गणेशाची लोकप्रियता चराचर व्यापली असून त्याच्या मूर्तीत अनेक लोभस रूपं दिसतात. लंबोदर, सुपासारखे कान असलेला, भक्तांवर दया करणारा, प्रकृतीपुरूषांच्या पलीकडचा असा हा गणेश सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. पृथ्वीतलावरील त्याचे आगमन जल्लोषात पण जबाबदारीने साजरे करायला हवे. आजच्या असुरक्षित सामाजिक वातावरणात तर जल्लोषाला जबाबदारीचे भान असण्याची नितांत गरज आहे.
अब्जावधी भक्तांचा लाडका श्रीगणेश पुन्हा एकवार अवतरला आहे. हा उत्सव जवळ आला की गणपतीची वेगवेगळी रूपे दर वर्षी आळवली जातात. एकदंत, चतुर्भुज, पाश अंकुश धारण करणारा, हाताची वरदमुद्रा असलेला, ध्वज मुषकचिन्हांकित असलेला गणपती मला भावतो. लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला, रक्तपुष्पांनी पुजलेला, भक्तांवर दया करणारा, सृष्टीच्या निर्मितीप्रारंभी प्रकट झालेला, प्रकृतीपुरूषांच्या पलीकडचा असा हा गणेश सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. अशा गणपतीची मूर्ती सहज लक्ष वेधून घेते आणि गणेशाकडे एकटक पाहताना आपले भान कधी हरपते ते कळतही नाही.
गणेशोत्सव हा मराठी माणसाचा उत्सव असला तरी आजकाल जगभरात हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती जगभरात पहायला मिळतात. जपानमध्ये त्तिमुख, कंबोडियामध्ये चतुर्भुज गणपती सापडतात. या मूर्तीही लक्षवेधी असतात. सर्वसाधारणपणे उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे मानले जाते. मात्र, मोर आणि सिंह ही सुद्धा गणेशाची वाहने असल्याचे लक्षात येईल.
आसनावर अथवा सिंहासनावर पद्मासनामध्ये बसलेल्या गणपतीची मूर्ती बर्याच ठिकाणी पहायला मिळते. गणपती नृत्यमुद्रेमध्येही सुंदर दिसतो. परंतु, नेत्यांच्या, साईबाबांच्या रूपातील गणपती मला आवडत नाही. कारण, त्यामुळे त्याच्या मूळ प्रतिमेला धक्का बसतो. तसेही आजचे नेते आणि गणपती यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. गणपती ही संकटांचा नाश
करणारी देवता आहे. तो विघ्नहर्ता आहे. अशा या गणपतीच्या आगमनाने गरीब-श्रीमंत तसेच लहान-थोरांना खूप आनंद होतो.
क्षणभर का होईना, पण लोक दु:ख विसरतात. त्याची आरती म्हणताना देहभान हरपतात आणि तल्लीन होतात. म्हणूनच दर वर्षी गणेशभक्त गणेशचतुर्थीची आतुरतेने वाट पाहतात.
आजकाल समाजात असुरक्षितता, जीवघेणी स्पर्धा आणि संकटे वाढली आहेत. अशा स्पर्धेमुळे जीवन नकोसे होते. पण, या सर्वांमध्ये गणपतीचे आगमन सुखावह वाटते. असा सुखावह गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडूची मूर्ती घेण्यावर भर दिला पाहिजे. तसेच आरास करताना थर्माकोल सारख्या पर्यावरणघातक पदार्थांचा वापर करणे टाळले पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना, आपण आनंद घेत असलो तरी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे असते. देव कुणाचे वाईट चिंतत नाही आणि वाईट करतही नाही. त्यामुळे गणपतीचे पूजन प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने करायला हवे.
गणेशचतुर्थीला पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करायला सांगण्यात आली आहे. प्रतिष्ठापना केल्यानंतर मूर्तीमध्ये एकच दिवस देवत्त्व राहते. त्यामुळे घरात गणपती दीड दिवसासाठी विराजमान होणे श्रेयस्कर ठरते. पण आरास, पाहुण्यांचे आगमन यांची हौस भागवण्यासाठी लोक दर वर्षी वाढत जाणारी मूर्ती आणतात. हे पूर्णत: चुकीचे आहे. गणपतीच्या प्रतिष्ठापनेबद्दल समाजात बरेच गैरसमज रूढ आहेत. घरात गरोदर स्त्री असताना गणेशविसर्जन करायचे नाही असेही मानले जाते. मात्र, मातीची मूर्ती घरात जास्त दिवस ठेवायची नसते. एकदा गणपती बसवायला सुरूवात केली की त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही असाही गैरसमज आहे. मात्र, परदेशी जायचे असेल अथवा एखादी अडचण असेल तर एखाद्या वर्षी गणपती बसवला नाही तरी चालतो. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असे काही नाही. गणपतीच्या बर्याच मूर्तींची सोंड डावीकडे असते. कारण, गणपतीच्या डाव्या हातात मोदक असतो. वडील वारल्यानंतर केवळ मोठ्या मुलानेच गणपती बसवायचा असतो हा समजही चुकीचा आहे. प्रत्यक्षात तसे काहीही नाही. वडिलांच्या इस्टेटीची वाटणी होत असताना त्यामध्ये सर्व भाऊ समान वाटा मागतात. मग, गणपती बसवण्याच्या बाबतीत असा भेदभाव कशासाठी ?
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 18 इंच उंचीची मूर्ती असावी असा नियम आहे. त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गणेशोत्सवाच्या मंडळांनी वर्गणी ऐच्छिक ठेवावी. त्यासाठी कोणावरही बळजबरी करू नये. गणपतीच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, मंगल आणि पवित्र ठेवावे. मंडळामध्ये समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले तर गणेशोत्सव योग्य प्रकारे साजरा केल्याचे समाधान मिळते. मंडळांनी त्यांना मिळालेल्या पैशांचा काही भाग सामाजिक कामांसाठी वापरायला हवा. गणेशोत्सवाच्या काळात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. कारण, अनेक लोक गणपती पहायला येत असतात. त्यांची सोय करता आली तर परिसर स्वच्छ रहायला मदत होते. गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता. सुरक्षिततेचे उपाय योजले गेले तर गणेशोत्सवाला विघातक वळण लागणार नाही. मंडळांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करता येतील. गणपती पहायला स्थानिक लोकांबरोबरच परदेशी नागरिकही येतात. त्यांना आपल्या कार्यक्रमांमधून भारतीय संस्कृतीचे नीट दर्शन होईल याची काळजी मंडळांनी घेतली पाहिजे.
गणपती हे कला आणि विद्येचे दैवत आहे. त्यामुळे प्रत्येकाने मनापासून आणि भक्तीभावाने गणपतीची आराधना करायला हवी. एकाग्रतेने पाहिले असता गणपती आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. अशा वेळी मन शांत ठेवून त्याच्याकडे लक्ष केंद्रित केल्याने सर्व चिंता आपोआप विसरल्या जातात. जगाचे भान राहत नाही आणि आपल्याला प्रसन्न वाटते. गणपतीला वक्रतुण्ड म्हटले जाते. तोंड सोंडेप्रमाणे असल्यामुळे नव्हे तर वाकड्या मार्गाने जाणार्याला तुडवून टाकणारा म्हणून त्याचे हे
नाव प्रचलित आहे. उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जाते यामागेही शास्त्र आहे. उंदीर शेतकर्याच्या शेतातील धान्याची नासाडी करतात. त्यामुळे अधिपत्य गाजवण्यासाठी गणपती त्याच्यावर
विराजमान होतो. अशा प्रकारे गणपतीची वेगवेगळी रूपे भक्तांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतात.
(अद्वैत फीचर्स)
— दा.कृ. सोमण
Leave a Reply