नवीन लेखन...

जिवंत चित्र

चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती.
रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात पण गोष्टी लिहिल्या होत्या.
रैनाच्या शाळेने तिचे नाव दिल्लीला पाठवून दिले.
रैना स्पर्धेच्या तयारीला लागली. निरनिराळ्या विषयांवर लिहिण्याचा सराव रैना करू लागली. वाचनालयात अधिक वेळ घालवू लागली.
ही स्पर्धा दिल्लीत होणार होती. या स्पर्धेत भारतातील काही वेगवेगळ्या शाळांतील निवडक मुलेच भाग घेणार होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देशातील प्रमुख चॅनल्सवर दाखवला जाणार होता.
जोशी सरांबरोबर रैना दिल्लीला आली. 18 मजली काचेच्या प्रचंड मोठ्या इमारतीत ६०० मुलांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीतील ६ मजले चित्रकला स्पर्धेसाठ व ६ मजले निबंध स्पर्धेसाठी खास राखून ठेवले होते.
स्पर्धेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होती. त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार होता.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता सर्व मुलं हॉल मधे जमली. मुलांच्या नावाची घोषणा होत होती व मुले आपापल्या मजल्यावर जात होती.
त्याचवेळी एक घोटाळा झला.
रैनाचं नाव चित्रकला स्पर्धेत जाहीर झालं. रैनाची तर घाबरगुंडी उडाली.
जोशी सरांनी आयोजकांना विनंती केली पण त्याचा काही फायदा झाला नाही.

अशावेळी कोण मदत करणार?
आता प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.
रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत” त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“बोल रैना काय मदत कर? या सगळ्या मुलांची माकडं करुन टाकू? का हि काचेची इमारत वेडीवाकडी करुन टाकू?”
रैना म्हणाली “असं काही नको रे.” मग रैनाने मनातल्या मनात त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली आता तूच मला मदत कर.

“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
जोशी सर फारच भडकले होते. त्यांची समजूत काढत रैना म्हणाली,“सर काळजी करू नका. मी खूप चांगलं चित्र काढीन. आता पाहालंच तुम्ही!”
सर्वमुले आपापल्या मजल्यावर पोहोचली. प्रत्येकासाठी जागा राखून ठेवलेली होती.
रैनाने मोठा पांढरा कागद घेतला. तिला विषय मिळाला होता “पावसाळ्यातील गमती जमती.” काय करावं बरं? असा विचार करत असतानाच पेन्सिलीने टुणकन उडी मारली, तिच्या बोटात जाऊन बसली. तिचा हात हलू लागला. पेन्सिल कागदावर फिरू लागली. चित्रं कागदावर दिसू लागलं. अजून काही मुलं खाडाखोड करत होती, तर काही विचारच करत होती. अकरा मिनिटात रैनाचं चित्र काढून पूर्ण झालं.

“रस्त्यावर पाणी तुंबल्याने गाड्या व बसेस पाण्यावर तरंगत होत्या. मुले मस्त खेळत होती. पोहत होती. गाडीवर चढून पाण्यात उड्या मारत होती. मुलांनी कुठल्यारी वेगळ्याच फॅशनचे कपडे घातले होते. पाण्यात एक छत्री उलटी झाल्याने तिची होडी झाली होती. त्या छत्रीच्या होडीत मांजरीची दोन पिल्लं आइस्क्रीम चा कोन खात बसली होती. त्या होडीच्या दांड्यावर चष्मा घातलेला एक हिरवा बेडूक चॉकोबार खात बसला होता.” इतक्या कमी वेळात इतके सुंदर चित्र काढलेले पाहून तेथील शिक्षक खूश झाले. त्यांनी रैनाची पाठ थोपटली.
आता हे चित्र रंगवायचं होतं. तिथेच एका मोठ्या टेबलावर वेगवेगळे रंग, लहान मोठे ब्रश, पॅलेटस्, पाण्याच्या बाटल्या, बाउल्स असं सर्व सामान ठेवलेलं होतं.

रैनाने बसल्या जागेवरुनच तिथे पाहिलं. आणि तिला हवं असणारं सर्व सामान तिच्या टेबलावर आलं. रैनाच्या टेबलावर आपोआप सामान प्रकट होताच तिच्या बाजूच्या टेबलावरचा मुलगा क्षणभर दचकलाच! रैनाला कळत नव्हतं.. कसं रंगवावं? कुठल्या रंगात कुठला रंग मिसळावा?कशासाठी कुठला ब्रश वापरावा? काय करावं? रैना विचार करत बसून होती. तिला काही सूचत नव्हतं. तिला पण हे कळेना, की आपलं प्रेमळ भूत गेलं कुठे? ते का नाही रंगवत आपलं चित्रं? खूप वेळ नुसतं बसून तिला कंटाळा आला. तिने ब्रश घेतला रंगांत बुडवला आणि तो चित्रावर घासायला सुरुवात केली. पण कमालच झाली. चित्रावर रंगच लागेना. तिने पुन्हा प्रयत्न केला. रंगात पाणी मिसळलं. ब्रशवर भरपूर रंग घेतला आणि तो ब्रश कागदावर फिरवला.

पण ब्रशवरचा रंग कागदावर उतरलाच नाही. कागदावरचे चित्र रंगेच ना..! आता मात्र रैना चांगलीच घाबरली. तिला वाटलं आता आपण फेल! तिने मनातल्या मनात प्रेमळ भुताला हाक मारली. त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“अगं मी चित्रं रंगवूनच ठेवलंय. हे आमच्या भुतांचे स्पेशल रंग आहेत.”
“म्हणजे?”
“अगं आम्ही हे रंग जीवंत घुबडाची बुबुळं, गरुडाचं रक्त, वाघाची चरबी, सापाची जीभ आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे एकत्र कुटून तयार करतो. हे जीवंत रंग आहेत!! यांना सुकायला थोडा वेळ लागतो. तासाभरात हे रंग सुकले की पाहा काय चमत्कार होतो ते..?! या रंगांनी चित्र रंगवलं तर चित्रसुध्दा जीवंत होतं!! खरंच!!
अपना तो, ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
रैनाने चित्रं झाकून ठेवलं आणि ती इतरांची चित्र पाहात हॉलमधे फिरू लागली. बाकिचि मुले माणसांनी तयार केलेले पचपचीत रंग वापरुन चित्र रंगवत होती.
तासाभरात रैना परत आली. झाकून ठेवलेलं चित्रं तिने सावकाश उघडलं.. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आता ते चित्र काही वेगळंच दिसत होतं.
त्य चित्रातलं पाणी खरं होतं. त्या चित्रातलं आइम खरं होतं. त्या चित्रातली मुलं खरोखर पाण्यात उड्या मारत होती. आणि मुलांनी पाण्यात उड्या मारल्यावर चित्रातून पाण्याचे तुषार बाहेर उडत होते. त्या तुंबलेल्या पाण्यात खरोखरीच गाड्या व बसेस तरंगत होत्या!!!
रैना अवाक झाली! तोंडावर हात ठेवून ती म्हणाली,“ओऽऽह ऑसम!!”
इतक्यात बेल वाजली. स्पर्धेचा वेळ संपला होता!
परदेशातील तीन मोठे चित्रकार परीक्षक म्हणून आले होते. मिस्टर जॉन टँगोटा, मायकेल फेरी व मिसेस अॅना क्रू. त्यांच्या समोर देशातल्या निवडक ३०० मुलांनी काढलेली चित्रे ठेवली होती. हे सगले थक्क होऊन चित्रं पाहात होते.
इतक्यात जॉन यांचं लक्ष रैनाच्या चित्राकडे गेलं. त्यांनी चित्र हातात घेतलं व सहज गंमत म्हणून त्या बेडकाला हात लावला. त्याक्षणी ते बेडूक चिरक्या आवाजात म्हणालं,“आय वाँट डराँव डराँव, चॉकोबार चॉकोबार, डराँव डराँव”
मायकेल व अॅना जॉनकडे पाहून जोरजोरात हसू लागले.
जॉन ने ते चित्र घाबरुन अॅनाकडे दिलं. अॅनाला त्या चित्रातली मांजरं खूप आवडली. तिने मांजरांना हात लावताच ती मांजर लाडात येऊन म्हणाल,“हॅलो चोर चिम चिम, गिव्ह मी मोर आईस्क्रीम.”
अॅनाने घाबरुन चित्र खालीच ठेवलं. तिचा चेहरा घाबरुन लाल-निळा झाला.
अॅनाचा हा आवाज ऐकून, आता सगळेच हसायला लागले.
“ही मुलांची चित्र पाहताना कोण कुठले आवाज काढेल काही सांगता येत नाही” असं म्हणत मायकेल यांनी रैनाचं चित्र हातात घेतलं.“काय सुंदर रंग आहेत. पाणी तर खरं वाटतंय.या चित्रात खरा जीवंतपणा आहे.”

इतक्यात त्यांना जॉन चा धक्का लागला. त्यामुळे चित्रातली तरंगणारी बस थोडी पुढे सरकताना मायकेलने पाहिली. मायकेलचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना.
“या देशातली मुले ग्रेटच आहेत” असं मायकेलने म्हणताच बाकी दोघांनी टाळ्या वाजवल्या.
संध्याकाळी रिझल्ट जाहीर झाला, तेव्हा रैनाच्या समोर देशभरातल्या टि व्ही चॅनल्सनी, फोटोग्राफर्सनी एकच गर्दी केली. जगातल्या सगळ्या लोकांनी तिचं चित्रं पाहिलं.

तुम्हाला काय वाटतं, रैनाला बक्षीस मिळालं असेल? का? कुणामुळे?
प्रेमळ भुताला न भिता कळवा. त्याला इमेल करा. प्रेमळ भूत तुम्हाला नक्की उत्तर देईल. प्रेमळ भूत तुमच्या इमेलची नहमी वाट पाहात असतं

-राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..