वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ‘ जीवमय ( प्राणमय ) live cells ‘ अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ‘ मृत dead cells ‘ संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.
नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply