नवीन लेखन...

जुई

किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा..

आत्ताशिक त्याच्या पेंटींग मुंबईच्या आर्ट ऑफ गॅलरीत बी लागल्या व्हत्या.प्रत्येक बिकट परिस्थितीत किस्ना नेहमी काहीनं काही मार्ग काढायचाच.नेहमी हसतमुख असणारा किस्ना कव्हाच कुणालं दुःखी दिसायचा नाय.असा हा हरफनमौला लहान लेकरांसंग लहान तं मोठ्यांसंग मोठा व्हवुन राह्याचा.माणस. पाहुन त्या त्या व्यक्तीमत्वासंग समरस होण्याची त्याची कला विलक्षण होती. त्यामुळ सगळ्यायलच तो हवा हवासा वाटायचा.त्याच्या याच व्यक्तीमत्वामुळं मलं त्याच्यासंग नेहमीच राहावं वाटायचं.

किस्ना जवळच्याच गावात मास्तर मनुन नवकरकीलं व्हता.नेमकचं लगन व्हवुन एक लेकरू झालेलं.तव्हा म्या कॉलेजात शिकायलं व्हतो.मही आन किस्ना पेंटरची लय दोस्ती झालती.मह्याघरची परिस्थीती बेताचीच व्हती.तं किस्ना पेंटरजवळबी नेहमीच खडखडाट आसायचा.मंतात नं लक्ष्मी आन सरस्वतीचं जुळत नाय मनुन…! किस्नाच्या बाबतीत बी तसच व्हतं.या तानानं किस्ना आजकाल आंधुन मंधुन बारवरं बी जायालं लागला व्हता.एकदा दारूनं मेंदुवर अंमलं केला कि मंग शिगारेटीचीबी संगत त्यालं आवडु लागायची.मंतात नं कि कलावंतालं नशेचा शाप आसतो मनुन…! तसच व्हतं मना किंवा आसय आसलं कि प्रचंड परतिभेच्या धन्यालं जगाची अवहेलना सहन करावी लागत असावी मनुन मना…!
तं किस्ना नेहमी विकेंडलं मलं घेऊन नवनव्या ठिकानी जायचा.नवनव्या कलावंतायच्या भेटी बी घडवायचा.मी नेहमीच त्यालं दारू शिगारेटीच्या सवयीबद्दल बोलायचो पण नेहमीच तो हसुन विषय टिळायचा.एकदा असच उन्हाळ्याचं आम्ही किस्ना पेंटरच्या कुण्या एका मित्राकडं जात व्हतो.खिशातं पैसे नसल्यानं आम्ही पैदलच निंघालो.सुर्य आग वततं व्हता.अंगाची काह्यली काह्यली व्हवु लागली.तहानेंन नरड निस्तं कोरडं झालतं.पाणी घ्यालं पण आमच्या जवळ पैसे नवते.म्या किस्नालं मनलो की,“जरा सावलीलं थांबुयात का? लय तहान लागलीय.” तसं आम्ही एका झाडाखाली थांबलो.“आत्ता जवळ पैशे आसते तं आपणं एखांद कोल्ड्रिंक फिल्ड्रींक तरी पिलो आसतो.” मी सहजच मनलो.किस्नानं त्याच्या मित्रालं फोन लावला.मित्र जरा बाहीरच्या झमेल्यात अडकला व्हता.त्यालं घरी येयालं आंजुक एक दिड घंटा तरी येळ व्हता.काय करावं कायबी सुदरतं नवतं.आसं येडपटावाणी कव्हरोक झाडाखाली बसावं.मलं लय कटाळा आलता.म्या किस्नाकडं पाह्यलं तं किस्ना आपल्ययाच सुगलात काय तरी ईचार करतं व्हता.एकदम मलं मनला,“चलं,चहा बी पिऊ आन कोल्ड्रिंक बी”. “जवळ तं खडकु नवता मंग हे कस शक्य हे.”असं म्या किस्नालं मनलो.तं उलट किस्ना मलं मनला कि ,“म्या जराशे पैसे डोस्क्यातं घेऊन आलोय”. किस्ना काय मनत व्हता मल कायबी कळतं नवतं.म्या मुकाट त्याच्या मांघ निंघालो.चार पाच मिनटाच्या अंतरावर एक चारचाकी गाड्यायचं शोरूम व्हतं.किस्नानं कपडे ठिकठाक केले.डोळ्यावर चष्मा चढवला अन मलं मुकाट्यानं मांघ मांघ चाल मनला.आम्ही थाटातं त्या शोरूममध्ये गेलो.आत सगळं एयर कंडीशन व्हतं.मलं तं आत गेल्यावर लय बरं वाटलं.आम्ही आतं गेल्या गेल्या सुटबुटातली एक सुंदर बाई पुढं आली.तिनं हसुन आमचं स्वागत केलं.तिनं आम्हालं एका सोफ्यावर बसवलं.मलं तं कसकान्नुच व्हत व्हतं.एवढ्या आदरानं मलं आंजुकतरी कोणी बोललं नवतं.म्या कसानुसा आंग चोरून तिथं सोप्यावर बसलो.तेव्हड्यातं दुसरी एक टापटिप पेहरावातली सुंदर मुलगी आमच्याजवळं आली.तिनं गोडं हसत पाणी दिलं.म्या आधास्यावाणी घटाघटा पाणी प्यालो.आत्ता मलं बरं वाटु लागलं.तेव्हड्यात आंजुक एक सुटाबुटातली सुंदर मुलगी हसत आमच्याजवळं आली.म्या मनातच मनलं,“मायझं,जगात एवढबी सुंदर हासु आसतं व्हयं.” तेव्हड्यात त्या मुलीच्या मंजुळ आवाजानं म्या भानावर आलो.“बोला सर,मी आपली काय सेवा करू”.म्या तिच्याकडं बावळटावाणी पाहातच राह्यलो.मलं एवढ्या आदर सत्काराची सवयच नवती.तेव्हड्यातं किस्ना मनला,“मला एक पंधरा विस लाखापर्यंतची मस्तपैकी कार दाखवा.”

“ओ.के.सर.”तीनं मंद स्मित करत म्हणलं.तिचे पांढरेशुभ्र मोत्यासारके दात हसतांनी किलकिलतं व्हते.
“आमच्याकडे अतिशय चांगले आणि किफायती व्हेरीयंट आहेत.आपण ते बघुयाच.पण सर्वप्रथम तुम्ही मला सांगा आपण काय घेणारं.चहा,कॉफी,ग्रीन टी कि काही शितपेय मागवु सर…!”
“अं….बाहेरं उकाडा फार आहे तेंव्हा मला वाटतं आपण शितपेय मागवले तर बरं होईल.” किस्नाची अस्खलीत पुणेरी मराठी ऐकुन मलं नवल वाटतं व्हतं.त्या मुलीनं काउंटरवरच्या मुलीकडं बघुन शितपेय आनायचा ईशारा केला.
“आपन काय करता सरं.” त्या मुलीनं ईचारलं.
“मी….मी प्राध्यापक आहे.”किस्ना म्हणाला.

तसं त्या मुलीनं आणखीच आदबीनं बोलायलं सुरवात केली.किस्ना हनुवटीवर हात ठुवुन एखाद्या विचारवंताच्या पोजमधी बसला व्हता.
“आपण बॅंक लोन करणार की नगद घेणार सर.म्हणजे आमच्याकडे फायनान्सचीसुध्दा व्यवस्था आहे.”
“नको फायनान्स वगैरे काही नको.मी कार नगदीनेच खरेदी करणार आहे.” गंभीर मुद्रेनं किस्ना मनला.मलं तं हसावं का रडावं हे कळतं नवतं.त्या सुंदर मुलीनं आम्हालं चार पाच गाड्या दाखवल्या.त्यातली एक गाडी किस्नानं पसंत केली.किसना त्या एक्झिक्युटिव्हलं त्या गाडीबद्दल बारीक सारीक ईचारून घेत व्हता.जसं काय खरच ती कार ईकत घेणार व्हता.तेव्हड्यात कोल्ड्रिंक आलं.कोल्ड्रींक घेता घेता ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

“मला ही गाडी कधी उपलब्ध होईलं” किस्ना मनला. “दोन ते तीन दिवसात उपलब्ध होईल,सर!” असं ती मुलगी मनली.
“मला उद्या दिल्लीला जायच आहे.सकाळचीच फ्लाईट आहे.मला निघायच आहे.आज टेस्ट ड्राईव्ह घेतली असती पण वेळ नाही.आल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घेऊयात आणि नंतर ठरवुयातं.नाही तर असं करूयात का, तुम्ही मला आता टेस्ट ड्राईव्ह द्या.आल्यानंतर गाडीचा व्यव्हहार पुर्ण करूयात.मलाही येथुन दोन तिन किलोमीटरवरच जायच आहे.तुम्ही मला टेस्ट ड्राईव्ह देतांनाच सोडा.माझाही वेळ वाचेलं आणि टेस्ट ड्राईव्हपण घेणं होईल.”किस्ना म्हणाला.

मह्या डोस्क्यात लख्खनं परकाश पडला.आत्ता मलं किस्नाच्या डोस्क्यातले पैसे ढळढळीतपणे दिसतं व्हते.मल नवल वाटलं.किस्नानं त्या सुंदर मुलीलं गोडगोड बोलुन कोटेशन घेतलं.त्या मुलीन टेस्ट ड्राईव्ह देण्यासाठी शोरूमच्या ड्रायव्हरला गाडी काढायलं सांगतलं.परत एकदा तिच्या स्मित हास्यासंग आम्ही तीचा निरोप घेतला.रस्त्यानं मी चुप राहुन किस्नाच्या लिला पाहातं व्हतो.किस्नानं समद्या रस्त्यानं त्या ड्रायव्हरलं येगयेगळ्या शंका ईचारल्या.आम्ही किस्नाच्या दोस्ताच्या घराजवळ आलो.किस्नानं ड्रायव्हरलं गाडी थांबवायलं सांगतलं.हसुन ड्रायव्हरचा निरोप घेतला.ड्रायव्हर निंघुन गेल्यावर आम्ही मांघ वळुन पाह्यलं.गाडी गेल्याची खात्री केली आन जोरजोरात पोट दुखोस्तोर हासलो.

किस्नाची आवली बाजु सगळ्यायलच माहीत व्हती पण लवली बाजु कोणालच मायीत नवती.परत्येक माणसाच्या आयुष्यात दिवस आण रात येते‌ तशी किस्नाच्याबी आयुष्यात एक रात व्हती….काळरातचं व्हती मणा की…! त्या घटनेनंतर किस्ना पार तुटुन गेलता. एखांद्यायेळी लय ईमोशनल झाला की मह्याजवळ मन मोकळं करायचा.त्याच आसं व्हतं कि कॉलेजात आसतांनी त्याच्या जिवनात जुई नावाची एक मुलगी आलती.ती पण त्याच्यासारकीच आवली व्हती.कॉलेजच्या त्या मंतरलेल्या दिवसांत तेंच्या प्रेमाबरोबरच त्याच्याही चित्रांत रंग भरल्या जाऊ लागले.ती कविता करायची तं तो कुंचल्याशी खेळायचा.त्यांचे हे भारलेले दिवस दिवसेंदिवस बहरूच लागले.दोघायनबी प्रेमाच्या आणा भाका घेतल्या.विकेंडलं कव्हा नाटक पहाण तं कव्हा सिनेमा पहाणं हे नेहमीचच झालतं.बागमध्ये तासंतास बसनं,प्रेमाच्या गप्पा करणं यात कसा येळ जायचा हे त्या दोघायलबी समजायचच नाही.ती त्यालं एखांद्या परीसारकी वाटायची.तिचे ते आखीव डोळे,रेखीव बांधा अन गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ त्यालं येड लावायचे.ती हसायली कि तिचे ते मोत्यासारके लुकलुकणारे दात अनं तिचा मंजुळ आवाज त्याच्यासारख्या वादळालं थोपवायलं पुरेसं होतं.तो नेहमी तिलं त्याच्या यथातथाच असलेल्या आवाजात गाणी म्हणुन दाखवायचा नाय तं तिचे चित्र तरी काढायचा.तो बोलायला की ती भारावल्यासारखं एकटक नजरनं त्याच्याकडं पाहातच राह्याची.

“एऽऽ तु बोलतच रहा….!” हे तिच ठेवणीतलं वाक्य होतं.तिच्या नुसत्या हसण्यावर आख्खी जिंदगी उधळुन टाकावी आसं त्यालं वाटायचं.तिच्या नजरत एक वेगळीच चमक व्हती.तो तासंतास तिच्या नजरंत हरवुन जायचा.असच एक दिवस तीनं किस्नालं फोन करून भेटायलं बलवलं.फोनवर तिचा आवाज उदास उदास जानवत व्हता.ती बोलतांनी अक्षरशः ओक्साबोक्शी रडाया लागली.किस्ना हादरलाच.काय व्हतयं त्याल काहीच कळत नवतं.ती रडत रडत आत्ताच भेटायच अस त्यालं मनत व्हती.काय झालं मनुन किस्नानं खोदुन खोदुन ईचारल्यावर तीनं सांगतलं की पहाटं पहाटं झाकतचं तिलं एक वाईट स्वप्न पडलं व्हतं.त्यातं दोन काळे कपडे घातलेले आडदांड लोकं त्याच्यापसुन तिलं दुर वढुन नेतं व्हते.किस्ना हसाया लागला.त्यालं तिच्या हळवेपणावर अन निरागसपणावर हसु येवु लागलं.त्यानं तिलं नेहमीच्याच बागतं भेटायलं बलवलं.ति लगबगीनं किस्नालं भेटायलं निंघली.किस्नाबी आवरून तिलं भेटायलं निंघला.घरातुन बाहेर पडताच एक काळी मांजर टुन्नकन उडी मारत त्याच्यापुढुन गेली.तो क्षणभर थबकला.मंग स्वतःशीच हसला.मनातच मनायं लागला की,“मी तं नास्तीक हे… कव्हापासून अश्या शकुन अपशकुनावर ईस्वास ठेवायलो…चला किशनरावं तसं काय नसतं…” अस मनाशीच पुटपुटत त्यो पुढं निंघाला.त्यालं जुईचं. वागनं बालीशपणाचं जरी वाटलं तरी पण त्याच्याही मनात आत्ता येगळीच रुखरुख वाढली व्हती.त्यालबी तिचा फोन आल्यापसुन करमयनं गेलतं.आभाळात ढग दाटुन आलते.पाण्याचा एक एक थेंब पडत व्हता.तसं पाह्यलं तं तव्हा रोमॅंटिक वाटायल पायजे व्हतं पण किस्नालं त्याचं कायबी वाटत नवतं.त्याल सगळं उनाड उजाड वाटत व्हतं.त्यालं नेहमी आवडणारा पक्षांचा चाललेला किलबिलाट आज त्यालं अतिशय कर्कश वाटायलं लागला व्हता.दुर झाडावर बसुन गाणं गाणारी कोकीळापण आज त्यालं रूक्ष स्वरात गायलेली वाटु लागली.तो तंद्रीतच चालत व्हता.अचानक एक कावळ्यांचा थवा त्याच्याकडं कर्कष आवाजात वरडत त्याच्या अंगावर चाल करून आला.कावळ्यांच्या या अचानकच्या हल्ल्यानं तो भांबावला.त्यालं ते कावळे डोळ्यातुन रघत वकत आक्रस्ताळेपणानं वरडायलेले दिसतं व्हते.आज काय व्हतय त्यालं कायबी कळतं नवतं.एव्हाना तंद्रीतच तो बागपर्यंत आला न आला तोचं “क्रृष्णा………!” असा मंजुळ आवाजं त्याच्या कानावर पडला.त्यानं कलुन तिच्याकडं पाह्यलं.ती रस्त्याच्या दुसर्‍या टोकालं उभी व्हती.तिच्या डोळ्यात त्यालं भेटीची आतुरता दिसत व्हती.ती माघंपुढं नं पाहता तशीच उताविळपणानं किस्नाकडं पळाली.तेव्हड्यातं एक भरधाव ट्रक आला.त्याच्या डोळ्यापुढचं ती ट्रकखाली चिरडली.एक आर्त किंकाळी आसमंतात दुमदुमली.किस्ना विजेच्या वेगानं तिच्याकडं पळाला.कंबरपसुन तिचं पोट वेगळं झालतं.किस्नानं तिच्या धडालं कुशीत घट्ट आवळुन हंबरडा फोडला.तो वेड्यासारखा अॅम्बुलन्स अॅम्बुलन्स असं वरडतं व्हता.सुईंऽऽऽ अश्या आवाजानं त्याच्या कानावर अंमलं केलता.सगळं कसं बधीर बधीर झालतं.अजुबाजुलं कोण काय बोलतयं त्यालं कायबी कळतं नवतं.त्याच जगच कोलमडलं व्हती.स्वप्नांचा चुराडा झालता.आपणही येणार्‍या वाहणाखाली जीव द्यावा अन आपल्या प्रियतमेसंग अनंताच्या परवासालं जावं आस त्यालं वाटु लागलं.तो जिवाचं बर वाईट करायच्या उद्देशानं उठणार तोचं त्याच्या कानावर शब्द पडले…..
“कृष्णा………!”

तोच आवाज….तेच प्रेम पण आज दुर….. दुर जातांनी त्यालं दिसतं व्हतं.तिच्या डोळ्यांत त्यालं आगतिकता दिसतं व्हती.डोळ्यांनीच खुनवुन तिन त्यालं मान खाली करायलं लावली.तिच्यात बोलायचं बी आवसन नवत.खुप कष्टानं ती त्याच्या कानात बोलली…..

“कृष्णा,खचु नको,मी पुढ जाऊन तुझी वाट पाहीन….या जन्मातच नाही तर नेहमीच मी तुझ्यासंगच असेनं….खचु नको…खुप मोठा चित्रकार हो… नावलौकिक कमव…..तुझ्या जिवणाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला माझं अस्तित्व जाणवल.तु लग्न करून संसार कर….उगा देवदास बनु नकोस….शप्पथ आहे तुला माझी……आय लव्ह यु कृष्णा…!” असं म्हणुन तिनं त्याच्या गालावर हलकसं चुंबन घेतलं अन त्याच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला.प्राण गेला तरी ती त्याच्याकडच टक्क उघड्या डोळ्यांनी पहात व्हती.किस्ना स्तब्ध झाला.तसाच बसुन राह्यला.अॅम्बुलंस आली.डॉक्टरांनी तिच्या शरीराचे तुकडे स्ट्रेचरवर गोळा केले.किस्ना सताड डोळे उघडे ठेऊन पहात व्हता.खुप तुटला…..सैरभैर झाला….. कित्येकदा त्यानं आत्महत्येचाही विचार केला पण तिनं दिलेल्या शेवटच्या शब्दांमुळं तो जिवंत राहीला.पुढं हळुहळू त्यानं सावरलं.त्याच्या वडीलांनी सुचवलेल्या पाव्हण्यातल्याच राधा नावाच्या मुलीसंग त्यानं तिचा चेहराबी न पाहता लग्न केलं.जुईला दिलेल्या शब्दाखातर त्यानं त्याच्या बायकोलं कव्हाच काही उनं जानवु दिलं नाही.वरून तो कितीही हसता खेळता दिसत आसला तरीबी जुईची आठवण आली की त्याचं काळीज पिळवटून जायाचं.

आज जुईलं जाऊन बाविस वरसं झालते.किस्नालं एक मुलगा अन एक मुलगी झालती.दोनही लेकरं चांगले हुशार निंघले व्हते.पोरगं ईंजेनेरींगलं तं पोरगी डाक्टरकिलं लागली व्हती.किस्नानं लाडानं त्याच्या मुलीचं नाव जुई ठेवलं व्हतं.राधाचीबी किस्नाच्या संसारालं चांगलीच साथ व्हती.सगळ मस्त चाललं व्हतं.पण एवढ्यात किस्नाच्या बारवरच्या चकरा जरा जास्तच वाढल्या व्हत्या.दारूच्या घोटालं नरड्याखाली ढकलत जळणार्‍या छाताडासंग तो तिच्या आठवनीत रमायचा.एकादिशी तं कहरच झाला.त्यादिवशी जुईलं जाऊन बराबर बाविस वरस झालते.तिच्या आठवनीनं व्याकुळ किस्ना पहाटपसुनचं बारवर बसला व्हता.सारका रडत रडत बाटल्यायवर बाटल्या रिकाम्या करत व्हता.बारवरचे वेटरबी किस्नाचा आजचा आवतार पाहुन बुचकळ्यातं पडले व्हते. आत्ता तं वेटरबी किस्नालं मनु लागले कि,“सायब, आत्ता जरा आवरतं घ्या.तुम्ही पार आउट झालात बघा. ”किस्ना तर्राट झालता.लहान लेकरावाणी हात जोडुन आंजुक एक तरी क्वाटर द्या असं बारवाल्यालं मनु लागला. पण बारवाल्यानं काय त्यालं क्वाटर देली नाही.किस्ना नाईलाजानं तिथुन निंघाला.एका हातात शिगरेट फुकत डुलत डुलत किस्ना रस्त्यावर उभं राहुन येणार्‍या जाणाऱ्या गाड्यायलं हातं देऊ लागला.त्याचा त्यो आवतार आन हातातल शिगरेट पाहुन कोणबी गाडी थांबवतं नवतं. तरीबिक किस्ना येणार्‍या जाणार्‍या गाडीलं हात दाखवत व्हताचं.तेवढ्यातं एक गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली.साठी पासष्टीचे एक आजोबा किस्नाजवळ थांबले.तेह्यनं किस्नाकडं पाह्यलं.ते डोळ्यातुन आग वकत व्हते.किस्ना हादरला.

“सुक्काळीच…यडझ× कुठल्ल”.

आसं ते आजोबा मनले आन फनकार्‍यानं तिथुन निंघुन गेले.झटक्यातच किस्नाची सगळी नशा उतरली.ते त्याचे वडील होते.तो त्यांना प्रेमानं नाना मनायचा.आज नानानं किस्नालं रंगेहात पकडलं व्हतं.किस्ना पियालाय हे तेह्यलं सांगोवांगी कळलं व्हतचं.पण आज परत्यक्षात पाह्यलं व्हतं.
नानानं रंगेहात पकडल्यानं किस्ना आंजुकच टेन्शनमंधी आलता.आत्ता त्यो परत बारवर जाऊन बसला.त्यानं मलं फोन करून बलवलं.
म्या मनल,“म्या तं घेत नाय तवा म्या येवुन काय करू….!”

तसं तिकडुन मलं किस्नाच्या रडण्याचा आवाज ऐकु येऊ लागला.काय झालं बा मनुन म्या गडबडीनं त्या बारवर गेलो.तिथलं ते दृष्य पाहून म्या च्याटच पडलो.ईस्कटले केसं, अस्ताव्यस्त कपडे,पुढं शिगारेटीच्या धुटकायचा पडलेला ढिगारा,टेबलावर पडलेल्या दोनचार दारूच्या बाटल्या हे सगळं पाहुन म्या तं हादरलोच.मी जाताच पुन्हा किस्ना ओक्साबोक्शी रडाय लागला.मलं नानानं रंगेहात पकडलं मनु लागला.मह्याबापान आयुष्यात कव्हा सुपारीचं खांड खाल्लं नाही आन मलं आज आसं पाहून तेह्यलं काय वाटलं आसल आसं मनत मह्याजवळ लहान लेकरागत रडु लागला.मलं तं कायबी समजत नवतं.दुपार झालती.मी किस्नालं समजवुन सांगु लागलो की,“ब्वा,त्या जलमदात्या बापानं आज तुलं रस्त्यावर तमाशा करतांनी पाह्यलं.काय वाटत आसलं तेह्यच्या जिवालं याचा तु ईचार केलास का कव्हा ? तुह्यावर जिव ववाळुन टाकणारी तुही बायको राधा….तिचा तुवा कव्हा ईचार केला का?.तुलं दोन लेकर हेतं जरा तेह्यच्याकडं पाहायं.आंजुक शिकायलेतं बिचारे. आज जर जुई जिवंत आसती अन तिनं तुलं या आवतारात पाह्यलं आसतं तं ती काय मनली आसती.तीलं हे सगळं पाहून बरं वाटलं आसतं का? जर ती वरून पाहात आसलं तं ती किती दुःखी व्हत आसलं याचा ईचार केलास का कव्हा.तिनं जातांनी तुलं नावलौकिक मिळव मनल व्हतं नं का आसं बारवरं बसुनं स्वतःच हासं करून घे मनलं व्हतं.तुहे लेकरं,तुह्यावर जिव ववाळणारी बायको या सगळ्यायलं तु कामुन तरास देतुस.जुईच्या आठवणीत आसच रडत बसणार कि तिलं अभिमान वाटावं आसं काही करणारं हेस……! तु तुह्या एकट्याच्या तरकटपणामुळं सगळ्यायलं वलीस धरायलास हे बरोबर नाही.” मही मातरा बरूबर कामी येते का काय आसं वाटाया लागलं आनं अचानक पुन्हा किस्ना ओक्साबोक्शी रडायलं लागला.उलटा मह्यावरच खेकसायलं लागला.मलं मनाय लागला,“मलं वाटलं कि तु तरी मलं समजुन घेशील पण मलं कोन्हीच समजुन घेत नाही.”. मंग मी बी उलटा त्याच्यावर खेकसुन मनलं,“मरतानी जुई तुलं मनलं व्हती कि मी तुह्या आजुबाजुलच राहीन मुनं.ती आत्ताबी तुलं कुठुनतरी पाहात आसलचं कि रे गयभान्या.काय वाटत आसलं तिच्या मनालं.किती वेदना व्हत आसतीलं.जरा सावर स्वतःलं.तु जित्या मानसायवर सुड उगवतच हायेसच पण मेलेल्या माणसावर बी सुड उगवायलास.जरा सावर स्वतःलं .स्वत:साठी नाही तं त्या लेकराबाळायसाठी,तुह्यावर जीव ववाळणार्‍या बायकोसाठी,आन ज्यानं आयुष्यभर हातावरच्या फोडावाणी तुलं जपलं त्या बापासाठीतरी सावर.त्या जुईच्या विश्वासाचा अपमान करायचा नसलं तं सुदरं नाय तं घेत बस सुड सगळ्यायचाचं.आत्ता मात्र मही मात्रा लागु झाली.दारूच्या अमलात का व्हईना किस्नानं जुई अन नानाची शपथ घेऊन परत दारू पिनार नाही अस मनला.

संध्याकाळी दिवस माळवायच्या तश्यात मी किस्नालं घरी घेऊन आलो.दारूचा अंमल पार उतरला व्हता.घरी बायको मुलं तुळतुळ जीव करत त्याची वाट पहातं बसले होते.बैठकित नाना येरझाऱा घालत होते.म्या नानालं खुनवुन बाजुलं नेऊन सगळा परकार सांगितला आन तेह्यलं घराच्या मांघ नेलं.किस्ना अपराध्यावाणी घराचा जिना चढु लागला.जिना चढतानी त्याची नजर सहजच बागेतल्या कुंडीकडं गेली.कुंडीतलं जुईच झाडं मस्तपैकी वार्‍याच्या लहरेवर मान डोलवत व्हतं.त्या जुईच्या झाडालं एक सुंदरस फुल लागलं व्हतं.आनंदानं लहरत जणु ते झाड किस्नालं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होत.

©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..