नवीन लेखन...

जीवाशी खेळ

पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,”आयो मेले गं..!!”
ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ…? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं.
कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला. चौकशीच्या खिडकी जवळ तो आला .तिथं एक नर्स नि एक पोरगा व्हता .त्यांच आपलं काही तरी गुलूगुलू चालं व्हतं. बराचं येळ उभा राहिला तरी ते कशाला आला म्हणून हटकीनात .बरं ते काय बोलतेत. हे भी याला नीट कळन ते काही म-हाटीचं बोलतं पण काही इंग्लीश हाणीत .
” मॅडम पेंशट आणलं व्हतं ?”
“काय झालयं?” तिनं काय झालं हे इचारलं की गडी जरा बुचकाळयातचं पडला .आता या पोरीला काय सांगावा ? गडयाला लाजच वाटू लागली . तेव्हं जरा इरमलाचं.
“काय नाय …मामीला बोलावतो
“आरं मग आणा लवकर …वर त्वांड करून काय बघतुयास?” त्या कंपाऊडन्रनं उगचं पाऊर हाणला.
” चलता नाय येत तिला ….लिप्ट दिसतीया ना ?”
“ती नाय चालू …”चालू नाय शब्द कानावर पडला कीच गडी धूम पळाला .
डायरेक्ट पल्ली उचल्ला नि कचा कचा पाय-या चढून आला .पार घायाळ झाला.
तेव्ह धापा टाकीत बसला पण नंतर त्या पोरांनी त्या पोरींनी तिला वार्डात नेलं.सासू आली .सारी बोचकं तिथं टाकली .धावतचं वार्डात गेली .डॉक्टर आलं. तपासण्या सुरू झाल्या .त्या पोट्यांनी एक चिठ्ठी आणून दिली .
ते बिलचं होतं तपासण्याचं. तिथं खिडकीवर बिल भरायला सांगितलं. तो बिल भरून आला .
” आयल्ला ..!यांचा रट्टा अवघडचं यारं .सात हजार तर पहिल्या रट्यालाच हाणले गडया ..”
‘ सात…?”
” अॅडव्हानस्च पाच घेतलेत …बाकीचं तपासणीचं”
” तसलचं इथं…नार्मल झाली डिलव्हरीत बरं नाय तर काय खर नाय ?मग मेला गडया तू ”
” नार्मलचं कर म्हणायचं ”
“आयला …ते डाक्टर काय ? ते आपलं एेकत असतेत व्हयं ?हयो तर सिझरच करतो म्हणत्यात ”
” पण मी नाय करायचो तसलं सिझर न बिझर…”
” आयला बायकोच्या जीवा पेक्षा पैसा प्यारा काय लका तुला …मग सरकारी दवाखान्यात तडफायचा ना तू ?”
” आपलं जगदाळे डाक्तर म्हणालं …इथचं न्या”
‘ आयला मग तर घोळच झाला बुवा ..’
“कसा क्काय… ?”
‘ आर ,त्यांची लाईनच राहती.कमिशॅन आसत त्यांना पण”
“हॉं..काय म्हणतुस ?”
“डाक्टर तर देवा समान असतुया ना रं ?”
” पण म्हणत्यात हयो डाक्टर नारमलं डिलव्हरी करतचं नाय जणू .खरं खोट काय कळतयं आपल्याला …?”
” सरसकट कसं करतेल ते ..कवा बुवा करती असतॅल”
तेवढयात त्याची सासू घाब-या घाब-या आली.
हयो उठूनचं पळाला .
‘क्काय…म्हणतेत डाक्टर सायब ?”
” ते म्हणतेयं …सारं चांगलं.तसलं मशिन लावून तपासल.पोरगचं हाय .चांगलं पण..?”
“आत्ता कसला पण ?”
” पल्लीच्या पोटात पाणी नाय .रगत पण कमी ”
” तर भी मी साराखा गागत असतो पाणी पी पाणी पी… ती नाय मनावर घेत.रगत कसं काय कमी पडलं आसलं?”
” मग डाक्टर काय म्हणतयं ?” डायव्हर नं त्वांड खुपसीलं
” ते म्हणतेतं तास भर वाट पाहू .नाय तर सिझारचं करावं लागलं.”
“म्या म्हणतु नाय केल सिझर तर …विल्या तू म्हणतुस तेच खर दिसतं .डाक्टराचा नक्की डावच दिसतुया ”
” आवो तुम्हाला याड लागलं की काय ? पोरं तिकडं नुसती जित्राबावाणी मिडकती.तुमचं हे आपलं काय भी निघतं.”
” आत्या तुम्हाला नाय कळायचं हे असचं करतेत डॉक्टर…?”
” ते म्हणतयं बाळाला धोक्का …बघा तुमचं काय ते ”
” बरं खर्च किती येईल म्हणालं?”
“ते गुततच दया म्हणालं .पन्नासच खर्च येतो पण जगदाळे पाव्हणं म्हणालं जरा संभाळून घ्या .तुमचं पावणंच हायत जणू तर चाळीस हजार दया …औषध बिवशध त्यांच्याकडंच ”
त्याचा तर हात पाय गळाले.
“चल विल्या आपुन इचारू….आयला असं आसत व्हयं कुठं ?”
विल्याला तो ओढत तो डाक्टरकडं घेऊन आला. कॅबिनमध्ये आत आलं. ते भारी कॅबिन बघून तो तर हॅंगच झाला.नुसतं बघतच बसला .
“बस्सा..शेळगावचं न तुम्ही?”
” हॉं…! जगदाळ डाक्टरने पाठवलं”
” ते भर केलं त्यांनी .तुम्ही पण लवकर आल्लात .अजून तासभर जरी उशीर केला असता तरी बाळ हाती लागलं नसतं.आणि….”
” जगदाळे डाक्टर म्हणालं तास दीड तासात पोहचा. मग हयो आमचा विल्या लयं भारी डायव्हऱ नुसती गाडी ठेचाळली.”
“नाही ते चांगल केलं.तुम्हाला कल्पना नसलं पण तुम्ही दोन जीव वाचवलेत.”
“हॉं..?”
“बरं सा-या तपासण्या झाल्यात. तुम्ही पेंशटचं कोण?”
“मी …?” तो लाजला.आता आपण कसं म्हणावं की मीच नवरायं
“तुम्ही पेंशटचं मिस्टर अहात तर ?”
“नाय..नाय मी नवरा पल्लीचा.”
“हां तेचं..ते. अजून बाळाचा धोक्का टळला नाही.गर्भात पाणी नाही .बाळानं शी केली तर आईला पण धोका होऊ शकतो.” बाळ आत कुठं शी करत असेल.ते काय खात असेल.काहीचं नाय खाल्ल्यावर शी कशी येईल? असलचं प्रश्न त्याला पडत राहिलं.त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून डॉक्टर जवळच्या कागदावर आकृतीचं काढली.त्यांना समजून सांगू लागले. आता पाची सहावीत असताना मास्तर अशा आकृत्या काढयाचा त्याला तव्हाचं काय कळत नसं.आता काय डोंबल कळलं व्हयं? आपल्याला काहीच कळत नाय यातलं हे कसं सांगणार?
“डाक्टर हे कळलं सारं काय करावं लागलं?”
“लयं रिस्क कामाची नाय.पेंशटच्या अंगात रक्त पण लयं कमी.अशक्त पेंशटं”
“आयला खातचं नाय.रटून खायला पाहिजे अशा दिवसात पण लय खायचा नाद नाय तिला. आता काय करावं लागलं?”
“काम पडलं तर रक्त दयावं लागलं.सिझर करावं लागलं.”
“नाय..नाय,,डाक्टर सिझर नाय करायचं.’
” बाळाला आणि पेंशटच्या जीवाला धोका …”
“असू बापडीचा ..”
“डाक्टर गरीब माणूस..पैसच नाहीत जवळ…म्हणून म्हणतोय तेव्हं.खर्च किती पर्यंत येईल ?”
” पन्नास पर्यंत जाईल पण जगदाळे डाक्टरमुळे चाळीस पर्यंत करतो म्हणालो. ”
” नाय सिझर नाय करायचं …इथं गू खायला पैसा नाय.”
“पेंशट उचला….कोण रिस्क घेत ?”
“अशा वक्ताला कुठं हलवणारं…?”
“मग लिवून दया…तसं ” टेबलावरलं बटन दाबलं.नर्स आली यांना अॅग्रीमेंटच पेपर दया.सहया घ्या.” डाक्टर रागातचं होतं. हे सारं त्याची सासू बघत होती.इकडं हयो इरीला पेटला व्हता तर तिकडं लेकीचा मिडूक चालला व्हता.तिचा जीव आडकीत्यात सापडला व्हता.
तेवढयात नर्स पळतचं आली.
“डॉक्टर.. डॉक्टर…पेंशट सिरीअस….”
डॉक्टर पळतचं गेलं.तसल्या नळया लावला. तसलं मशिन लावलं. त्यात नुसत्या रेषा पळत.याला आत पण येऊ देईनात. हयो काचातून नुसता पहात राहिला.
तेवढयात त्याची सासू जवळ आली. तिनं गळयातल बोरमाळ काढली. त्याच्या हातात देत म्हणाली ,”लेकीच्या जीवापेक्षा ही बोरमाळ काहीचं नाय. माझ्या चिमणीचा जीव मिडकतोय.नाय देखवत तिचा मिडूकं. हे सोनारा पाशी जा मोडा.पैस आणा. खंडोबाराया महया लेकराला वाचव रे बाबा” नुसती फरशीच्या पाया पडत राहिली.ते हातात घेतलं.डाक्टर तिकडून येत व्हता .त्याला हात जोडून म्हणाला,”डाक्टर…काय भी करा.किती भी पैसं लागू दया हयो शिव्या कुणाचा गू काढीन पण महया पल्लीला मरू नाय दयायचो.हे मोडतो आणि पैसं घेऊन येतो.पण डाक्टर माझ्या पल्लीला काय नाय ना होणाऱ?”
” प्रयत्न चालुच आहेत.शेवटी जन्म मरण तर या विधाताच्या हाती असतं.तुम्ही आपण कोणं ?”
तिथंच भगवान श्रीकृष्णाची हासरी मुर्ती होती.धन्वंतरी ….त्याकडं पाहून डॉक्टर बोलला.
तो शिव्या तिथचं हात जोडून उभा होता.

— परशुराम सोंडगे 

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..