जीवन एक प्रवास मानवा, जीवन एक प्रवास
पाहुणा इथे तू घडीभरचा, पळभर हा सहवास ।।धृ।।
कुणी ना राही इथे कायमचा अटळ असे हा प्रवास परतीचा
कोण कधी निघणार ठाऊक नसेल ते कोणास ।।१।।
मार्गी संकटे अडसर कंटक अपघात कुठे चोर भयानक
यातुनी जाणे सुखरुप तुजला, करुनी शर्थ प्रयास ।।२।।
वाटे वाटसरु सोयरे सगे नकोस गुंतू त्यांचे संगे
भेट संपता आनंदाने निरोप देणे त्यास ।।३।।
करुनी धडपड झिजविसी काया जीव जगविसी जमविसी माया
अखेर सोडुनी इथेच सारे, जाणे तुज एकट्यास ।।४।।
ध्यास मनी घे चिरंतनाचा शाश्वताचा, चिरसुख त्याचा
सोडुनी ईश्वर, नश्वर त्यास्तव कोण करिसी सायास ।।५।।
जीवन एक प्रवास मानवा, जीवन एक प्रवास
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply