आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून अद्याप कोणताही निर्णय न घेतला गेल्याने सर्वच पक्षांत अस्वस्थता वाढली आहे. महिनाभरापूर्वी सर्वच पक्षांत स्वबळाचा नारा उफाळला होता. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी महायुती आणि आघाडी अभेद्य असल्याचे जाहीर केल्यानंतर हे नारे हवेत विरले. मात्र गेल्या महिनाभरात जागावाटपाबाबत शांतता पसरल्याने पक्ष आणि पक्षाचे नेते, कार्यकर्ते सारेच सैरभैर झाले आहेत. राष्ट्रवादीला १४४ जागा हव्या आहेत, त्या काँग्रेसला द्यायच्या नाहीत. महायुतीतही हेच चित्र आहे. जमा केलेला गोतावळा शिवसेना, भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष या सर्वांनाच जागांची मोठी अपेक्षा आहे. यात तिन्ही पक्षांत कोण मोठा, कोण छोटा असे ठरविता येणार नाही आणि ठरविण्याचा प्रयत्न केला तर तो पक्ष थेट विरोधातच जाणार असल्याने शिवसेना, भाजप qचतीत आहे. एकीकडे असे चित्र असताना, दुसरीकडे खुद्द शिवसेना- भाजपमध्येही जागा वाटपावरून मतभेद आहेतच. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनाही समसमान जागा हव्या आहेत. बरं त्या दिल्या तरी, मुख्यमंत्री कुणाचा यावरून पुन्हा घमासान आहेच. शिवसैनिकांना वाटतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. दुसरीकडे भाजपवाल्यांचेही मुख्यमंत्रीपदावरील दावे प्रबळ होताना दिसून येत आहेत. कालपरवापर्यंत देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र ही घोषणा होती, ती कशीबशी शांत होत नाही तोच, नितीन गडकरींना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडू लागलेय… नितिन गडकरींना पडतेय, म्हणून नाथाभाऊंनाही पडतेय. एकनाथ खडसेंनीही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे मत व्यक्त करून राजकीय अस्थिरतेत भर घातली आहे. ज्याच्या जागा जास्त निवडून येतील, तो मुख्यमंत्री असे नवीनच समिकरण भाजपची मंडळी पाडतेय. पूर्वी असे नव्हते, राज्यात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ अन् देशात भाजप शिवसेनेचा मोठा भाऊ असे ठरले होते. आता सत्ताकांक्षीपणा वाढल्याने शिवसेनेवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात निवडणूक निकालानंतर शिवसेना मोठी की भाजप हे समोर येईलच. पण तोपर्यंत कार्यकर्ते आणि नेत्यांची मानसिकता पार विदारक झालेली असेल. याचा परिणाम असा होईल, की जेथे भाजपचा उमेदवार उभा आहे, तिथे शिवसेना विरोधात काम करेल आणि जेथे शिवसेनेचा उमेदवार उभा आहे, तिथे भाजप विरोधात काम करेल. यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले तर नवल वाटायला नको. महायुतीचे नुकसान टाळायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आताच काय ते ठरवायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील जागावाटपाचा तिढा अजून दूर झाला नाही. राष्ट्रवादी अडून बसल्याने काँग्रेसनेही कोणताही निर्णय दिला नाही. कितीही कोणी स्वतःला मोठं म्हटलं तरी, पक्ष कोणता मोठा आहे आणि कार्यकर्ते कुणाचे जास्त आहेत, याचाही विचार व्हायला हवा. काँग्रेस देशातच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठी आहेच. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसच्या निर्णयाचा सन्मान करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या भावना समजून कमी अधिक जागा वाढवून द्यायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांत ऐन निवडणुकीच्या तोंडावर जागावाटप करण्याचा प्रघात पडतोय. निवडणूक जवळ आल्याने कोणताही पक्ष जास्त भांडण्याच्या आणि स्वबळाच्या भानगडीत न पडता, झाला तो निर्णय मान्य करून निवडणुकीच्या तयारीला लागतो. ही बाब मोठ्या पक्षांना कळून चुकलीये. त्यामुळे जागावाटपाचा तिढा जास्तीत जास्त लांबविण्याचा प्रयत्न असतो. मात्र एकीकडे असा फायदा बघतानाच, दुसरीकडे ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीची तयारी ना त्या उमेदवाराला जमते आणि ना पक्षाला. त्यामुळे उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता असते, ही बाब जागावाटपात लक्षात घ्यायला हवी.
— मनोज सांगळे
Leave a Reply