तो म्हणजे मृत झालेल्या देहाचे विश्लेषन Analysis होऊन त्याच्यामधल्या घटक पदार्थाचे पुनरुजीवन Recycling process व्हावी. कुणीही नाशवंत नाही. तो फक्त आपला आकार बदलत जातो. हे मनाला पटू लागते.
जीवन जशी एक चक्रमय क्रिया असते, तशीच मृत्यु ही देखील चक्रमय क्रिया असते. म्हणूनच म्हणतात जन्म-मृत्युचे चक्र.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply