‘व्यक्ति तितक्या प्रवृत्ती’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचप्रमाणे प्रदेश तितके पदार्थ असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दसरा संपला की जळगावला भरीताचा सिझन सुरु होतो आणि मग दूरवरुन लोक केवळ भरीत खाण्यासाठी येतात.
साधारणत: सप्टेंबर पासून वांग्याच्या भरीताला चव असते. जूनमध्ये लागवड केलेली वांगी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी बाजारात येतात. माणसी १ किलो या प्रमाणे घरातील एकूण कुटुंबाला लागतील तितकी वांगी खरेदी केली जातात. त्यासोबत हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, लसूण, शेंगदाणे हे पदार्थ भरतासाठी लागतात. काड्यांवर किंवा काट्यांवर भाजलेले वांग्याचे भरीत अधिक चविष्ट असते. म्हणून खास भरीतासाठी तुर खाटी किंवा कपाशीच्या काड्याचे ढीग करुन ठेवले जातात.
भरीत तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. सर्व प्रथम भरीतासाठी लागणारे खास वांगे घ्यायचे. हे वांगे भाजी वांग्यांपेक्षा चार पट मोठे असतात. हिरव्यागार रंगांवर पांढरे असे भुरकट डाग असणारे वांगे कमी बियांचे असतात. त्यामुळे त्यांना वेगळी चव असते. भरीतासाठी घेतलेल्या त्या वांग्यांना तेलाचा हात फिरवावा. काड्यांची आग करून त्यावर काळसर होईपर्यंत भाजण्यात यावेत. थंड होईपर्यंत कांद्याची पात, लसूण, हिरव्या मिरच्या बारीक कराव्यात. फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे टाकावेत. भरीत तयार झाल्यानंतर त्यावर हिरवी कोथिंबीर पेरुन भाकरीसोबत खायला द्यावे. ही चव कुठल्याही पंचतारांकित हॉटेलातील पदार्थापेक्षा अधिकच चांगली असते.
भरीत पार्टी हा एक आनंदोत्सव असतो. पार्टी देणार्याला आणि घेणार्याचाही आनंद द्विगुणीत होत असतो. पाचपासून पाचशे जणांची पार्टी आयोजित केली जाते. कळण्याची किंवा गव्हाची पुरी, दह्याची कोशिंबीर आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या केळीच्या पानावर रानात बसून खायचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. नातेवाईकांना हवाबंद डब्यातून पाठविले जाते. सिझनमध्ये तर जळगांव, भुसावळ, असोदा येथे भरीत भाकरी सेंटर उघडली जातात. प्लेट सिस्टिमने पार्सलची सुविधा देणारे अनेक विक्रेते शहरात खवय्यांच्या जीभेचे लाड पुरवितात.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे देशी पर्यटकही हौसेने केळीच्या पानावर भरीत भाकरीचा आस्वाद घेतात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिषदा किंवा चर्चासत्रे, मेळावे असोत की रोटरी, लायन्सच्या बैठका असोत तेथील जेवणावळीत भरीत भाकरी हा मेनू आवर्जून असतो. खान्देशात वांग्याचे अनेक प्रकार पिकविले जातात. हिरवे आणि जांभळे वांगे, काटेरी वांगे या भागात पिकतात. भरीतसाठी लांब हिरव्या वांग्याची निवड केली जाते. ही वांगी देखील या भागात मुबलक पिकतात आणि विकतातही.
जळगांव येथील बी. जे. मार्केटजवळ असलेल्या कृष्णा भरीत सेंटरमध्ये बारा महिने भरीत मिळते. हिवाळ्यातच भरीत खाण्याची आणि खाऊ घालण्याची मजा काही औरच असते. खान्देशातील भरीत हा मेनू या काळात होणार्या सर्व समारंभासाठी महत्त्वाचा असतो. क्रीडा स्पर्धा असो की महामेळावा यात भरीत केले जाते आणि आवडीने खाल्ले जाते. मुंबईसारख्या महानगरात कल्याण, डोंबिवली येथे देखील खान्देशी भरीत विक्रीची सोय उपलब्ध झाली आहे.
Leave a Reply